पाकोळी पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या ॲपोडिफॉर्मिस गणाच्या ॲपोडिडी कुलात केला जातो. त्याच्या सु. २० प्रजाती व सु. ९५ जाती असून बहुतेक जाती स्थलांतर करणाऱ्या आहेत. तो ध्रुवीय प्रदेश, चिली, अर्जेंटिना, द. न्यूझीलंड आणि प. ऑस्ट्रेलिया वगळता जगात सर्वत्र आढळतो. भारतात पाकोळीच्या सु. १७ जाती आढळतात. त्यांपैकी एपस ॲफिनिस असे शास्त्रीय नाव असलेली जाती मुख्यत्वे आढळते. मराठी भाषेत त्याला ‘दुर्बल’ असेही नाव आहे.

पाकोळी (एपस ॲफिनिस)

पाकोळी हा पक्षी साधारणपणे चिमणीच्या आकाराचा असून रंगाने काळा अथवा तपकिरी असतो. शरीर मजबूत आणि पंख लांब असतात. पसरलेल्या पंखांची लांबी सु. ३३ सेंमी. असते. पिसे दगडी, तपकिरी किंवा काळ्या रंगाची असतात. त्याच्या गळा, मान व पोट या भागांवर क्वचित काही खुणा दिसून येतात. डोक्याचा भाग रुंद असतो. चोच अगदीच लहान व बाकदार असते. चोचीच्या खाली एक पांढरा ठिपका असतो. शेपूट लहान किंवा किंचित लांब असून दुभंगलेले असते. पाय आखूड परंतु दुर्बल असतात. पायाला चार बोटे असून ती पुढच्या बाजूला असतात. त्यामुळे त्याला जमिनीवर किंवा तारांवर इतर पक्ष्यांसारखे बसता येत नाही. मात्र, बोटांच्या नख्यांद्वारे तो उभ्या पृष्ठभागाला घट्ट पकडून लटकतो. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.

पाकोळी हा सर्वांत जलद गतीने उडणारा पक्षी आहे. दिवसातील बराच काळ तो उड्डाणातच घालवतो. तो सु. ६,६०० मी. उंचीपर्यंत उडू शकतो. तो जलद गतीने लहानलहान अंतरांत पंख हलवतो. तो अधूनमधून आकाशात नुसता तरंगत राहतो. मात्र त्या दरम्यान पंख शरीरापासून लांब ठेवले जातात. या पक्ष्याचे खाणे, पिणे आणि मीलनसुद्धा हवेतच होत असते. हवेतील कीटकांवर तो गुजराण करतो. पाण्यावर झेपावताना तो पाण्याचा घोट घेतो. विश्रांती घेताना तो भिंतीला, खडकाला किंवा अशाच एका आधाराला चिकटतो किंवा सरळ घरट्यात जाऊन बसतो. रात्री तो विश्रांती घेतो.

सामान्यपणे वनात राहणारे पाकोळी पक्षी मानवी वस्तीच्या आजूबाजूला दिसून येतात. ते थव्याने राहतात. जुनाट किल्ले, पडक्या व ओसाड इमारती आणि घरांच्या खोबण्या यांमध्ये ते घरटी तयार करतात. या पक्ष्यांचा आवाज मोठा असून ते सतत किलबिलाट करत असतात. घरट्यासाठी ते कागदाचे कपटे, दोरे, झाडाची पाने इ. वस्तूंचा वापर करतात. या सर्व वस्तू, माती आणि लाळ एकत्र करून ते बशीच्या आकाराचे गोलसर घरटे तयार करतात. विणीच्या हंगामात त्याच्या लाळग्रंथी आकाराने वाढलेल्या असतात. भिंतीचे कोपरे, छते, कोनाडे अशा ठिकाणी ही घरटी चिकटवलेली असतात. बाहेरून ही घरटी दिसायला अव्यवस्थित असली, तरी आतून मऊ असतात. हे पक्षी त्यांच्या घरट्यांत पुन:पुन्हा राहायला येतात. मादी २-३ दिवसांच्या अंतराने १–४ अंडी घालते. साधारणपणे २०–२२ दिवसांत अंड्यांतून पिले बाहेर येतात; नर व मादी दोघेही पिलांचे संगोपन करतात. पिले  ६–८ आठवड्यांत घरटे सोडून जातात.

भारतात पाकोळीची आणखी एक जाती आढळत असून तिचे शास्त्रीय नाव एपस एपस असे आहे. तिला कॉमन स्विफ्ट असे इंग्रजी नाव आहे. ही जाती आकाराने एपस ॲफिनिस  पेक्षा मोठी असून ती स्थलांतर करते. या पक्ष्याच्या पसरलेल्या पंखांची लांबी सु. ४० सेंमी. असते.

पाकोळीच्या काही जाती स्वनिर्मित ध्वनीमुळे निर्माण झालेल्या प्रतिध्वनीवरून स्थाननिश्‍चिती करतात. त्यांच्या काही जाती प्रतिकूल हवामानात सुप्तावस्थेत जातात. एरोड्रॅमस युनिकलर  जातीच्या लहान पाकोळ्यांची घरटी जमा करून त्यांपासून शक्तिवर्धक सूप तयार केले जात असे. सध्या त्यांची घरटी जमा करण्यावर बंदी आणली असून पाकोळीला संरक्षित पक्ष्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे.

पंख जलद गतीने हालवून उडणाऱ्या पुष्कळ पक्ष्यांना मराठीत पाकोळी म्हटले जाते. काही वेळा, संध्याकाळी संचार करणाऱ्या तपकिरी व लहान वटवाघळांना तसेच पतंगांना पाकोळी म्हटले जाते. मात्र वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे, तर पतंग हा कीटक आहे.

This Post Has One Comment

  1. Rajas

    खूप खूप धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा