घाणेरी किंवा टणटणी ही वनस्पती व्हर्बिनेसी कुलातील काटेरी झुडूप असून तिचे शास्त्रीय नाव लँटाना कॅमरा आहे. ही वनस्पती मूळची अमेरिकेतील, उष्ण प्रदेशातील असून भारतात प्रथम शोभेसाठी आणली गेली. आता महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांत सर्वत्र अति उष्ण कटिबंधात सामान्यपणे आढळते. ही एवढया झपाटयाने व वेडीवाकडी वाढते, की तिचे निर्मूलन करणे कठीण जाते. फुले येण्यापूर्वी कापून टाकल्यास तिच्या वाढीला आळा बसतो. घाणेरीच्या मुळांवर चंदनाचे रोप परजीवी म्हणून वाढते. म्हणून चंदनाची लागवड करताना काही ठिकाणी घाणेरीसारखी काटेरी झुडपे त्यासोबत लावतात.
पानाफुलांसहित घाणेरी

घाणेरीचे झुडूप १ ते २ मी. पर्यंत उंच वाढते. फांदया चौकोनी, खरबरीत व काटेरी असतात. पाने साधी, समोरासमोर, दंतूर, दोन्ही बाजूंना खरबरीत असतात. फुलोरा स्तबकाप्रमाणे असतो. त्याला गुलुच्छ म्हणतात. फुले लहान, पिवळी, नारिंगी व सच्छद असतात. सहपत्रे चटकन दिसून येतात. फळे मांसल, आठळीयुक्त, सु. ५ मिमी. पर्यंत व्यासाची असून कोवळी असताना हिरवी तर पिकल्यावर निळी किंवा काळी पडतात.

कृत्रिम संकराने घाणेरीच्या पांढऱ्या, पिवळ्या व जांभळ्या फुलांची पैदास झाली आहे. बागेला संरक्षण आणि शोभा आणण्यासाठी हिची कुंपण म्हणून लागवड केली जाते. काही वन्य जमातींतील लोक ताज्या मुळांचा काढा दंतरोगावर गुळण्या करण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या आमांशावर वापरतात. वाळलेल्या पानांचे चूर्ण जखमा, व्रण व सूज यांवर वापरतात. फळे भगंदर, पुटकळ्या आणि संधिवातावर उपयुक्त ठरतात, असा आयुर्वेदात उल्लेख आहे.

घाणेरीच्या नियंत्रणासाठी त्या झुडपांवर पिठ्या ढेकूण वाढवितात, त्यामुळे झुडूप मरते. अशा प्रकारे जैव नियंत्रणाची सुरुवात झाली.