काटेरी शेवंड (पॅन्युलिरस व्हर्सिकलर)

(लॉब्स्टर). संधिपाद संघातील कवचधारी वर्गात दशपाद (डेकॅपोडा) गणात शेवंडाचा समावेश होतो. याच गणात खेकडे, चिंगाटी आणि झिंगे यांचाही समावेश होतो. जगातील सर्व समुद्रात शेवंड आढळतात आणि ते खडकाळ, वाळूमय किंवा गढूळ पाण्यात तसेच खोल समुद्रात असतात. शेवंडाचे काटेरी व बिनकाटेरी असे प्रकार पडतात. दक्षिण आशियाई देशांत आढळणाऱ्या शेवडांना ‘काटेरी शेवंड’ म्हणतात. हे शेवंड दशपाद गणाच्या ॲचिलाटा या उपकुलातील पॅलिन्युरिडी या कुलात येतात. त्यांना नांग्या नसतात. तसेच त्यांच्या शरीरावर काटे असतात. हिंदी महासागरात त्यांच्या ५ जाती आढळतात. त्यांपैकी एका प्रातिनिधिक जातीचे शास्त्रीय नाव पॅन्युलिरस व्हर्सिकलर आहे. अमेरिकेत आढळणारे शेवंड बिनकाटेरी असतात. या बिनकाटेरी शेवंडांना मोठ्या नांग्या असतात.

शेवंडाची लांबी सु. ३० सेंमी असून वजन ५-६ किग्रॅ.पर्यंत असते. खेकडा, चिंगाटी आणि झिंगा या अन्य दशपाद प्राण्यांप्रमाणे शेवडांचे शरीर कायटिनमय कवचांनी वेढलेले असून ते खंडमय असते. शरीराचे शिरोवक्ष व उदर असे दोन भाग असतात. शिरोवक्ष १३ खंडांचे व उदर ६ खंडांचे असते. शेवंड दणकट असतात, तर चिंगाटी नाजूक असते. शेवंडाचे उदर सरळ असते, तर चिंगाटी, झिंगे यांचे उदर वळलेले असते. शेवंडाच्या ऊर्ध्व बाजूचा रंग काळसर हिरवा, तर अधर बाजूचा रंग पिवळसर असतो. लहान मासे, लहान मृदुकाय प्राणी, पाणवनस्पती हे शेवडांचे अन्न आहे. मुखात असलेल्या मुख-उपांगांच्या साहाय्याने भक्ष्याचे तुकडे करून ते मुखात घेतले जातात. शेवंडात श्वसनासाठी कल्ले असून ते शिरोवक्षाच्या दोन्ही बाजूस असलेल्या क्लोमकक्षात असतात. हृदय पृष्ठीय असून रक्त सात धमन्यांद्वारे शरीराला पुरवले जाते. शृंगिकांच्या तळाशी असलेल्या हरित ग्रंथीद्वारे त्याज्य पदार्थांचे उत्सर्जन केले जाते.

शेवंड निशाचर असतात. त्यांच्यामध्ये अन्य कवचधारी प्राण्यांप्रमाणे कवचाचे निर्मोचन (कात टाकणे) होते. तसेच त्यांच्यात शत्रूपासून सुटका करून घेण्यासाठी अवयवांच्या (पाय आणि नांग्या) स्वविच्छेदनाची क्षमता असते. स्वविच्छेदनात शेवंडाचा अवयव स्नायूच्या जोरदार आकुंचनाने वेगळा होतो. अशा तुटलेल्या अवयवाच्या जागी प्रथम कलिका तयार होते व त्यापासून पुढच्या निर्मोचनाच्या आधी नवीन अवयव तयार होतो.

शेवंडाचे नर आणि मादी वेगवेगळे असतात. नर आकारमानाने मादीपेक्षा मोठा असतो. नराच्या पाचव्या पायाच्या टोकाला नखर असते, तर मादीच्या पाचव्या पायाच्या टोकाला तीन प्रसर (स्पर) असतात. नरामध्ये जननछिद्रे पाचव्या पायांच्या बुडाशी असून ती मोठी आणि फुगीर दिसतात, मादीमध्ये जननछिद्रे तिसऱ्या पायाशी असून ती लहान असतात. प्रजननकाळात नर शुक्रपेशींच्या पिशव्या मादीच्या जननछिद्रातून शरीरात सोडतो. अनुकूल परिस्थितीत मादी एका हंगामात सु. ३-४ लाख अंडी घालते. मादीच्या शरीरातून अंडी बाहेर पडत असताना त्यांचे शुक्रपेशींद्वारे फलन होते. ही फलित अंडी मादीच्या उदराखाली असलेल्या प्लवपादांना चिकटून राहतात. फलित अंडी रंगाने लालभडक असून बेरीच्या घोसासारखी दिसतात. साधारणपणे १०-११ महिन्यानंतर त्यातून डिंभ बाहेर पडतात. डिंभांचे पिलांमध्ये रूपांतर होत असताना ४-५ वेळा त्यांच्या कवचाचे निर्मोचन होते. यावेळेस त्यांचे शरीर मृदू असल्याने असंरक्षित बनते. शेवंड सु. ५० वर्षे जगू शकतात. शेवंडाचे मांस रुचकर असून खाण्यासाठी ते ताजे अथवा गोठवून वापरतात.