सरीसृप वर्गाच्या स्क्वॅमाटा गणातील व्हॅरॅनिडी कुलातील सरडयासारखा दिसणारा परंतु त्याच्याहून आकाराने पुष्कळच मोठा प्राणी. उष्ण हवामान असलेल्या दक्षिण आफ्रिका, भारत, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी इत्यादी देशांत घोरपडी आढळतात. सामान्यपणे नदया व ओढे यांच्या काठच्या ओलाव्याच्या ठिकाणी त्या राहतात. त्यांच्या सु. ३० जाती असून त्यातील पुढील चार जाती भारतात आढळतात. व्हॅरॅनस बेंगॉलेन्सिस (बेंगॉल मॉनिटर) ही भारतात जवळजवळ सर्वत्र आढळणारी जाती आहे. व्हॅ. ग्रीसिअस (डेझर्ट मॉनिटर लिझार्ड) ही जाती थरच्या वाळवंटात आढळते. व्हॅ. फ्लॅव्हिसेन्स (यलो मॉनिटर लिझार्ड) ही पिवळसर घोरपड पंजाब व पश्चिम बंगालमध्ये आढळते, तर व्हॅ. सॉल्व्हेटॉर (वॉटर मॉनिटर लिझार्ड) ही जाती हिमालयातील आणि गारो टेकडयांतील नदयांत आढळते.

घोरपड (व्हॅरॅनस बेंगॉलेन्सिस)

घोरपडींची लांबी १ – ३ मी. असून काहींचे वजन १०० किग्रॅ.हूनही अधिक असते. शरीर जाडजूड व भक्कम असते. भारतीय घोरपडींची (व्हॅ. बेंगॉलेन्सिस) लांबी सु. १.७५ मी. असते. धडाची लांबी सु. ०.७५ मी. तर शेपूट सु. १.० मी. असते. पाठीच्या बाजूचा रंग तपकिरी वा तपकिरी हिरवा असून त्यावर पिवळे पट्टे, ठिपके वा रंगीबेरंगी ठिपके असतात. पोटाच्या बाजूचा रंग पांढरट पिवळा असतो. पाठीची त्वचा जाड व खरखरीत असून तिच्यावर मण्यांप्रमाणे लहान खवले असतात. खालची त्वचा काहीशी गुळगुळीत आणि जाड असून तिच्यावर ढालीसारखे मोठे चौकोनी खवले असतात. हनुवटीची त्वचा पातळ आणि मऊ असते. म्हणून शिकार करताना त्यांच्या हनुवटीच्या भागावर प्रहार करतात. डोके लांब असून मानेने धडाला जोडलेले असते. मुस्कट निमुळते होत गेलेले असून त्याच्या टोकाला तिरक्या नाकपुडया असतात. जीभ अरुंद व दुभागलेली असते. डोळे थोडे बाजूला असून त्यांवर पापण्या नसतात. पायांना पाच लांब व मोठी बोटे असून त्यांच्या टोकाला मजबूत नख्या असतात. शेपटाचे टोक चाबकासारखे असून स्वसंरक्षणाच्या वेळी ती त्याचे जोरदार तडाखे देऊ शकते. पोहताना शेपटीचा उपयोग वल्ह्यासारखा करते. मादीहून नर मोठा व शक्तिमान असतो.

घोरपडी जंगलात वा उघडया कोरडया मैदानातही आढळतात. जरूर पडल्यास त्या वेगाने पळू शकतात. पळताना त्या शेपटी वर उचलतात. त्या झाडावर तसेच डोंगरटेकडयांवर चढू शकतात. घोरपडी उत्तम पोहतात आणि श्वास रोखून पाण्याखाली बराच वेळ राहू शकतात. स्वभावत: त्या काहीशा भित्र्या असून सहसा माणसाच्या अंगावर येत नाहीत. मात्र संकटात सापडल्यास घोरपड मागील पायावर उभी राहते आणि अंग फुगवून मोठा आकार धारण करते, जोराने फुस्कारते, शेपटीचा तडाखा देते किंवा दातांनी चावा घेते.

घोरपड दिवसा शिकार करते. पक्षी व त्यांची अंडी, उंदीर, सरडे, साप, मासे, कवचधारी प्राणी व लहानमोठे कीटक यांवर ती उपजीविका करते. कधीकधी ती कुजलेले मांसही खाते. तिची पिले मात्र कीटकभक्षी असतात. जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये बिळात किंवा वाळवीच्या वारुळात मादी २५ ‒ ३० अंडी घालते. अंडी घालून झाल्यावर ती पालापाचोळ्याने बीळ बंद करून निघून जाते. बिळातील उष्णतेमुळे अंडी उबतात. ईजिप्तमध्ये नाईल नदीच्या परिसरात आढळणाऱ्या व्हॅ. निलोटिकस या जातीची अंडी उबण्यास सु. दहा महिने लागतात.

जगात घोरपडी वेगवेगळ्या आकारांत दिसतात. आखूड शेपटाची व्हॅ. ब्रेव्हिकॉदा ही जाती सर्वांत लहान असून तिची लांबी सु. २० सेंमी. आणि वजन सु. २० ग्रॅ. असते. इंडोनेशियातील व्हॅ. कोमोडोएन्सिस (कोमोडो ड्रॅगन) ही जाती सर्वांत मोठी असून तिची लांबी सु. ३ मी. आणि वजन सु. १३५ किग्रॅ. असते.

दक्षिण भारतात काही वेळा घोरपड अन्न म्हणून खाल्ली जाते. तिची अंडी रुचकर असतात. तिच्या कातडयापासून पट्टे, बॅगा अशा वस्तू बनवितात. महाराष्ट्रातील दिमडी या चर्मवादयासाठी घोरपडीचे कातडे वापरात होते. तिची चरबी औषधी आहे, असे म्हणतात. भारताच्या दक्षिण भागात, विशेषत: तमिळनाडू राज्यात घोरपड पकडणे वा मारणे गुन्हा आहे.