(बॉटनी). जीवविज्ञानाची एक शाखा. या शाखेत वनस्पतींचा अभ्यास केला जातो. या अभ्यासात वनस्पतींची रचना, त्यांचे गुणधर्म व वर्गीकरण, त्यांच्या जैवरासायनिक प्रक्रिया, वनस्पतींचे रोग आणि सभोवतालच्या भौतिक घटकांशी त्यांची आंतरक्रिया, त्यांचे उपयोग इत्यादींचा समावेश होतो. प्राचीन काळापासून मानव अन्न, वस्त्र आणि निवारा यांसाठी वनस्पतींवर अवलंबून आहे. त्यामुळे त्याला अनेक वनस्पतींची ओळख झाली. तसेच औषधे, हत्यारे आणि अलंकार यांसाठीही त्याने वनस्पतींचा उपयोग केला. वन्य वनस्पतींची लागवड करण्याचे तंत्र त्याने अवगत केले, तसेच वनस्पतींचा सखोल अभ्यास केला. वनस्पती आणि मानव यांचे जवळचे संबंध असल्याने वनस्पतींसंबंधी सांगीव माहिती, त्यांबद्दलच्या दंतकथा आणि प्रत्यक्ष माहिती यांचा एक खजिना तयार झाला आणि त्यातून वनस्पतिविज्ञान उदयाला आले. प्राचीन भारतात वनस्पतिसंबंधीचा अभ्यास वैद्यकाच्या अंगाने होत असे. त्याकाळी वनस्पतींच्या महतीचे ज्ञान एकत्रित करून ग्रंथ तयार करण्यात आले. चीनमध्येही अशी ग्रंथसंपदा अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

वनस्पतींचा आधुनिक अभ्यास इ.स.पू. ३७१–२८७ या काळात ग्रीसमधील अथेन्स येथे थीओफ्रॅस्टस याने सुरू केला. थीओफ्रॅस्टस हा अरिस्टॉटलचा शिष्य होता. त्याने सु. ६०० वनस्पतींचे वर्णन केले. यात वनस्पतींची संरचना, वाढ, त्यांचे औषधी गुणधर्म यांचा समावेश होता. त्याने ही वर्णने वनस्पती प्रत्यक्ष कशा दिसतात, त्यांचे बाह्यस्वरूप यांवरून लिहिली होती. सोळाव्या शतकात सूक्ष्मदर्शीचा शोध लागला आणि वनस्पतींच्या सर्वांगीण अभ्यासाला चालना मिळाली. वनस्पती मुळांद्वारे पाणी शोषून संपूर्ण वनस्पतीभर कसे वाहून नेतात, बाष्पोत्सर्जन कसे करतात, सूर्यप्रकाशात ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि अंधारात कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात, हे माहीत झाले. तसेच वनस्पतींची ओळख पटवून घेऊन त्यांना उपयोग होण्यासाठी विविध अंगांनी अभ्यास होणे महत्त्वाचे आहे, असे काही वैज्ञानिकांना जाणवले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विविध उपकरणांचा शोध लागला. त्यांच्या मदतीने वनस्पतींची संरचना, वर्गीकरण, वनस्पतींचे निसर्गातील स्थान, औषधी गुणधर्म, जनुक रचना, उत्क्रांती अशा विविध क्षेत्रात मोलाचे संशोधन झाले. भारतीय वैज्ञानिक सर जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींविषयी मोलाचे संशोधन केले. वनस्पतींसुद्धा भावना असतात, असा सिद्धांत त्यांनी मांडला. मात्र याबाबत वैज्ञानिकांमध्ये मतभिन्नता आहे.

वनस्पतींचा अभ्यास संरचना, रूपिकी, शरीरक्रियाशास्त्र, पारिस्थितिकी, वर्गिकी, वनस्पती  जैवरसायनशास्त्र, वनस्पती आनुवंशिकी, वनस्पती उत्क्रांती, वनस्पती भ्रौणिकी, वनस्पती विकृतिशास्त्र या प्रमुख क्षेत्रांत विभागला गेला जातो, याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे :

संरचना : या क्षेत्रात वनस्पती पेशींची संरचना, ऊती आणि त्यांचे अवयवांतील संघटन, अवयवांची संरचना, प्रजनन अवयवांची संरचना, जीवनचक्रांचा अभ्यास इत्यादींचा अभ्यास केला जातो.

रूपिकी / आकारविज्ञान (मॉर्फॉलॉजी) : या क्षेत्रात वनस्पतींचे बाह्यरूप, त्यांचे अवयव, ऊती आणि पेशी यांची संरचना व संघटन यांचा अभ्यास होतो. वनस्पतींचे विविध – प्रजननाचे अवयव धरून सर्व अवयव –ऊती आणि पेशी यांची वाढ, वनस्पतींचे जीवनचक्र यांचाही अभ्यास येथे केला जातो.

शरीरक्रियाशास्त्र : वनस्पतींचे अवयव, ऊती आणि पेशी यांच्या कार्याचा अभ्यास या क्षेत्रात होतो. शरीरक्रियाशास्त्र (कार्य) आणि रूपिकी यांचा संबंध इतका दृढ आहे की, एका क्षेत्राचा अभ्यास दुसऱ्या क्षेत्राच्या अभ्यासाशिवाय करताच येत नाही. वनस्पतींच्या आणि त्यांच्या अवयवांच्या कार्याभोवती त्यांची संरचना आणि आकार उत्क्रांत झालेले दिसून येतात. शरीरक्रियाशास्त्राचा जैवरसायनशास्त्र आणि जैवभौतिकी या विज्ञानशाखांचीही घनिष्ट संबंध आहे. या शाखांतील संशोधन पद्धतींचा वापर शरीरक्रिया शाखेतील प्रश्नांची उकल करण्यासाठी होतो.

पारिस्थितिकी : पारिस्थितिकी म्हणजे सजीव, त्यांच्या भोवतालचे अन्य सजीव व भौतिक पर्यावरण यांच्यातील परस्परसंबंधांचा आणि आंतरक्रियांचा अभ्यास. वनस्पतींच्या सर्व अवयवांतील शरीरक्रियांवर त्यांच्या पर्यावरणातील मृदा आणि हवामान यांचा अपरिहार्य परिणाम होत असतो. वनस्पती पर्यावरणातील घटकांशी तीव्रतेने संवेदनशील असतात आणि त्यांचे समूहातील (उदा., वने) साहचर्य व भौगोलिक वितरण हवामान व मृदा या घटकांद्वारेच ठरते. पर्यावरण आणि सजीव यांच्या परस्पर साहचर्यामुळेच नवीन जाती उत्पन्न होतात आणि उत्क्रांती घडून येते. वनस्पती आणि प्राणी (जसे शाकाहारी प्राणी, परागण करणारे प्राणी) यांच्यातील आंतरक्रिया हाही महत्त्वाचा अभ्यासविषय आहे.

वर्गिकी : वनस्पतींची ओळख आणि श्रेणी यांचा अभ्यास या क्षेत्रात होतो. यात वनस्पतींचे वर्गीकरण तसेच नामकरण यांचा समावेश होतो. त्यामुळे वनस्पतींची विविधता, उत्क्रांती यांचा पसारा समजून घेण्यासाठी मदत होते.

वनस्पती जैवरसायनशास्त्र : वनस्पतींमध्ये ज्या रासायनिक प्रक्रिया घडतात, त्यांचा अभ्यास यात होतो. खासकरून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियासंबंधी सर्व रासायनिक अभिक्रिया, वनस्पतींच्या जडणघडणीत आवश्यक असलेले सेल्युलोज व लिग्निन, तसेच वनस्पतींद्वारे निर्माण होणारी बहुवारिके इ. संयुगांचा, त्यांच्या अभिक्रियांचा अभ्यास केला जातो.

वनस्पती आनुवंशिकी : यात वनस्पतींची जनुके, जनुकीय बदल आणि आनुवंशिकता इ. बाबींचा अभ्यास होतो. या अभ्यासाचे अनेक आर्थिक फायदे झालेले दिसतात; अनेक मुख्य पिकांचे जनुकीय परिवर्तन केल्यामुळे उत्पन्न वाढले आहे. त्यांच्यात किडीला आणि रोगाला प्रतिरोध वाढला आहे, तसेच त्यांचे पोषणमूल्यदेखील वाढले आहे.

वनस्पती उत्क्रांती : हा उत्क्रांतीचा वनस्पतींशी संबंधित उपघटक आहे. यात भूशास्त्रीय काळानुसार, वनस्पतींची सद्यविविधता कशी निर्माण झाली, याचा अभ्यास होतो. तसेच जनुकीय बदल आणि त्यामुळे झालेल्या भिन्नतेतून नवीन जातींची निर्मिती, अशाही बाबींचा विचार केला जातो.

वनस्पती भ्रौणिकी : यात वनस्पतींतील भ्रूणप्रक्रियेचा – बीजांडांच्या फलनानंतर पूर्ण विकसित भ्रूण तयार होण्याच्या प्रक्रियेचा – अभ्यास होतो. भ्रूणन हा वनस्पतींच्या जीवनचक्रातील एक महत्त्वाचा टप्पा असून सुप्तावस्था आणि अंकुरण यानंतर घडतो. या शाखेत वनस्पतींच्या पुनरुत्पादन प्रक्रियेचाही अभ्यास होतो.

वनस्पती विकृतिशास्त्र : या शाखेत रोगकारक सजीव (विषाणू, विषाणू सदृशे (व्हायराईडे), जीवाणू, कवके, आदिजीव, गोलकृमी आणि परजीवी) आणि शारीर घटक यांद्वारे वनस्पतींमध्ये उद्भवणाऱ्या रोगांचा अभ्यास केला जातो. रोगकारकांची ओळख, रोगांची कारणे व साथी, रोगांची चक्रे, वनस्पतींची रोगप्रतिकारशक्ती, रोगांचे आर्थिक तसेच मनुष्य आणि प्राणी यांवर होणारे अन्य परिणाम, इत्यादींचा अभ्यास वनस्पती विकृतिशास्त्रात होतो.

यांशिवाय, वनस्पतींच्या विशिष्ट गटांचा सखोल अभ्यास करण्यासाठी खास विज्ञानशाखा उदयाला आलेल्या आहेत, जसे, शैवालशास्त्र (फायकोलॉजी), शेवाळशास्त्र (ब्रायोलॉजी), नेच्यांचा अभ्यास (टेरिडोलॉजी), वनस्पती जीवाश्मांचा अभ्यास (पॅलिओबॉटनी), कवकशास्त्र (मायकोलॉजी) आणि जीवाणुशास्त्र (बॅक्टेरियॉलॉजी) इ. आर्थिक वनस्पतिविज्ञानांत (इकॉनॉमिक बॉटनी) वनस्पतींचे आर्थिक महत्त्व अभ्यासले जाते, तर वनस्पतींचा विविध स्थानिक लोकांद्वारे केला गेलेला पारंपरिक वापर मानवजाति-वनस्पतिशास्त्राचा (एथ्‌नोबॉटनी) अभ्यासविषय आहे. वनस्पती औषधिस्वरूपविज्ञान (फार्मकॉग्नसी) या शाखेत वनस्पतींचा औषधी उपयोगाचा विचार होतो.

वनस्पतिविज्ञानाचे उपयोजित अंग कृषिविज्ञान, उद्यानविज्ञान आणि वनविज्ञान अशा शाखांद्वारे प्रकट होते.

कृषिविज्ञान : अन्न, इंधन व धागे यांकरिता वनस्पतींचा वापर आणि लागवड याचे विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे कृषिविज्ञान. कृषिवैज्ञानिक कार्याने वनस्पती आनुवंशिकी, वनस्पती शरीरक्रियाशास्त्र, हवामानशास्त्र, मृदाविज्ञान अशी क्षेत्रे व्यापली आहेत.

उद्यानविज्ञान : या विज्ञानात मुख्यत: अन्न, कच्चा माल, आराम व सौंदर्य यांसाठी वनस्पतींचा केल्या जाणाऱ्या संवर्धनाचा विचार होतो. मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या पिकांचा किंवा पशुसंवर्धनाचा विचार उद्यानविज्ञानात होत नाही.

वनविज्ञान : वनांची निर्मिती, संवर्धन आणि जतन करण्याचे विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे वनविज्ञान. वनसंपत्तीची निर्मिती आणि वापर, वन्य जीवांचे रक्षण व संवर्धन, वनांतील मूळ रहिवाशांचे कल्याण, मृदारक्षण, जलोत्सारण व्यवस्था अशा विविध बाबींचा विचार वनविज्ञानाच्या अंतर्गत होतो.

वनस्पतिविज्ञानाचा प्राणिशास्त्र, वैद्यकशास्त्र, सूक्ष्मजीवविज्ञान, कृषी, रसायनशास्त्र इ. विज्ञानांशी अनेक मार्गाने संबंध येतो. तसेच वनस्पतिविज्ञानातील विशिष्ट माहिती कला, साहित्य, इतिहास, धर्म, पुरातत्त्वशास्त्र, समाजविज्ञान, मानसशास्त्र अशा विविध विषयांशी जोडलेली आढळते.

शाळांमध्ये व महाविद्यालयीन प्रयोगशाळेत वनस्पतिविज्ञानाचा अभ्यास वनस्पतींचे शुष्कसंग्रहातील नमुने पाहून, वनस्पतींच्या अवयवांचे सूक्ष्म छेद सूक्ष्मदर्शीखाली पाहून, तसेच वनस्पतींची चित्रे, छायाचित्रे पाहून करतात. वनस्पतींच्या अधिक अभ्यासासाठी वनस्पती संग्रहालय, वनस्पती उद्याने, परिसरांच्या भेटी यांना अभ्यास भेटी दिल्या जातात. महाराष्ट्र राज्यात माध्यमिक स्तरावर वनस्पतिविज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात केला आहे. उच्च-माध्यमिक स्तरावर वनस्पतिविज्ञानाचा समावेश जीवविज्ञानात केला आहे. पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावर वनस्पतिविज्ञान विषयाचा अभ्यास स्वतंत्रपणे करता येतो. अनेक महाविद्यालयांमध्ये तसेच विद्यापीठांमध्ये वनस्पतिविज्ञानात पीएच.डी. पदवी प्राप्त करता येते.