कीर्तनपरंपरा : महाराष्ट्रात कीर्तनाचे पुढील पारंपरिक प्रकार आहेत १) वारकरी, २) नारदीय, ३) रामदासी, ४) गाणपत्य, ५) शाक्त, ६) राष्ट्रीय, ७) चटई (पथकीर्तन).

वारकरी कीर्तन : वारकरी कीर्तनास निरूपण अशी संज्ञा आहे. संत नामदेव हे या परंपरेचे आद्य कीर्तनकार आहेत. वारकरी कीर्तनात ज्ञानोबा ते निळोबा यांचे वाङ्मय येते. या परंपरेत समर्थ रामदास वर्ज्य आहेत. कीर्तनाचा आरंभ जय जय रामकृष्ण हरीने होतो. रूप पाहता लोचनी व सुंदर ते ध्यान हे नमनाचे अभंग म्हणतात. नंतर जय जय विठोबा रखुमाईचा सामूहिक गजर होतो. तुकोबांच्या काळात पूर्वरंग व उत्तररंग असे कीर्तनाचे दोन भाग झाले. गाडगे महाराजांची वारकरी कीर्तनपद्धती वेगळी आहे. देवकीनंदन गोपाला हा त्यांचा मूलमंत्र आहे. वारकरी कीर्तनात श्रोता-वक्ता संवाद यात अधिक आहे.

नारदीय कीर्तन : सगुणचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी । सज्जनवृंदे मनोभावे आधी वंदावी ।। हा एकनाथांचा संकेत या परंपरेने सांभाळला. समर्थ रामदासांनी दासबोधात कीर्तनावर स्वतंत्र प्रकरण लिहिले.पूर्वरंगात वेदांत निरूपण व उत्तररंगात आख्यान हे नारदीय कीर्तनपरंपरेचे ठळक वैशिष्ट्य आहे.नमनात गणपती, सरस्वती,सद‍्गुरू,मातापिता,श्रोते येतात. या नमनात दोन परंपरा आहेत. पहिली परंपरा गोविंदतारकाश्रमांची. या परंपरेचा आरंभ जय जय रामकृष्ण हरीने करतात.

नमनानंतर मूळ अभंग गातात. अभंग विलंबितात व मध्यलयीत गातात. अभंगानंतर तराणा गातात. मग उपास्यदेवतेचे भजन करतात. पुन्हा अभंग गाऊन मग निरूपण करतात. निरूपणात वेदांत तत्त्वज्ञान,गीता,उपनिषदे, शांकरभाष्य,संत-पंत-तंत काव्ये येतात. यात बुवांच्या डाव्या हातास हार्मोनियम, उजव्या हातास तबला,पाठीशी टाळकरी,तंबोरा असतो. काही बुवा पखवाज वापरतात. काही बुवा झांज घेतात तर काही बुवा चिपळ्या घेतात. मधोमध नारदाची गादी असते. त्यात बुवा उभे राहतात. पांढरे धोतर,पांढरा सदरा, त्यावर पांढरी बाराबंदी, डोक्यावर फेटा किंवा पगडी, खांद्यावर उपरणे, पायात चाळ, कपाळी आडवे वा उभे गंध, मधोमध बुक्क्याचा व अष्टगंधाचा टिळा असतो. काही बुवा नमनापुरती वीणा घेतात. नमन संपल्यावर वीणेला हार घालून तो टाळकर्‍याच्या गळ्यात घालतात. यामुळे नारद कीर्तनास आले असे बुवा मानतात. पूर्वरंग निरूपणात अभंग,ओवी, विविध-वृत्तांतले श्‍लोक,पदे,फटका हे काव्यप्रकार येतात. उत्तररंगात निरूपणात बुवा आख्यान लावतात. ही आख्याने रामायण, महाभारत, भागवत यावर आधारलेली असतात. संतचरित्रे, साधूचरित्रे यात येतात. स्वतंत्र आख्यानकाव्य यात येते. यात वामनपंडितांचा श्‍लोक, मोरोपंतांची आर्या, विठोबा अण्णा दप्तरदारांची पदे, अमृतरायांचे कटाव, मध्वमुनीश्वरांची पदे, मुक्तेश्वरांच्या ओव्या, श्रीधरांची आख्याने, विविध-वृत्ते, चम्पूकाव्य, चूर्णिका यांचा योग्य उपयोग करतात. यात लावण्या, फटके येतात. बुवा स्वकृत काव्येही योजतात. या परंपरेत संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराथी यातली सर्व संतकाव्ये बुवा घेतात. त्यामुळे या परंपरेने ‘आख्यानकाव्य’ हा काव्यप्रकार रूढ केला. उत्तररंगात स्वयंराख्याने हा नवा वाङ्मयप्रकार या परंपरेने आणला. एकनाथांचे रुक्मिणी स्वयंवर, निरंजन रघुनाथाचे सीतास्वयंवर व द्रौपदीस्वयंवर, निरंजन माधववाचे सुभद्रास्वयंवर, रघुनाथ पंडितांचे नल-दमयंती स्वयंवर, मुक्तेश्वरांचे उषा-अनिरुद्ध स्वयंवर हे पायाभूत मानून कीर्तनकारांनी यातल्या रचना व स्वकृत रचना स्वयंवराख्यानात आणल्या.

रामदासी कीर्तन : यात नारदीय परंपरेप्रमाणे पूर्वरंग – उत्तररंग असतो.काही बुवा नारदीय पोषाख घालून त्यावर भगवी कफनी घालतात. तर काही वैष्णव साधूंसारखे मानेवर गाठ मारलेले वस्त्र घालतात.

गाणपत्य कीर्तन : ही कीर्तनपरंपरा नारदीय परंपरेशी जवळीक साधून आहे.यात पूर्वरंग-उत्तररंग असतो. कीर्तन प्रयोगापूर्वी बुवा दिवसभर उपवास करतात. सकाळी गणपती अथर्वशीर्षाची एकशे आठ आवर्तने करतात. कीर्तनसमयी बुवा स्वच्छ पांढरे धोतर नेसतात. उजव्या कनवटीला गणपती खोचतात. अंगावर उपरणे घालतात. पायात चाळ बांधतात.डोक्यावर घेरा असतो. कपाळी चंद्रकोरीसारखे अष्टगंध. डाव्या मनगटावर काळा करदोटा. त्यात छोटासा गणपती बांधलेला. डाव्या हातात चिपळ्या. उजव्या हातात झांज, वाजवत वाजवत नाचत नाचत बुवा संपूर्ण देवळाला अकरा प्रदक्षिणा घालतात.

शाक्त कीर्तन : ही कीर्तनपरंपरा माहूर-सप्तश्रृंग या मर्यादित परिसरात आहे. हे बुवा इतर गावी कीर्तनास जात नाहीत. देवीचे ठाणे सोडायचे नाही असा त्यांचा दंडक आहे. हे कीर्तनास हिरवे पातळ दुटांगी धोतरासारखे नेसतात. पायात चाळ घालतात. कपाळी मळवट असतो. केस लांब-मोकळे असतात. दंडाला ताईत असतात. अंगावर उपरणे असते. मुखात तांबूल असतो. दोन्ही हातात मोठ्या आकाराच्या चिपळ्या असतात. कीर्तनाआधी ते तीन प्रदक्षिणा नाचत नाचत घालतात. तिसर्‍या प्रदक्षिणेला त्यांच्या अंगात संचार होतो. यावेळी तबलजी डग्गा जोरजोरात घुमवतो. ‘‘आई आली ऽऽ का ऽऽ’’ अशी तीनदा बुवा हाळी देतात. तिसर्‍यांदा तबलजी मोठ्ठ्यांदा म्हणतो; ‘‘आली ऽऽ आली ऽऽ आई आली हो ऽऽऽऽ!’’ हे ऐकताच बुवांचे डोळे भरून येतात. पेटीमास्तर काळी दोनच्या मध्यमात मंगलचरण गातात. उत्तररंगात देवीचरित्र; शंकर पार्वती विवाह; शुंभनिशुंभावधाख्यान लक्ष्मीचरित्र सांगतात.

राष्ट्रीय कीर्तन : हा नारदीय कीर्तनपरंपरेतला उपप्रकार आहे. लोकमान्य टिळकांनी याचा उपयोग नीट जाणला. जनसामान्यांच्या मनात कीर्तनातून ‘केसरी’ रुजावा म्हणून टिळकांनी राष्ट्रीय कीर्तन राबविले. ‘राष्ट्रीय कीर्तन’ ही नवी संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. याचे आद्य जनक डॉ. दत्तात्रेय विनायक पटवर्धनबुवा (वाई) हे होत. हे लोकमान्यांचे अनुयायी होते. पूर्वरंग निरूपणासाठी घेतलेला अभंग व आख्यान यांची नेमकी सांगड त्यांनी घातली.

चटई कीर्तन (पथकीर्तन) : कीर्तनकलेचा सामाजिक व राजकीय प्रबोधनासाठी उपयोग करण्यात आला. चटई कीर्तन (पथकीर्तन) हा प्रकार गेल्या दशकात निर्माण झाला आहे. कोणत्याही रस्त्याच्या मधोमध व मैदानातल्या शांत कोपर्‍यात बुवा आपल्या सोबत आणलेली दहा बाराची चटई किंवा सतरंजी अंथरतात. त्यात टोकाला राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई यापैकी कुणा एकाची प्रतिमा ठेवतात. त्यास हार घालतात. उदबत्ती लावतात. जवळ रिकामे तबक ठेवतात. किंवा कुलूप लावलेली छोटी पेटी ठेवतात. (यात यथाशक्ती द्रव्य टाका) अशी अक्षरे लावतात. प्रतिमेसमोर उभे राहातात. फेटा बांधतात. उपरणे घेतात. एखादा शिष्य पेटीचा स्वर धरतो किंवा कधी कधी बुवा स्वतः पेटी वाजवितात. दोन शिष्य टाळ वाजवितात. मराठी रंगभूमीची गंगोत्री नारदीय कीर्तनपरंपरा आहे. रंगभूमीवरील सूत्रधार हा कीर्तनकार आहे. विद्या व कला यांचा सुरेख मिलाफ साधणार्‍या या एकपात्री प्रयोगाचे सार ईश्वरभक्तीत आहे. कीर्तनवाङ्मयामुळे नि कीर्तनपरंपरेमुळे मराठी वाङ्मयेतिहासाला वेगळी दिशा मिळण्याचा संभव आहे. ही संशोधनाची आव्हाने कीर्तनाने निर्माण केली आहेत. महाराष्ट्राप्रमाणे तंजावर, कर्नाटक आदी ठिकाणी कीर्तनपरंपरा दिसते. ना. वा. टिळकांनी ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी कीर्तन कलेचा वापर केला.

संदर्भ :

  • पाठक, यशवंत, कीर्तन परंपरा एक लोकसाहित्याविष्कार, दास्ताने रामचंद्र आणि कंपनी,पुणे,२००८.
  • मांडे, प्रभाकर, लोकरंगभूमी परंपरा,स्वरूप आणि भवितव्य, मधुराज पब्लिकेशन्स, पुणे, २००७.

This Post Has One Comment

  1. Rahul Harichandra Gaikwad

    Thanks its good information..

प्रतिक्रिया व्यक्त करा