हुसेन, अंबरखान : (१६०३–सु. १६५३). एक मुसलमान संतकवी. त्यांना अंबरहुसेन असेही म्हणतात.त्यांची अंबरहुसेनी ( ओवीसंख्या ८७१) ही भगवद्गीतेवरील टीका प्रसिद्ध आहे. त्यांच्या जन्माचा उल्लेख सिद्धांतचिदंबरी (वैद्यनाथ) या ग्रंथाच्या ‘चिदंबरं-जयंतीस्तोत्र’ या प्रकरणात आढळतो. अंबरखान हे त्यांच्या घराण्याचे नाव. गीताटीकेच्या प्रारंभी आत्मवृत्तपर निवेदन करताना ते म्हणतात, ‘आधी अंबर अंबरखान । त्याचा पुत्र याकुत अंबरखान । त्याचा सुत हुसेन अंबरखान । असे जगद्वंद्य ।’ यावरून अंबर अंबरखान–याकुत अंबरखान–हुसेन अंबरखान अशी कुलपरंपरा दिसते. हे अंबरखान घराणे दौलताबाद येथे निजामशाहीच्या सेवेत असावे, कारण चिमणगाव ( जि. सातारा) येथील दिवाकर घराण्याच्या जोस-कुलकर्णपणाच्या वादाचा निवाडा दौलताबादच्या अंबरखाननामक अधिकाऱ्याने केल्याची नोंद सनदपत्रात आहे. सतराव्या शतकातील प्रसिद्ध संत रमावल्लभदास यांच्या चरित्रातही अंबरखान यांचा उल्लेख असून त्यांचे वडील अंबाजीपंत हे दौलताबादेस अंबरखान यांच्या पदरी नोकरी करीत होते. यावरून दौलताबादच्या निजामाच्या सेवेत असणारे अंबरखान हेच हुसेन अंबरखान यांचे वडील याकुत अंबरखान असावेत, असे प्रसिद्ध संशोधक-समीक्षक रा. चिं. ढेरे यांचे मत आहे. चांद बोधले, जनार्दनस्वामी, अंबाजीपंत हे हिंदू संत दौलताबाद येथे याकुत अंबरखान यांच्या आश्रयाने आपली पारमार्थिक सेवा करीत असत. हुसेन अंबरखान हे अशा पारमार्थिक वातावरणात वाढले. त्यामुळे त्यांच्या मनावर हिंदू साधूंच्या सान्निध्याचे दृढ संस्कार झाले असावेत.

हुसेन अंबरखान हे अंबरहुसेनी ही गीताटीका रचण्यास का उद्युक्त झाले, हे त्यांनी गीताटीकेच्या पहिल्या अध्यायातील दोन ओव्यांमध्ये स्पष्ट केले आहे. गीतेचा केवळ भावार्थ (तात्पर्यार्थ) जाणून घेण्यासाठी त्यांनी ही गीताटीका रचली. त्यामुळे या गीताटीकेचे स्वरूप गीताभावार्थदीपिका असे असून हे त्यांच्या ग्रंथाचे नाव नाही. ‘अच्युताश्रम निवृत्तीनाथादिकी। गीतेचिया प्रतिश्लोकी । केली ओवी येकियेकि । परि श्लोकार्थ संपूर्ण नसे ।’ या त्यांच्या ओवीमध्ये अच्युताश्रम (१५४८–१६१३), निवृत्तिदेव (१५७८–१६२८) या भगवद्गीता टीकाकारांचे उल्लेख आहेत. तसेच ‘भाष्य शंकराचार्यांचे। आणि व्याख्यान श्रीधरस्वामींचे। पाहोनिया टीका भगवद्गीतेची। महाराष्ट्र भाषेने कीजे।’ या ओवीमध्ये शंकराचार्यांचे भाष्य आणि  श्रीधरस्वामींचे व्याख्यान यांच्या आधारे ही गीताटीका महाराष्ट्र भाषेत रचली, असे ते म्हणतात. मूळ संस्कृत शब्दार्थ त्यांनी अगदी सहज व सोप्या रीतीने मराठीत आणले. यावरूनहुसेन अंबरखान हे संस्कृतपंडित व व्युत्पन्न मराठीचेही सखोल अभ्यासक असावेत, असे दिसते. ‘मेलासि तरी स्वर्ग पावसी। जिंकोनि तरि पृथ्वी भोगिसी । म्हणौनि कौंतेया उठि युद्धासी । कृतनिश्चये॥’ या त्यांच्या ओवीवरून त्यांचे प्रभावी टीकासामर्थ्य प्रत्ययास येते. या गीताटीकेचा रचनाकाल पुढील पंक्तींत व्यक्त झाला आहे : शके पंधरासे पंचहातरि। विजय नाम संवत्सरी। अश्विन शुद्ध दशमी सोमवारि। अंबरहुसेनी टीका संपूर्ण झाली॥ १८.८६॥ यात त्यांनी आपल्या टीकेचे नाव अंबरहुसेनी असे दिले असून अध्यायाच्या शेवटी पुष्पकांमध्ये ‘इति श्रीमदंबरहुसेनविरचितायां अंबरहुसेनी नामिकाया श्रीभगवद्गीता टीकायां…’ असा उल्लेख केला आहे. ही गीताटीका पूर्ण झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच तिची एक प्रतचंजी (तंजावर) येथे उतरली गेली. त्यावरून हुसेन अंबरखान यांचेवास्तव्य चंजी येथे असावे आणि तेथेच ही गीताटीका रचली असावी, असे अनुमान काढले जाते. ‘संतवाङ्मयाच्या अभ्यासकांना संस्कृत गीतेचा मराठी अवतार घडविणारा आणि गणेशवंदन करणारा हा मुसलमानसाधू धार्मिक क्षेत्रातील भेदाभेदांच्या आग्रहाचा नाश करून अद्वैताच्या अधिष्ठानावर उभा आहे’, असे रा. चिं. ढेरे यांनी म्हटले आहे.

संदर्भ :

  • ढेरे, रा. चिं. मुसलमान मराठी संतकवी, पुणे, २००८.