घोळ ही औषधी वनस्पती पोर्चुलॅकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पोर्चुलॅका ओलेरॅसिया आहे. याच प्रजातीतील सन प्लँट (पो. ग्रँडिफ्लोरा) या वनस्पतीला सामान्यपणे रोझ मॉस किंवा मॉस रोझेस असेही म्हणतात. जगभर या वनस्पतीचा प्रसार झालेला असून काही देशांमध्ये ती शेतात व बागेत तणाप्रमाणे पसरत वाढते. जगभरातील उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांत ही वाढते. या प्रजातीच्या साधारण १०० जाती असून सु. ४० जातींची लागवड केली जाते.
घोळ: पाने व फुलांसहित

घोळ ही एक रसाळ व वर्षायू वनस्पती असून सु. ४० सेंमी. पर्यंत उंच वाढते. खोड व पेर फुगीर असून ते लाल असते. पाने साधी, लहान, मांसल, बिनदेठाची, अंडाकार, तळाशी निमुळती, एकाआड एक व समोरासमोर असतात. पानांच्या कडा लालसर असतात. फुले लहान, पिवळी, बिनदेठाची व फांद्यांच्या टोकाला झुपक्यांनी येतात. बोंड लहान, झाकण असलेले (करंडकासारखे) व अनेकबीजी असते. वाळल्यावर झाकण निघून पडते.

घोळाची पाने चवीला आंबट आणि खारट असतात. ही वनस्पती थंडावा देणारी असून स्कर्व्ही रोगावर आणि यकृताच्या तक्रारीवर तिचा आहारात समावेश करतात. घोळाच्या पानांची भाजी करतात. भाजणे, पोळणे, केसातील कोंडा व त्वचारोग इत्यादींवर बिया आणि पानांचे पोटीस बांधतात. खोडाचा रस घामोळी व हातापायाच्या जळजळीवर लावतात. इतर कोणत्याही पालेभाजीच्या तुलनेत घोळाच्या पानांमध्ये ओमेगा – ३ प्रकारची मेदाम्ले अधिक प्रमाणात असतात. या वनस्पतीमध्ये , आणि समूह जीवनसत्वे  तसेच मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम आणि कॅरोटीन असते. घोळातील दोन प्रकारच्या बीटालॅनीन रंगद्रव्यांमुळे या वनस्पतीचे खोड लाल, तर फुले पिवळी असतात. ही रंगद्रव्ये प्रतिऑक्सिडीकारके आहेत. पतंग आणि फुलपाखराच्या काही जातींच्या अळ्या या वनस्पतींवर  वाढवितात.