कोणत्याही भौगोलिक माहितीचे संग्रहण, संकलन, संघटन आणि विश्‍लेषण करणाऱ्या संगणकीय प्रणालीला भौगोलिक माहिती प्रणाली म्हणतात. पृथ्वीवरील कोणत्याही स्थळाची भौगोलिक माहिती मिळविणे, साठविणे, तिची मांडणी करणे आणि तिचे सादरीकरण करणे ही या प्रणालीची कार्ये आहेत. या प्रणालीमध्ये एखाद्या स्थानासंबंधी कोणतीही माहिती साठविता येते आणि त्यासाठी संगणकांचा वापर केला जातो. अशा संगणकांमध्ये त्या स्थानांसंबंधी मिळालेली सर्व माहिती साठविता येईल आणि माहितीचे विश्‍लेषण करता येईल, अशी आज्ञावली (सॉफ्टवेअर) असते. प्राथमिकत: अशा प्रणालीत एखादे स्थान हे त्या स्थानाचे अक्षांश-रेखांश आणि समुद्रसपाटीपासूनची उंची अशा निर्देशकांनी ठरविले जाते आणि ते स्थान ओळखण्यासाठी देश, राज्य, प्रदेश, पिन क्रमांक इ. माहितीची नोंद केली जाते. तसेच तेथील हवामान, भूरूपे, लोकसंख्या, वाहतुकीचे मार्ग, वन्यजीव इ. माहिती साठविली जाते. जे भौगोलिक घटक त्या प्रणालीच्या उपभोक्त्यांना गरजेचे वाटतील अशा बहुविध घटकांची माहिती या प्रणालीत असते. या ‍माहितीवर आवश्यक ते संस्करण केले जाते, तिची योग्य मांडणी केली जाते आणि नकाशे, तक्ते, आलेख, आकृत्या व मजकूर इ. स्वरूपात ती सादर केली जाते. याच प्रमाणे एखाद्या प्रदेशातील पर्जन्य, तापमान, वनस्पती, प्राणी, जमीन इ. घटकांची माहिती; त्याचबरोबर एखाद्या प्रशासकीय विभागानुसार त्या भागातील लोकसंख्या, उत्पन्न, आरोग्य व शिक्षण अशा बाबींची माहिती भौगोलिक माहिती प्रणालीत असू शकते.

एखाद्या शहरातील अपशिष्टाची विल्हेवाट लावण्यासाठी कोणता प्रदेश सोयीचा किंवा योग्य आहे, हे ठरविण्यासाठी अभियंता, व्यवस्थापक व नियोजक यांना या भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग होतो. त्यांना जो प्रदेश सोयीचा वाटतो, त्या प्रदेशातील भूविज्ञान स्थिती, लोकसंख्या, पाणी इत्यादींची माहिती ते या प्रणालीद्वारे मिळवितात. त्यानुसार विषारी अथवा त्याज्य घटकांची विल्हेवाट लावण्यासाठी मानवी वस्ती व पाण्याचे स्रोत यांपासून दूर असलेला प्रदेश ते निवडतात.

भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग करून नकाशाकार अचूक नकाशे तयार करतात. अभियंते, नियोजक व विकासक या नकाशांचा अभ्यास करून नागरी वस्ती, रस्ते, रुग्णालये, वाहतुकीच्या सुविधा, उद्योग, ऊर्जानिर्मिती केंद्रे आणि इतर संरचना इत्यादींसाठी योग्य ते स्थान ठरवू शकतात. पर्यावरणातील सजीव व त्यांच्यात झालेले बदल यांची नोंद ठेवण्यासाठी, तसेच वन संसाधनांमध्ये निर्वनीकरणामुळे झालेली घट, क्षेत्र व त्याचे प्रमाण यांसंबंधी माहिती मिळविण्यासाठीही भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग होतो. विशेषेकरून दुर्गम प्रदेशांतील वने व तेथील वन्यजीव यांसंबधी माहिती मिळविण्यासाठी संसाधन व्यवस्थापक या प्रणालीचा वापर करतात. पर्यावरणपूरक योजना राबविण्यासाठी या प्रणालीचा उपयोग शासकीय अधिकारी करतात. तसेच व्यापारी, सेनाधिकारी व वैज्ञानिक आपापल्या क्षेत्रांच्या विकासासाठी अशा प्रणालींचा उपयोग करून घेत असतात.

भौगोलिक माहिती प्रणालीत स्थानानुसारच्या माहितीला काळानुसारच्या माहितीची जोड दिल्यास संशोधक, प्रशासक व नियोजनकर्ते यांना त्याचा उपयोग होतो. उदा., पोलीस यंत्रणा एखाद्या क्षेत्रातील गुन्हेगारीचे प्रमाण पाहून कोणत्या भागात अधिक सुरक्षा पुरवायला हवी, याचा निर्णय घेऊ शकते. लोकसंख्येत झालेली वाढ आणि पाण्याचा साठा यांची तुलना करण्यासाठी या प्रणालीचा वापर वैज्ञानिक करू शकतात. या प्रणालीत संगणकीय मसुद्याप्रमाणे (प्रोटोकॉल) माहिती जमा केली की, त्यापासून विविध तपशील शोधता येतात. उदा., शहराच्या एखाद्या भागात किती दवाखाने किंवा शुश्रूषागृहे आहेत, किती महाविद्यालये आहेत, किती शाळा आहेत यांसंबंधी माहिती मिळविता येते. तसेच शहराच्या कोणत्या भागात पावसाचे पाणी साचते किंवा एखाद्या नदीच्या किनारी असलेल्या शहरात पुरामुळे कोणती घरे व उद्योग बाधित होऊ शकतात, हेही पाहता येते.

डॉ. रॉजर टॉम्लिन्सन यांनी १९६० मध्ये कॅनडाच्या शासनासाठी पहिली भौगोलिक प्रणाली विकसित केली. तिचा वापर मृदा, कृषी, वन्यजीव, मनोरंजन व वनविभाग यांच्यातर्फे करण्यात आला. ‘गुगल अर्थ’ या जगभर वापरल्या जाणाऱ्या संगणकीय उपयोजनामागे अशीच भौगोलिक माहिती प्रणाली आहे. त्या उपयोजनात आंतरराष्ट्रीय उपग्रहांद्वारे आणि हवाई छायाचित्रणाद्वारे मिळविलेल्या प्रतिमांचा वापर करून सर्व स्थानिक ‍तपशिलांनी युक्त अशी आभासी पृथ्वी निर्माण करण्यात आली आहे.

भारतात राष्ट्रीय भौगोलिक माहिती प्रणाली संघटन या संस्थेच्या वतीने त्या प्रणालीच्या वापरासंबंधीची कार्यपद्धती ठरविली जाते आणि ती अमलात आणली जाते. या संस्थेची धोरणे पुढीलप्रमाणे आहेत: (१) भारतीय सर्वेक्षण संस्थेतर्फे तयार केल्या जाणाऱ्या नकाशांची व्याप्ती, वितरण आणि उपलब्धता निश्‍चित करणे; (२) हवाई छायाचित्रण व भूभौतिकीय सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांना उड्डाणासाठी परवानगी प्रक्रिया ठरविणे; (३) उपग्रहाद्वारे घेतलेल्या प्रतिमांचे वितरण होण्यासाठी प्रक्रिया सुधारणे; (४) राज्यांची भूस्थानिक माहितीच्या उपलब्धतेसाठी व वापरासाठी धोरणे निश्‍चित करणे आणि (५) लोकसहभागातून जमलेली माहिती सर्वांना खुली करणे.

भारतात प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक घटकांमध्ये विविधता असल्यामुळे अनेक प्रकारांची आव्हाने आहेत. त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि समाजाचा विकास साधण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग विविध क्षेत्रांत केला जात आहे. अनेक उद्योजक त्यांच्या नवीन व्यवसायाची जागा शोधण्यासाठी आणि जीवशास्त्रज्ञ प्राण्यांच्या स्थलांतरणाचा मागोवा घेण्यासाठी ही प्रणाली वापरतात. भूकंप किंवा वादळासारखी नैसर्गिक आपत्ती उद्‌भवल्यास आपद्ग्रस्तांना मदत पाठविण्यासाठी ही प्रणाली वापरता येते. कोणते ठिकाण धोक्याचे आहे, कोणत्या ठिकाणी आपद्ग्रस्तांना आसरा देणे शक्य आहे व वाहतुकीसाठी कोणता मार्ग खुला आहे अशी माहिती मदत पोहोचविणाऱ्या अधिकाऱ्यांना या प्रणालीद्वारे पाहता येते. भारतात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्रतिमा मिळविण्यासाठी आयआरएस (इंडियन रिमोट सॅटेलाइट) प्रकारचे कृत्रिम उपग्रह वापरतात. भारतात १९८० पासून भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर सुरू झाला आणि २००० नंतर या प्रणालीमध्ये प्रचंड प्रमाणात प्रगती झाली. कृषिक्षेत्र, आपत्ती-व्यवस्थापन, ई-प्रशासन, हवामान, वने, ग्रामीण विकास, समाजोपयोगी जलस्रोत इत्यादींसंबंधी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी भारत शासनातर्फे या प्रणालीचा वापर केला जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा