मत्स्य वर्गाच्या सायनिडी कुलात घोळ माशाचा समावेश होत असून त्याचे शास्त्रीय नाव प्रोटोनिबिया डायकँथस आहे. घोळ मासा आणि त्याची पिले कच्छच्या आखातापासून मुंबईपर्यंतच्या समुद्रात सापडतात.

घोळ मासा : प्रोटोनिबिया डायकँथस

घोळ माशाची लांबी १५० ‒१८० सेंमी. व वजन १०‒१५ किग्रॅ. पर्यंत असते. शरीर काहीसे चपट आणि लांबट असते. सर्व शरीरावर खवले असतात. मुस्कट लांब व टोकदार असते. पृष्ठपर जरासे जोडलेले असून त्यांचा पुच्छपर लांबट व निमुळता असतो. गुदपरावरील दुसरा काटा लांबट व जाडसर असतो. शरीरपोकळीतील वाताशय मोठे असते. जठरातील स्नायू वाताशयावर आपटून ते ओरडल्यासारखा घोगरा आवाज काढतात. हा आवाज ड्रम वाजविल्यासारखाही वाटतो. त्यामुळे त्यांना ‘ड्रमर फिश’ असेही म्हणतात. हा आवाज कर्कश  अथवा खर्जातील आवाज काढल्यासारखा वाटतो म्हणून त्याला क्रोकर फिश असे नाव आहे.

घोळ मत्स्याहारी असून कोळंबी हे त्याचे मुख्य अन्न आहे. तो लहान अस्थिमत्स्य उदा., तरळी, बांगडा, बोंबिल खातो. याशिवाय त्याच्या आहारात कवचधारी संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी, वलयीकृमी इत्यादी  समुद्रतळातील प्राणी असतात. लहान वयात ते झिंगे व कोळंब्या खातात. मोठे झाल्यावर ते अस्थिमत्स्य खातात. घोळ सात ते आठ वर्षे जगतो.

घोळ ३ ते ४ वर्षांनंतर प्रजननक्षम होतात. घोळाची मादी थोडया-थोडया  दिवसांच्या अंतराने गटागटाने ५० ते ७० लाख अंडी घालते. जून ते ऑगस्ट महिन्यात मादी मोठया  संख्येने अंडी घालते. हा मासा प्रामुख्याने समुद्रतळाशी वास्तव्य करीत असल्याने ट्रॉलनेटच्या साहाय्याने ते पकडले जातात. रत्नागिरीजवळ ‘जोत’ प्रकारचे जाळे खास घोळ पकडण्यासाठी वापरतात.

घोळाचे मांस पांढऱ्या रंगाचे असते. त्यातून काटे सहज काढता येतात. त्याच्या मांसाचे तुकडे गोठवून निर्यात केले जातात. कोथ (ओटोलिथॉइडिस ब्य्रुनियस) हा घोळाच्या कुलातील एक मासा. त्याची शरीररचना घोळाप्रमाणे असते. महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्रात हे दोन्ही मासे आढळतात. या दोन्ही माशांच्या वाताशयाला विशेष मागणी असते. सुकविलेल्या वाताशयापासून ‘आयसिंग्लास’ हा पदार्थ तयार करतात. वाइन व व्हिनेगर स्वच्छ व नितळ करण्यासाठी हा पदार्थ वापरतात.

This Post Has One Comment

  1. उत्तम उपयोगी विवरण। शब्दा कहा अर्थ माहिती साठी उपयोगी असेल असे वाटते

प्रतिक्रिया व्यक्त करा