माणसाळलेल्या प्राण्यांमध्ये जगभरात मोठ्या संख्येने असलेला प्राणी. स्तनी वर्गाच्या समखुरी (आर्टिओडॅक्टिला) गणाच्या गोकुलातील बोव्हिनी उपकुलात गायीचा समावेश होतो. हा रवंथ करणारा आणि पोकळ शिंगे असलेला शाकाहारी प्राणी आहे. गाय-बैल या प्राण्यांची दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि मांस मिळविण्यासाठी, शेतीकामासाठी आणि वाहतुकीसाठी ‘पशुधन’ म्हणून जोपासना केली जाते. त्यांच्या मलमूत्रापासून इंधन आणि खत अशी उत्पादने मिळतात. मृत प्राण्यांच्या त्वचेपासून कातडे कमावले जाते. २००९ साली जगभरातील पशुधनाच्या मोजणीनुसार त्यांची संख्या सु. १३० कोटी आढळली आहे. भारतात सु. २८ कोटीहून अधिक पशुधन असून याबाबतीत जगात भारताचे स्थान पहिले आहे. गायीचा जनुक-नकाशाही २००९ साली तयार करण्यात आलेला आहे.

गाय-बैलांचे वशिंडधारी आणि वशिंडरहित असे दोन प्रकार असून त्यांची शास्त्रीय नावे अनुक्रमे बॉस इंडिकस आणि बॉस टॉरस अशी आहेत. वशिंडधारी गाय भारतीय उपखंडात निर्माण झाली आणि तेथून खुष्कीच्या मार्गाने तिचा प्रसार आफ्रिकेपर्यंत झाला. वशिंडरहित गायींचा प्रसार प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधात झाला. भारतात दोन्ही प्रकारच्या गायी आढळतात.

वशिंडधारी 

गाय

या प्रकारच्या गाय-बैलांत डोके लांबट, कपाळ अरुंद, कान लोंबते किंवा टवकारलेले, टोकदार आणि गळपोळे (विशेषकरून बैलामध्ये) मोठे असते. विशेष म्हणजे मानेच्या जरा मागील बाजूला वशिंड असते. पाठ खांद्याजवळ उंच असून वशिंडामागे तिला उतार असतो आणि कंबरेजवळ पुन्हा उंची वाढते. शरीर अरुंद असून पाय लांब असतात. पूर्ण वाढलेल्या गायीचे वजन २५० – ४०० किग्रॅ. असून ते मंद गतीने वाढते. कालवडी साधारणपणे २७ ते ३० महिन्यांच्या झाल्यावर माजावर येतात व गाभण राहू शकतात आणि ३६ ते ४२ महिन्यांच्या सुमारास पहिल्यांदा वितात. गर्भावधी नऊ महिन्यांचा असतो. एका वेळेस बहुधा एकच वासरू जन्माला येते. कास अर्धगोलाकार असून सड आकाराने सारखे नसतात. दूध साधारण प्रतीचे असून हवेचे तापमान ३५ से.च्या वर गेल्यास दुधातील प्रथिने व शर्करा यांचे प्रमाण कमी होते. शेपूट लांब असून त्याच्या टोकाला लांब केसांचा गुच्छ असतो. गोमाश्या, गोचिडांसारखे कीटक किंवा पक्ष्यांना हाकलण्यास शेपटाचा उपयोग होतो. यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. उष्ण कटिबंधातील पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी वशिंडधारी प्राण्यांत अनुकूलन झालेले असते. मानेखाली, छातीखाली व पोटाखाली त्वचा लोंबती असते. त्वचेत घर्मग्रंथी भरपूर असल्यामुळे घाम खूप येतो.

वशिंडरहित

या प्रकारच्या गायी-बैलांत डोके आखूड, कपाळ रुंद  व कान गोलाकार असून ते डोक्याला आडवे दिसतात. वशिंड नसल्यामुळे पाठ खांद्यापासून सरळ पातळीत असते आणि कंबरेपासून शेपटाच्या मुळापर्यंतचा भाग पाठीच्याच पातळीत असतो. शरीर रुंद असून पाय आखूड असतात. पूर्ण वाढलेल्या गायीचे वजन ४०० – ९०० किग्रॅ. असून वजन वेगाने वाढते. कालवडी साधारणपणे १४ ते १६ महिन्यांच्या झाल्यावर माजावर येतात व गाभण राहू शकतात आणि २४ ते ३० महिन्यांच्या सुमारास पहिल्यांदा वितात. कास मोठी व लांब असून सड आकाराने सारखे असतात. दूध चांगल्या प्रतीचे असून हवेचे तापमान २४ से.च्या वर गेल्यास दुधातील प्रथिने व शर्करा यांचे प्रमाण कमी होते. त्वचेत चरबी अधिक आणि घर्मग्रंथी कमी असल्यामुळे घाम कमी येतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता तेवढ्या सहजपणे बाहेर निघून जात नाही. यांची रोगप्रतिकारशक्ती साधारण असते.

गायींची शिंगे पोकळ असतात. जिवंतपणी शिंगांवर केराटीनचे आवरण असते. शिंगांना फाटे फुटत नाहीत व ती झडतही नाहीत. शिंगे इतर प्राण्यांना किंवा व्यक्तीला लागून इजा होऊ नये म्हणून काही जण ती कोवळ्या वयातच (सु. ३ आठवडे) रसायने किंवा शस्त्रांनी काढून टाकतात.

गायीच्या जबड्यांत ३२ दात असतात. त्यांपैकी खालच्या जबड्यात समोर ८ दात तर मागील बाजूला वरच्या आणि खालच्या जबड्यांत प्रत्येकी १२ दाढा असतात. तिच्या जबड्यांत पटाशीचे दात नसतात. म्हणून गाय डोके हलवून गवत उपटते आणि नंतर दाढांनी चर्वण करते. दाढांवर उंचवटे असल्यामुळे चर्वण करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.

गायीच्या मागील पायांच्या मध्यभागी परंतु पुढे लोंबणारे एक इंद्रिय असते. या इंद्रियाला कास म्हणतात आणि या कासेतच दुधाच्या ग्रंथी असतात. कासेचे चार भाग असून त्यांना सड म्हणतात. शेतकरी दूध काढतात तेव्हा सडांच्या स्तनांमधून दुधाच्या चिळकांड्या बाहेर पडतात.

गाय हा रवंथ करणार्‍या प्राण्यांपैकी एक प्राणी आहे. या प्राण्याचे जठर चार कप्प्यांचे असते. या कप्प्यांना रोमंथिका, जालिका, भंजिका आणि जठरिका अशी नावे आहेत. अशा प्रकारच्या जठरामुळे गिळलेले अन्न चर्वण करण्यासाठी पुन्हा त्यांना तोंडात आणता येते आणि नंतर गिळता येते. रोमंथिकेत वाढलेले सूक्ष्मजीव (जीवाणू, आदिजीव व कवके) अन्नातील जटिल कर्बोदकांचे (सेल्युलोज व हेमीसेल्युलोज) पचन घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. याखेरीज हे सूक्ष्मजीव प्रथिने आणि बी-समूह जीवनसत्त्वांची निर्मिती करतात.

हे प्राणी अन्न (गवत) खातात तेव्हा ते केवळ गिळण्यापुरतेच चावले जाते आणि गिळले जाते. हे अन्न ग्रासनळीतून रोमंथिकेत जाते. रोमंथिका आणि भंजिका या भागांत हे अन्न साठवले जाते. काही वेळाने अन्न मिसळून मऊ झाल्यानंतर जठराच्या स्नायूंमार्फत ते परत प्राण्यांच्या तोंडात पाठवले जाते. हे अन्न चावून-चावून बारीक केले जाते आणि पुन्हा गिळले जाते. गिळलेले अन्न पुन्हा रोमंथिका आणि जालिका या भागांमध्ये येते आणि त्यावर सूक्ष्मजीवांमार्फत पचनाच्या पुढील रासायनिक क्रिया घडून येतात. या पचनक्रियांतून प्रामुख्याने बाष्पनशील मेदाम्ले तयार होतात. या आम्लांत, अ‍ॅसिटिक आम्लाचे प्रमाण सर्वाधिक असून त्याखालोखाल प्रोपिऑनिक, ब्युटिरिक आणि वॅलेरिक ही आम्ले असतात. ही आम्ले रोमंथिकेच्या भित्तिकेतून रक्तप्रवाहात शोषली जातात. खाल्लेल्या अन्नापासून ६५ ते ७५ कॅलरी ऊर्जा उपलब्ध होते. नंतर हे अन्न आणि द्रव पदार्थ पुढे भंजिकेत ढकलले जातात. भंजिकेत अन्नातील पाणी शोषले जाते आणि अन्न जठरिकेत येते. जठरिकेच्या भित्तिका पाचकरसाची निर्मिती करतात. शर्करा आणि स्टार्चसारख्या कर्बोदकांचे पचन या पाचकरसांमार्फत होते. जठरिकेला ‘खरे जठर’ म्हणतात, कारण ते बिगररवंथी प्राण्यांच्या जठराप्रमाणे कार्य करते. जठरापासून अन्न आतड्यात पोहोचल्यानंतर जठरिकेत तयार झालेल्या उत्पादितांचे शोषण होऊन अन्नपचनाची क्रिया पूर्ण होते.

भारतीय कृषिव्यवसायात गाय-बैलांना विशेष स्थान आहे. कृषिव्यवसायातील मनुष्याच्या आहाराच्या दृष्टीने अखाद्य पदार्थांवर गाय-बैल उपजिविका करतात. गवत, कडबा, धान्याचे दाणे काढल्यावर उरलेला कणसाचा भाग असे पदार्थ खाऊन गायी प्रथिनयुक्त दूध देतात. त्यांचे चरणे गवताच्या वाढीसाठी उपयोगी असते. यांच्या गवत तोडण्यामुळे त्याची मुळे जमिनीला पकडून राहतात. यासाठी गायराने व चराऊ कुरणे राखून ठेवतात. रवंथ करणार्‍या जनावरांच्या पोटात जीवाणूंमार्फत होणार्‍या क्रियेतून मिथेन वायू निर्माण होतो आणि त्यांच्या हंबरण्यामुळे वातावरणात मिसळतो. गोबर वायू आणि खत तयार करण्यासाठी त्यांच्या मलमूत्राचा वापर होतो. शेतीकामासाठी गाय-बैलांचा उपयोग होतो. यांमुळे गाय आणि मानव यांचे अतूट नाते जोडले  गेले आहे. गायीचे मांस खाल्ले जाते. तसेच त्यांचे कातडेही उपयोगात आणले जाते. आयुर्वेदात गोमूत्राचे औषधी गुण वर्णिले आहेत.

जगातील सर्व भागांत गाय-बैलांचे उत्पादनक्षमतेनुसार आणि वापरानुसार वर्गीकरण केले जाते. भारतात दुधाळ, शेतीकामास उपयोगी व उभयांगी (दुधाळ व शेतीकामास उपयोगी) असे आणि पाश्चात्त्य देशांमध्ये दुधाळ, मांसोत्पादक व उभयांगी (दुधाळ व मांसोत्पादक) असे वर्गीकरण करतात.  भारतातील दुधाळ जातींच्या गायी धिप्पाड असून त्यांचे गळपोळे लोंबते व पोट विस्तृत असते. गीर, देवणी, शाहिवाल व सिंधी या दुधाळ गायी आहेत. शेतीकामाला उपयोगी असलेल्या गायी फारसे दूध देत नाहीत. मात्र बैल शेतीच्या व  वाहतुकीच्या कामासाठी अत्यंत उपयोगी असतात. नागोरी, हळ्ळीकर, अमृतमहाल, खिलार, माळवी, कंगायम, पोनवार व सिरी या जातींच्या गायी कमी दूध देतात. मात्र या जातीचे बैल शेतकामासाठी व वाहतुकीसाठी उपयोगी असतात. ओंगोल, कांक्रेज, कृष्णाकाठी, डांगी, थरपारकर, हरियाणा, नेमाडी व राठी या गायींच्या उभयांगी जाती आहेत.

भारतात दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गाय-बैलांच्या डेअरी शॉर्टहॉर्न, आयर्शर व होल्स्टीन फ्रिजियन, जर्सी, ब्राऊन स्विस व रेड डॅनिश या पाश्चात्त्य जाती आयात करण्यात आल्या. सर्व पाश्चात्त्य गायी वशिंडरहित आहेत. भारतातील दुधाळ जातींच्या दुधात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने वरील पाश्चात्त्य जातींच्या संकराने संकरित गायींची पैदास करण्यात येत आहे.

भारतात गायींच्या मांसलजाती खासकरून निर्माण केल्या जात नाहीत. मात्र अमेरिकेत भारतातील कांक्रेज, गीर, ओंगोल इ. जाती आयात करून निरनिराळ्या जाती निर्माण केल्या जात आहेत. अ‍ॅबर्डीन अँगस, हरफर्ड, रेड पाल, शॉर्टहॉर्न (सर्व ब्रिटन), शार्लोटा (फ्रान्स) व बाह्मण (अमेरिका) ही काही मांसल जातींची उदाहरणे आहेत.

गाय-बैलांना विषाणुजन्य, जीवाणुजन्य, कवकजन्य आणि कृमिजन्य रोग होतात. याखेरीज या जनावरांना पोटफुगी, नाळीचा रोग, खांद येणे, वार अडकणे, शिंगे भिरडणे, लाळ रोग, खूरखूत, परिहृदयशोथ, ग्रासिकेत अटकाव, मूतखडा, फ्ल्युओरिन विषबाधा, फर्‍या रोग, सांसर्गिक काळपुळी असे नैमित्तिक आजार होतात. त्यातील काहींमुळे मृत्यू येतो तर काहींमुळे दूध कमी होणे, शेतकामाची शक्ती कमी होणे इ. परिणाम घडतात. मागील काही दशकांत जनावरांसाठी प्रथमोपचार केंद्रे उपलब्ध झाल्यामुळे या आजारांवर कमी वेळात औषधोपचार करणे शक्य झाले आहे.

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा