आरोही वेल

काही लांब, पातळ आणि लवचिक खोडे असलेल्या वनस्पती वाढीसाठी इतर वनस्पतींच्या, खडकाच्या किंवा इतर आधाराच्या मदतीने वर चढतात. अशा वनस्पतींना सामान्यपणे ‘आरोही वनस्पती’ म्हणतात. या वनस्पतींमध्ये आधाराला घट्ट पकडण्यासाठी खास अंगे असतात किंवा लवचिक खोडांद्वारे त्या आधाराला गुंडाळून घेतात. आयव्ही आणि बिटरस्वीटसारख्या काही वनस्पती आधार नसताना झुडपे म्हणून वाढतात; परंतु, आधार मिळताच त्या वेलींप्रमाणे वर चढतात. काही वनस्पती आधार ऊतींमध्ये फारशी ऊर्जा वाया न घालविता व आधाराला पकडून किमान ऊर्जेत सूर्यप्रकाशापर्यंत पोहोचतात, तर काही वनस्पती प्रकाशापासून दूर जात वाढतात. अशा वनस्पती झाडांच्या बुंध्यापर्यंत वाढतात व तेथून त्या वर चढून प्रकाशापर्यंत पोहोचतात. आरोही वनस्पतींचे वैशिष्ट्य म्हणजे लांबीच्या दिशेने भरभर वाढणारे प्ररोह. या प्ररोहांमधील लांब व रुंद वाहिन्यांमुळे पाणी ३०० मी. उंचीपर्यंतही पोहोचल्याचे आढळते. आधाराकरिता जी अंगे वापरली जातात त्यांनुसार आरोही वनस्पतींचे पुढील प्रकार ओळखले जातात:

(१) मूळ-आरोही वनस्पती : अशा वनस्पती लहान आगंतुक मुळांच्या आधारे वर चढतात. या वनस्पतींची चिकट मुळे आधाराला पंजाप्रमाणे घट्ट पकडतात किंवा चिकट रस स्त्रवतात (उदा., नागवेल, पिंपळी, पोथॉस, आयव्ही, इंडियन आयव्ही इ.)

(२) अंकुश-आरोही वनस्पती : आधाराला पकडून ठेवण्यासाठी या वनस्पतींमध्ये वेगवेगळे प्रकार आढळतात. काही वनस्पती काटे किंवा शूक यांद्वारे आधाराला घट्ट पकडून ठेवतात. काही वनस्पतींमध्ये हे काटे किंचित वळलेले असल्यामुळे त्यांना आकडीसारखा आकार आलेला असतो. उदा., वेतामध्ये पर्णाच्छदापासून एक बारीकसा, लांबलचक देठ वाढलेला आढळतो. या देठावर अनेक तीक्ष्ण आकडीसारखे काटे असतात. हिरव्या चाफ्यामध्ये फुलाच्या देठाचा आकार आकडीसारखा वळलेला दिसतो. आरोही गुलाब आणि पिसोनिया या वनस्पतींमध्ये वर चढण्यासाठी आणि स्वसंरक्षणासाठी अनेक बाकदार शुके असतात. सर्व बागांमध्ये आढळणारी बोगनवेल आणि अंकारिया वळलेल्या आकडींद्वारे वर चढतात.

(३) प्रतान-आरोही वनस्पती : काही वनस्पतींमध्ये आधाराला पकडण्यासाठी पातळ, पर्णहीन व वेटोळाकृती संरचना आढळते. या संरचनेला ‘प्रतान’ असे म्हणतात. आधाराभोवती या वनस्पती स्वत:ला गुंडाळून घेतात आणि भार सांभाळत वर चढतात. काही वनस्पतींमध्ये खोडाचे रूपांतर प्रतानांमध्ये झालेले आढळते (उदा., कुष्णकमळ, कपाळफोडी), तर काही वनस्पतींमध्ये पानांचे रूपांतर प्रतानांमध्ये झालेले आढळते (उदा. वाटाणा).

(४) पर्ण-आरोही वनस्पती : मोरवेल आणि लुतपुतिया यांच्या पानांचे देठ स्पर्शसंवेदी असून त्या लगतच्या कोणत्याही आधाराला गुंडाळून घेतात आणि वर चढतात. कळलावी वनस्पतीमध्ये आधारासाठी पानाचा शेंडा गुंडाळल्यामुळे तेथे प्रतानासारखी संरचना झालेली आढळते. घटपर्णी वनस्पतीत घटाचा देठ आधाराभोवती प्रतानांप्रमाणे गुंडाळला जातो, त्यामुळे घट सरळ उभा आढळतो.

भिंतीवर चढलेली वेल

(५) वल्लरी : यामध्ये लांबलचक, पातळ खोडे आणि फांद्या असलेल्या वनस्पतींचा समावेश होतो. या वनस्पती झाडे, झुडपे आणि कुंपणाला वळसा घालत वरवर चढतात (उदा., गारवेल, लाल चमेली). या वनस्पतींमध्ये वर चढण्यासाठी खास अंगे नसतात. काही वल्लरी आधाराभोवती घड्याळकाट्यांच्या फिरण्याच्या दिशेने स्वत:ला गुंडाळून घेतात, तर काही त्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात.

(६) लता : जाड आणि काष्ठरूपी खोडांच्या या बहुवर्षायू आरोही वनस्पती आहेत या वनस्पती प्रामुख्याने वनात आढळतात. सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी या वनस्पती स्वत:ला उंच झाडाभोवती गुंडाळून घेतात आणि शेंड्यांपर्यंत पोहोचतात. भरपूर सूर्यप्रकाशात या वनस्पतींना गर्द पालवी फुटते (उदा., माधवलता, चंबळ, लता- कांचन).