‘चाफा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सदाहरित वनस्पती वेगवेगळ्या कुलांतील असून त्यांपैकी काही एकदलिकित तर काही व्दिदलिकित आहेत. या वनस्पतींना विविध रंगांची फुले येतात आणि या फुलांना स्वत:चा खास सुगंध असतो. सर्व वनस्पतींमध्ये सुवासिकता व आकाराने मोठी असलेली फुले हे गुणधर्म समान आहेत. या वनस्पतिसमूहात आरोही, झुडूप व वृक्ष असे भिन्न प्रकार दिसून येतात. फुलांचे रंग व स्वरूप यांनुसार या वनस्पतींना पांढरा चाफा, कवठी चाफा, पिवळा चाफा, कनक चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा, भुईचाफा व नागचाफा अशी नावे पडली आहेत.
चाफाच्या फुलांचे विविध प्रकार

पांढरा चाफा (Temple tree)

पांढरा चाफा ही वनस्पती ॲपोसायनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव प्लुमेरिया ॲक्युटिफोलिया किंवा प्लुमेरिया ल्युब्रा आहे. ही वनस्पती मूळची मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि मेक्सिको येथील असून जगभरातील उष्ण प्रदेशांत तिचा प्रसार झालेला आहे. भारतात प्लुमेरिया प्रजातीच्या ७-८ जाती दिसून येतात. प्रत्येक जातीची पाने वेगळी असतात. या जाती बहुतांशी झुडूप किंवा लहान वृक्ष प्रकारात मोडतात. फांद्या वेड्यावाकड्या व पुन्हा पुन्हा विभागलेल्या असतात. साल खडबडीत असून तिला जखम झाल्यास पांढरा चीक बाहेर येतो. पांढऱ्या चाफ्याची पाने अरुंद व पन्हाळीसारखी असतात. मध्यशीर ठळक असून पानाच्या कडेच्या आत एक शीर असते. फुले रात्री उमलतात. त्यांचा सौम्य सुगंध परागणासाठी पतंगांना आकर्षित करतो. फुले येताना पाने झडून गेलेली असतात. भारतात फळे क्वचितच येतात. या वनस्पतीला खैर चाफा असेही म्हणतात.

कवठी चाफा (Bull bay)

कवठी चाफा हा वृक्ष मॅग्नोलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मॅग्नोलिया ग्रँडिफ्लोरा आहे. हा वृक्ष मूळचा अमेरिकेतील असून भारत, चीन, जपान इत्यादी देशांत लावलेला दिसतो. हा वृक्ष २८-३० मी. उंच वाढतो. त्याचे खोड उंच व मोठे असते. पाने साधी, गडद हिरवी, एकाआड एक, मोठी व १२-२० सेंमी. लांब असतात. पाने कडक चामड्यासारखी असून आकाराने अंडाकृती असतात. पानांच्या खालच्या भागावर हिरवट-पिवळी लव असते. फुले पांढरी, ३० सेंमी. पर्यंत मोठी, सुगंधी आणि व्दिलिंगी असतात. दलपुंजात ६-१२ पाकळ्या असतात. वसंत ऋतूच्या शेवटी फुले येतात. घोसफळे गुलाबी, अंडाकृती व मोठी असतात. खोड टणक असून फर्निचरसाठी उपयुक्त असते.

सोनचाफा (Yellow champa)

सोनचाफा हा एक सदापर्णी व शोभिवंत वृक्ष आहे. तो मॅग्नोलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मायकेलिया चंपका आहे. तो मूळचा भारत, इंडोनेशिया आणि त्यालगतच्या प्रदेशातील आहे. तो १५ ते ३० मी. उंच वाढतो. खोड मोठे असून त्याचा घेर ३.५ मी. असतो. साल करडी व जाड असते. पाने साधी, चिवट, पोपटी, लांब टोकाची व भाल्यासारखी असून कडा तरंगित असतात. फुले मोठी, सुवासिक, फिकट पिवळी अथवा नारिंगी छटेची, एकेकटी येतात. फुले व्दिलिंगी असून परिदले सु.१५ व सुटी असतात. घोसफळे अनेक असून प्रत्येक लहान फळ पेटिका फळ (शुष्क व एका शिवणीवर उघडणारे फळ) असून प्रत्येकात दोन किंवा अनेक बिया असतात.

वृक्षाचे लाकूड नरम, हलके व टिकाऊ असून ते पेन्सिलीपासून विमान व जहाज बांधणी यांसाठीही वापरतात. साल औषधी असून तिच्यामध्ये अल्कलॉइडे असतात, ती दालचिनीमध्ये भेसळ म्हणून वापरतात. फळे व फुले उद्दीपक, जंतुनाशक, पौष्टिक, कडू व थंड आहेत. फुले सुगंधी असल्याने अत्तरात व सुगंधी तेलात वापरतात. या फुलांपासून तयार केलेल्या अत्तराला जगभर मागणी असून ते महाग असते.

पिवळा चाफा( Hill champa)

पिवळा चाफा ही वनस्पतीही मॅग्नोलिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मायकेलिया निलगिरिका आहे. ही वनस्पती निलगिरी, अन्नमलई टेकडीच्या परिसरात सस.पासून १,५००-१,८०० मी. उंचीपर्यंत व सह्याद्रीच्या फार उंचीवरच्या प्रदेशात आढळते. सोनचाफा आणि पिवळा चाफा या वनस्पती मायकेलिया प्रजातीतील असून सोनचाफ्याहून ही आकाराने लहान असते. पाने लहान व फिकट असून त्यांवर रेशमी लव असते. फुले पिवळट पांढरी असून ती सोनचाफ्याच्या फुलांपेक्षा थोडी मोठी असतात. फळे लांबट आणि बिया लाल असतात. लाकूड कठीण, जड व टिकाऊ असते. घरबांधणी व सजावटीच्या सामानांकरिता ते वापरतात. साल व पानांत बाष्पनशील तेल असते. त्याला चंपक तेल म्हणतात. हे तेल अत्तरात सुगंधासाठी वापरतात.

कनक चाफा (Golden champa)

हा पानझडी वृक्ष ऑक्नेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ऑक्ना स्क्वॅरोजा आहे. १-३ मी. उंच वाढणारा हा वृक्ष मूळचा दक्षिण आफ्रिकेतील आहे. पाने साधी, ३-६ सेंमी. लांब, भालाकार व गडद हिरवी असून कडा दंतुर असतात. फुले पिवळी, मोठी, सुवासिक व असंख्य असून वसंत ऋतूमध्ये बहरतात. दलपुंजाच्या पाकळ्या फुले उमलल्याबरोबर पडून जातात. फळांची वाढ होत असताना निदलपुंजही वाढते. फळे ५-६ व लहान असून एकत्र येतात. मोठी झाल्यावर भडक लाल निदलपुंजाने वेढलेली, काळी फळे डोळ्यांसारखी दिसतात.

हिरवा चाफा (Green Champa)

हे एक आरोही झुडूप ॲनोनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव आर्टाबॉट्रिस ऑडोरॅटिसिमस आहे. ही जाती मूळची भारतातील आणि आशियातील आहे. हे सदाहरित झुडूप आधाराने वाढते आणि याची फुले हिरव्या रंगाची असतात. पाने साधी, गडद हिरवी, चकचकीत, एकाआड एक, आयत किंवा भाल्यासारखी असतात. फुले व्दिलिंगी व सुगंधी असून ती हिरवट पिवळी असल्याने दिसून येत नाहीत. फुलात तीन आत आणि तीन बाहेर अशा सहा जाड हिरव्या व सुगंधी पाकळ्या असतात. फुलाच्या देठाजवळ असलेल्या आकड्याच्या आधाराने ही वनस्पती वर चढते. फळे पिवळी असून गुच्छाने येतात. प्रत्येक फळात एक बी असते. फुलांपासून काढलेला सुगंधी अर्क तेलांत तसेच अत्तरांत वापरतात.

भुईचाफा (Champak)

ही वनस्पती आल्याच्या झिंजिबरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव केंफेरिया रोटुंडा आहे. ही वनस्पती मूळची दक्षिण-पूर्व आशियातील आहे. फुलोरा थेट जमिनीतून उगवल्यासारखा वाटतो म्हणून या वनस्पतीला भुईचाफा हे नाव पडले असावे. याचे खोड भूमिगत व कंद स्वरूपाचे असून हिवाळ्यानंतर पाने येण्यापूर्वीच फुले दिसून येतात. फुले सुगंधी, आकर्षक व पांढरी असून मोठी पाकळी जांभळट असते. फुलांचा बहर ४-५ आठवडे टिकतो. पाने साधी, मोठी व पन्हळी देठाची असतात. पाने वरून हिरवी असून खालचा भाग जांभळा असतो. बहर संपण्याच्या सुमाराला पाने गळून पडतात व नंतर पावसाळ्यात येतात. बोंडात अनेक बिया असतात. फुलांमध्ये बेंझिल बेंझोएट असते. या पदार्थाचा वापर खरजेवरील मलमात केला जातो. या वनस्पतीपासून मिळविलेले तेल त्वचेची खाज कमी होण्यासाठी वापरतात.

नागचाफा (Assam ironwood tree)

नागचाफा या वृक्षाचा समावेश कॅलोफायलेसी कुलात होतो. याचे शास्त्रीय नाव मेसुआ फेरिया आहे. नागवृक्ष, नागचंपा किंवा नागकेसर अशा नावांनी देखील हा वृक्ष ओळखला जातो. हा वृक्ष मूळचा श्रीलंकेतील असून त्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे. भारतातील आसाम, नेपाळचा दक्षिण भाग, सिंगापूर, मलेशिया इ. प्रदेशांत या वृक्षाची लागवड केली जाते. भारतातील सदाहरित व निमसदाहरित वनांमध्ये हा आढळतो.

नागचाफा हा वृक्ष सु. ३० मी.पर्यंत वाढू शकतो. खोड गोल गरगरीत, सरळ वाढणारे असून बुंध्याचा परिघ सु. २ मी. असू शकतो. साल तांबूस तपकिरी दिसते. झाडाचे सर्व अवयव केशरहित असतात. पाने साधी, मोठी, समोरासमोर, लांबट आकाराची व टोकदार असतात. ती वरच्या बाजूने गुळगुळीत हिरवीगार असून खालचा भाग पांढरट असतो. कोवळी पालवी लालसर असते. फुले मोठी, ३-८ सेंमी. व्यासाची, पांढऱ्या-पिवळ्या रंगसंगतीची व सुवासिक असतात. ती एकेकटी किंवा जोडीने येतात. पाकळ्या चार, सुट्या व पांढऱ्या शुभ्र असतात. फुलाच्या मध्यभागी सोनेरी-पिवळ्या किंवा केशरी रंगाच्या पुंकेसरांचा जुडगा असतो. फळे मे-जूनमध्ये लागतात. फळ ३-४ सेंमी. लांब व अंडाकार परंतु टोकदार असते. पिकलेल्या फळाचा रंग विटकरी लाल वा गंजलेल्या लोखंडासारखा दिसतो. फळाचा गर खाण्याजोगा असतो.

नागचाफ्याचे लाकूड लालसर रंगाचे असते. ते अतिशय कठीण, टिकाऊ आणि जड असते. इमारतीचे खांब व तुळया तयार करण्यासाठी, पुलाच्या बांधकामासाठी आणि इतर अनेक टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. खोडातील राळ विषारी असते. परंतु फुले औषधी असून त्यांचा उपयोग दमा, कुष्ठरोग, खोकला व ज्वरावर केला जातो. बियांचे अखाद्य तेल साबण तसेच वात व त्वचा रोगावर उपयुक्त असते. वाळविलेल्या पुंकेसरांना नागकेसर म्हणतात. त्याचाही उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. या वृक्षामुळे दाट सावली मिळते. वृक्षारोपणासाठी हा उपयुक्त आहे.