पॅपिलोमा या विषाणूंच्या संसर्गामुळे चामखिळी वाढतात. हे विषाणू त्वचेच्या पृष्ठभागातील पेशींमध्ये राहतात. पृष्ठभागाखालील ऊतींवर या विषाणूंचा संसर्ग होत नाही. चामखिळीमुळे जाड झालेल्या भागात पेशीस्तराच्या एकावर एक घड्या तयार होतात आणि लहानलहान रक्तवाहिन्यांची वाढ होते. चामखिळीचा भाग खरवडला तर संसर्गामुळे शरीराच्या इतर भागांवर चामखिळी वाढतात. तसेच, दुसऱ्या व्यक्तीला विषाणूंचा संसर्ग होऊन चामखिळी होऊ शकतात.
माणसांमध्ये चामखिळी ज्या पॅपिलोमा विषाणूंमुळे वाढतात त्यांचे ६५ हून अधिक प्रकार आहेत. मात्र, या जातींच्या विषाणूंमुळे इतर प्राण्यांना चामखिळी होत नाहीत. तसेच प्राण्यांमध्ये चामखीळ ज्या विषाणूंमुळे होते त्याचाही संसर्ग माणसाला होत नाही.
लहान मुलांमध्ये चामखिळी आढळण्याचे प्रमाण अधिक असून हात व पायांवर ती वाढतात. मुले तरुण वयात पोहोचली की बऱ्याचदा ती नाहीशी होतात. नंतरच्या काळात अशा चामखिळी पुन्हा दिसल्यास, त्या व्यक्तीमध्ये कर्करोग वा एड्स रोगांविषयी प्रतिकारक्षमता कमी असल्याचे लक्षण मानले जाते.
अनेकदा चामखीळ उपचाराशिवाय नाहीशी होते. विषाणूंच्या संसर्गाला रोगप्रतिकारक्षमता निर्माण झाल्यामुळे असे घडते, असा अंदाज आहे. ती काढून टाकण्यासाठी चामखीळ झालेल्या जागी घोड्याचा केस बांधतात. तसेच विद्युत सुई तापवून चटका देतात किंवा लेसर किरणांचा मारा करतात किंवा चामखिळीच्या ऊती शुष्क बर्फाने गोठवितात. काही वेळेला शस्त्रक्रियेने चामखीळ काढून टाकतात. अशा वेळी, चामखीळ झालेल्या जागी वेदना होऊ नयेत म्हणून तेवढा भाग बधिर करतात. घरगुती उपचार पद्धतीत प्रामुख्याने रसायने लावतात. मात्र, अशा पद्धतींमुळे चामखीळ पूर्णपणे बरी होत नसल्यामुळे काही दिवसांनी पुन्हा तेथे चामखीळ वाढल्याचे आढळते.