आवृतबीजी फुलझाडांच्या एरिकेसी कुलातील एक प्रजाती. या प्रजातीमध्ये सु. १००० जाती असून या वनस्पतींमध्ये उंची, आढळ, फुलांचे रंग आणि उपयोग यांमध्ये विविधता आढळून येते. ऱ्‍होडोडेंड्रॉन प्रजाती मूळची आशिया, उत्तर अमेरिका, यूरोप आणि ऑस्ट्रेलिया येथील समशीतोष्ण प्रदेशातील आहे. जमिनीवर आच्छादन करण्यापासून ते उंच व मोठ्या वृक्षापर्यंत त्यांचा आकार आढळून येतो. या सर्व वनस्पती सदापर्णी किंवा पानझडी आहेत. त्यांच्या काही जाती अपिवनस्पतीदेखील आहेत. मोहक व आकर्षक फुले हे या वनस्पतींचे वैशिष्ट्य आहे.

ऱ्‍होडोडेंड्रॉन (ऱ्‍होडोडेंड्रॉन पाँटिकम) : वनस्पती

ऱ्‍होडोडेंड्रॉन प्रजातीतील विविध जाती बहुधा झुडपांच्या रूपात, तर काही लहान वृक्ष किंवा क्वचित महाकाय वृक्षाच्या रूपात आढळतात. त्यांच्या काही जाती १०–१०० सेंमी. उंच वाढतात, तर ऱ्‍होडोडेंड्रॉन प्रॉटिस्टम ही जाती सु. ३० मी.पर्यंत उंच वाढते. ऱ्‍होडोडेंड्रॉन प्रजातीतील वनस्पतींची पाने साधी व एकाआड एक असून त्यांचा आकार १–४० सेंमी. असतो. क्वचित प्रसंगी पाने १०० सेंमी. लांब असू शकतात. काही पानांच्या खालच्या बाजूला लव किंवा रोम असतात. देठ असलेल्या पानांच्या कडा अखंडित असतात. फुले आकर्षक, लहान किंवा लांब देठांची व द्विलिंगी असून फांद्यांच्या टोकांना चवरीसारख्या झुबक्यांत येतात. फुलांचा आकार घंटेसारखा किंवा तुतारीसाररखा असून दले (पाकळ्या) ६–१० पर्यंत आणि कधी ती तळापर्यंत विभागलेली असतात. दलपुंजांचा रंग लाल, निळा, पिवळा, गुलाबी, पांढरा किंवा या साऱ्‍या रंगांच्या मिश्रणाच्या छटा असलेला असतो. फुलात ५–१० पुंकेसर असून त्यातील परागकोश तडकून परागकण बाहेर पडतात. बीजांडात दहापर्यंत कप्पे असून त्यांत अनेक बीजे असतात. बोंडफळ लंबगोल किंवा लांबट असून ते शेंड्याकडून खालच्या दिशेने तडकते आणि अनेक बिया बाहेर पडतात.

ऱ्‍होडोडेंड्रॉन (ऱ्‍होडोडेंड्रॉन निवेयम) : वनस्पती

शोभेसाठी म्हणून ऱ्‍होडोडेंड्रॉन वनस्पतीची लागवड केली जाते. ऱ्‍होडोडेंड्रॉन कँपॅन्युलॅटम या जातीच्या गुलाबी फुलाला हिमाचल प्रदेशाने राज्य फुलाचा मान दिला आहे. या फुलांफळांपासून हिमाचल प्रदेशात मद्यनिर्मिती केली जाते. उत्तराखंड आणि सिक्किम या राज्यांनी ऱ्‍होडोडेंड्रॉन निवेयम जातीच्या वृक्षाला राज्य वृक्षाचा दर्जा दिलेला आहे. उत्तराखंडमध्ये या फुलांपासून स्क्वॉश तयार केला जातो. ऱ्‍होडोडेंड्रॉन पाँटिकम  या जातीच्या फुलाला जम्मू व काश्मीर राज्याने राज्य फुलाचा मान दिला आहे. ऱ्‍होडोडेंड्रॉन आर्बोरियम  या जातीच्या फुलाला नेपाळ देशाने राष्ट्रीय फुलाचा दर्जा दिलेला आहे. तेथे या फुलांपासून लोणचे तयार करतात. त्यांचा रस पेय म्हणून उपयोगात आणतात. तेथे माशांच्या रश्शात ताजी किंवा वाळविलेली फुले टाकतात.

ऱ्‍होडोडेंड्रॉनच्या काही जाती जनावरांसाठी विषारी आहेत. कारण त्यांच्या परागकणांत आणि मकरंदात ग्रेयानोटॉक्सीन नावाचे जीवविष असते. ऱ्‍होडोडेंड्रॉनच्या काही जातीच्या फुलांतील मकरंदापासून तयार झालेला मध खाऊन लोक आजारी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र या वनस्पतींमध्ये सॅपोनीन, काही फिनॉल गटातील संयुगे आणि फ्लॅव्होनॉइडे इत्यादी घटक असतात. त्यांद्धारे प्रतिऑक्सिडीकारक परिणाम घडून येऊन सूज कमी होत असल्याचे आढळून आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा