ओरॅंगउटान

सस्तन प्राणी वर्गाच्या पाँजिडी कुलातील एक कपी (बिनशेपटाचे माकड). ओरँगउटान याचा अर्थ ‘अरण्यातील माणूस’ असा आहे. बोर्निओ व सुमात्रा बेटांच्या समुद्राकाठच्या अरण्यात हा कपी आढळतो. याचे शास्त्रीय नाव पोंगो पिग्मियस असे आहे. हा वृक्षवासी आहे, पण कधीकधी जमिनीवर येतो. वृक्षवासी असल्यामुळे पायापेक्षा हात लांब असतात याचे आकारमान गोरिलाच्या खालोखाल असते. नराचे वजन सु. ७५ किग्रॅ. व मादीचे सु. ४० किग्रॅ. असते. नराची उंची सु. १२० सेंमी. आणि मादीची सु. ८० सेंमी असते.

ओरँगउटान केसाळ असून केस लाल रंगाचे असतात. चेहर्‍यावर केस नसतात पण प्रौढ नराला लांब दाढी-मिशा असतात. फक्त नरामधील गाल आकाराने मोठे, गादीसारखे फुगीर व मऊ असतात. कपाळ मोठे आणि मुस्कट पुढे आलेले असते. डोळे लहान आणि जवळजवळ असतात. गळ्याला एक मोठी लोंबणारी हवेची पिशवी असून ती कंठात उघडते. या पिशवीचा उपयोग या प्राण्याने काढलेले विशिष्ट आवाज वाढविण्यासाठी अनुनादक म्हणून होतो. एकंदरीत चेहर्‍याची ठेवण मंगोली वळणाची असते.

ओरँगउटानला माणसासारख्या २४ बरगड्या असतात. हा उभा राहिला असता हात जमिनीला टेकतात. हात व त्याचे पंजे बळकट असून पाय आखूड व सापेक्षतेने दुबळे असतात. हातांनी फांदीला लोंबकळत हा एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर जातो. जमिनीवर हा ताट उभा राहू शकतो, पण चालताना हातपाय टेकून चालतो. चालताना हाताची अंगुलिमूले म्हणजे बोटांचे सांधे जमिनीला टेकलेले असतात. हे एकेकटे, जोडप्याने किंवा कौटुंबिक गट करून असतात. मुख्यत: अंजिर, उंबर आणि वडाच्या फळांवर निर्वाह करतात. पाने, बिया, अंडी व लहान पक्षीही अन्न म्हणून खातात. झाडावर फांद्या व पाला यांचा माचा तयार करून त्यावर हा झोपी जातो. गर्भावधी नऊ महिन्यांचा असतो. वारेची रचना माणसाप्रमाणे असते.

ओरँगउटानच्या जबड्यांचे आणि दाढांचे जीवाश्म सापडले आहेत. हा एक बुद्धिमान प्राणी असून शांत स्वभावाचा व गंभीर वृत्तीचा आहे. याच्या सगळ्या हालचाली मंद गतीने पण हेतुपूर्वक असतात. रानटी अवस्थेत हा ३०-४० वर्षे जगतो. ओरँगउटान संरक्षित प्राणी म्हणून घोषित करण्यात आला आहे. वृक्षतोड, शिकार आणि प्राणिसंग्रहालयात ठेवण्यासाठी पकडल्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे.