महाराष्ट्रातील भटक्या जमातीतील भराडी या जमातीतील नाथपंथी डवरी गोसावी ही एक उपजमात आहे. भिक्षा मागताना ते डमरू (डौर) वाजवीत असल्यामुळे डावरे गोसावी असेही म्हणतात. प्राचीनकाळी एकसंध असलेल्या नाथ संप्रदायाचे गुरुनिहाय, प्रांतनिहाय गट पडले आणि कालांतराने त्या गटांच्या जाती-जमाती बनल्या. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर किंवा महाराष्ट्रातील मढी येथील गोरक्षनाथाला मानणारे ‘नाथजोगी’ तर उस्मानाबाद जिल्ह्य़ातील सोनारी येथील भरवनाथाची गादी (गुरूला गादी म्हटले जाते.) व नाथांचा आखाडा मानणारे ‘नाथपंथी डवरी गोसावी’ असे महाराष्ट्रात प्रामुख्याने दोन गट म्हणजेच जमाती आढळतात. हा समाज प्रामुख्याने  महाराष्ट्रातल्या सांगली-सातारा जिल्ह्यात आढळतो. महाराष्ट्र विमुक्त भटका समाज सेवा संघटनेतर्फे केलेल्या पाहणी व अनुभवाप्रमाणे मुंबई व उपनगरांत या जमातीची लोकसंख्या सुमारे २५ हजार व महाराष्ट्रात सुमारे एक लाख असावी. यांच्यापकी सुमारे ६० टक्के आजही विकास प्रक्रियेपासून अलिप्त असे भटके जीवन जगत आहेत. त्यांची मातृभाषा मराठी असून व्यवसायाच्या वेळी इतर लोकांशी व्यवहार करायचा असेल तर हे लोक आपापसात इतरांना न समजेल अशा सांकेतिक भाषेत बोलतात, त्या भाषेला पारुष भाषा असे म्हणतात.डवरी गोसाव्यांच्या पिढीजात व्यवसाय भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे हा आहे. मागताना गाणी म्हणतात. गाणी म्हणताना सारंगी, डौर किंवा कोका हे वाद्य वापरतात. यांच्या गोड गळ्याला सारंगीच्या सुरेल आवाजाची साथ मिळाली म्हणजे गाणं तासनतास ऐकावंसं वाटतं. गाण्याचे विषय श्रावणबाळ, सती चांगुणा, बहीण-भावंड, राजा हरिश्चंद्र, हरिण, सवती-सवतींचं भांडण, भैरवनाथ असे ह्रदयाचा ठाव घेणारे, मर्मभेदक, जिवाला चटका लावणारे, माणसाला विचार करायला लावणारे असतात. डवरी गोसाव्यांच्या गाण्यामधून बहुजनसमाज पुष्कळ शिकतो. कारुण्य, हास्य, या रसांचा ओघ गाण्यातून वाहतो. हरिणीचं गाणं लावलं म्हणजे करुण रसाचा पाट वाहायला लागतो. डोळे भरून येतात. कंठ दाटतो. डोळ्यातून आपोआप पाणी वाहतं. नाथपंथी डवरी गोसावीपैकी काहीजण दत्तगुरूंच्या किंवा साईबाबांच्या मंदिराचा छोटासा गाडा तयार करतात व सोयीप्रमाणे तो बलगाडी, चारचाकी टेम्पो किंवा दुचाकीवर बसवून कुटुंबासह गावोगाव भटकतात. श्रद्धाळू लोक देवदर्शन घेऊन स्वमर्जीने दक्षिणा देतात. हेच त्यांचे उत्पन्न. काहीजण उपजत पाच किंवा सहा पायांची गाय किंवा बैल घेऊन फिरतात. दैवी चमत्कार समजून लोक गोमाता किंवा नंदीची पूजा करून दक्षिणा देतात. गावाजवळच्या मैदानात पाल ठोकून मुक्काम करतात. कुटुंबासह भटकंती असल्यामुळे बहुतांशी मुलं-मुली शाळाबाह्य़ आहेत. नाथपंथी डवरी गोसाव्याचा इतर गोसावी समाजाशी रोटीबेटीव्यवहार होत नाही. लग्न जमवताना मूळ गोत्र पाहतात. समान गोत्रात व एका आडनावात विवाह होत नाही. या समाजात सात आणि पाच अशा बारा कुळ्या मानल्या जातात. बारा कुळांचा हा समाज आहे असे ते सांगतात. त्यात प्रामुख्याने चव्हाण, कोष्ठा, सितोळा, जगताप, तांबवा, माळवा आणि आहेर या सात कुळी व गेलेल्या आहेत. याशिवाय शिंदे आडनावाचं एक स्वतंत्र कूळ मानलं गेले आहे. शिंदेच्या पोटात गुंजाळ, मोरे, पवार या तीन पोटआडनावांचा समावेश आहे. शिंदे आडनावाच्या लोकांना या समाजात मानाचं स्थान आहे. या समाजातील शिंदे लोक ‘पाटील’ समजले जातात. लग्नात मुलाला हुंडा देण्याची प्रथा या समाजात नाही. उलट मुलाकडून मुलीला काही रक्कम लग्नखर्चासाठी द्यावी लागते. त्याला दयाज असे म्हणतात. यांच्यात स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची परवानगी नाही. एखाद्या स्त्रीने केलाच तर तिला जातीच्या बाहेर टाकतात. त्याला  गोते असे म्हणतात. नाथपंथी डवरी गोसावी हा समाज हिंदूधर्मीय असून त्यांचा विवाह हिंदू धर्मपद्धतीने होतो. अविवाहित मुलीने आंतरजातीय लग्न केले तर किंवा जातीतल्या मुलाबरोबर स्वमर्जीने पळून गेली तर तिच्या पित्याला गुन्हेगार ठरवले जाते. विवाहानंतरच्या मुलीच्या वर्तणुकीबद्दल नवऱ्याला जबाबदार धरले जाते. विधवा किंवा घटस्फोटित महिलेस अविवाहित मुलाबरोबर पुनर्वविाह करता येत नाही. विदुर किंवा घटस्फोटित पुरुषाबरोबर म्होतर लावता येते. म्होतर लावलेल्या महिलेस सणवारात मान दिला जात नाही. आंतरजातीय विवाह केल्यास पुढील पाच पिढय़ांपर्यंतच्या सर्व लोकांना किंवा त्या मूळ जोडप्यापकी दोघांचा मृत्यू होईपर्यंत इतर सर्वाना गुन्हा लागू होतो. डवरी गोसावी सर्रास भगव्या रंगाचा पोशाख करतात. डोक्याला रुमाल, अंगात सदरा, त्यावर जाकीट, धोतर नेसलेले. काखेत झोळी, कपाळावर विभूती, कानात मुद्रा, गळ्यात चांदीची शृंगी घालतात. काहीजण गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, हातात त्रिशूळ, पायात खडावा घालतात. असा असतो डवरी गोसाव्यांचा पोशाख. डवरी गोसावी हिंदूप्रमाणे सर्व सण साजरे करतात.

भैरवनाथ किंवा भैरोबा हे डवरी गोसाव्यांचे कुलदैवत होय. डवरी गोसाव्यांची जातपंचायत सोनारीला आणि कारुंड्याला यात्रेच्या वेळी वर्षातून एकवेळ भरते मोठ्या संख्येने या समाजातील लोक कारुंड्याला जातात. त्याला “यव्हार” असे म्हणतात. सर्व व्यवहार येथे निकालात काढले जातात. कारण “कारुंडे” हे या समाजाचे सुप्रिम कोर्ट समजले जाते. वार्षिक श्राद्धाचे वेळी मृत व्यक्तीची आठवण म्हणून चांदीचे मुखवटे तयार करून घेतात. ते देव्हार्‍यात ठेवतात. त्याला ‘टाक’ असे म्हणतात. असे टाक व देव्हारे या समाजात प्रत्येकाच्या घरी पाहावयास मिळतात.

This Post Has One Comment

  1. Mr. Sagar M. Davari

    वरील लेख अभ्यासू वाटला. चांगले संकलन आणि लेखन केले आहे. मीही या समाजाचा घटक असल्याने माझ्या संशोधनासाठी मी संदर्भ वाचन करत आहे. यांचा मला चांगला उपयोग होईल. धन्यवाद ..! आपल्याला शुभेच्छा ..!

Comments are closed.