फ्लाव्हेल, रिचर्ड अँथोनी : (२३ ऑगस्ट १९४५).
इंग्रज जीवशास्त्रज्ञ. त्यांनी २००८ साली स्वीत्झर्लंड येथे लसीच्या मात्रेचे (प्रमाणाचे) मूल्यमापन करण्याकरिता उंदीर-प्रतिकृती (Mouse Model) तयार केली. या कार्याचा मुख्य उद्देश मानवी उंदीर-प्रतिकृतीची निर्मिती करणे हा होता. ज्यामध्ये मानवातील रोगप्रतिकारक प्रणालीतील आवश्यक घटक उंदिरात असणाऱ्या त्यासारख्या घटकांनी बदलता येतील.
फ्लाव्हेल यांचा जन्म चेम्सफर्ड (Chelmsford) येथे झाला. हल युनिव्हर्सिटीमधून त्यांन बी. एस्.सी. (ऑनर्स; १९६७) व जैवरसायनशास्त्र या विषयात पीएच.डी. (१९७०) या पदव्या मिळविल्यात. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय प्रोटोझोआच्या डीएनए वरील अभ्यास यावर होता. नंतर ते पुढील शिक्षणाकरिता ॲमस्टॅरडॅम विद्यापीठात पीट्स बोर्स्ट (Piet Borst) यांसोबत (१९७२-७३) व झुरीक विद्यापीठात (University of Zurich) चार्ल्स वाइसमान (Charles Weissmann) यांसोबत संशोधन करू लागले. ॲमस्टॅरडॅम विद्यापीठात ते सहायक प्राध्यापक या पदावर रुजू झालेत (१९७४-७९). त्यानंतर त्यांनी लंडनमधील मिल हिल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चच्या (National Institute for Medical Research, Mill Hill) जनुक संरचना आणि जनुक कार्याच्या प्रयोगशाळेत प्रमुख म्हणून काम पाहिले (१९७९-८२). त्यांनी मॅसॅचूसेट्समधील केंब्रिज येथे बायोजेन रिसर्च कॉर्पोरेशनमध्ये अध्यक्ष म्हणून काम पहिले (१९८२-८८). १९८८ पासून येल स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये (Yale School of Medicine) येथे जैविक रोगप्रतिकारशास्त्रज्ञ म्हणून आणि हार्वर्ड-ह्युज मेडिकल इन्स्टिट्यूट (Howard Hughes Medical Institute) येथे संशोधक म्हणून कार्यरत आहेत. २००२ साली त्यांची स्टर्लिंग प्राध्यापक म्हणून येल स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये नेमणुक करण्यात आली.
फ्लाव्हेल यांनी अनेक अंगांचा अभ्यास करण्यासाठी जनुकीय बदल घडवून आणलेले उंदीर वापरले. जागतिक स्तरावर, २००८साली, त्यांनी एक उंदराची प्रतिकृती तयार केली, ज्यायोगे त्यांनी लस टोचल्यानंतरच्या परिणामांचा अभ्यास केला. त्यांनी अनेक प्रयोगशाळात काम केले. मुख्य संशोधक म्हणून रोगप्रतिकारशक्तीचा अभ्यास करणाऱ्या फ्लाव्हेल- प्रयोगशाळेत, कर्करोग केंद्रात, मधूमेह संशोधन केंद्रात, शिक्षक प्रशिक्षण देण्यात, फेलोशिप प्रशिक्षणात, रोगप्रतिकारशक्तीशास्त्रात, त्याच्या उपचार शास्त्रात, यकृत केंद्रात, NIH T32 कार्यक्रमात, बांडगुळशास्त्रात, येल येथील त्वचारोग संशोधन केंद्रात, त्वचा कर्करोग केंद्रात, येल येथील स्टेम पेशी केंद्रात, रक्त वाहिनी जीव आणि वैद्यकीय शास्त्रात, तसेच रक्त शास्त्रात त्यांनी काम केले.
फ्लाव्हेल यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कर्करोग संस्थेचा रोगप्रतिकारशक्ती आणि गाठींच्या अभ्यासासाठीचा विशेष संशोधनाचा विल्यम बी. कोले पदक (The William B. Coley Award) आणि जीववैद्यकीयशास्त्र क्षेत्रातील विल्सेक फाउंडेशनचा विल्सेक पारितोषिक (Vilcek Prize in Biomedical Science) यांचा समावेश होतो. ते रॉयल सोसायटीचे सदस्य आहेत. चायनामधील विविध विद्यापीठाचे ते सन्माननीय प्राध्यापक आहेत. त्यांची इंटरनॅशनल सायटोकाइन ॲण्ड इंटरफेरॉन सोसायटी येथे अध्यक्ष म्हणून नेमणुक करण्यात आली (२०१४-१५).
कळीचे शब्द : #उंदिर-प्रतिकृती #कर्करोग #प्रतिकारशक्ती
संदर्भ :
- https://medicine.yale.edu/immuno/people/richard_flavell.profile
- http://www.hhmi.org/research/investigators/flavell_bio.html
- Gu, Jiahe, Yale Researchers Receive the Vilcek Prize”. Yale Scientific Magazine. Retrieved 2015-11-11.
समीक्षक – रंजन गर्गे