बर्नर्स-ली, सर टिमोथी जॉन : (८ जून १९५५).
इंग्रज संगणक अभियंता. टिम बर्नर्स-ली (Tim Berners-Lee) या नावानेही ते ओळखले जातात. त्यांनी वर्ल्ड वाइड वेब (World Wide Web) म्हणजे माहितीच्या महाजालाचा शोध लावून माहिती-तंत्रज्ञानाच्या विश्वाला एक नावीन्यपूर्ण दिशा दाखवली.
बर्नर्स-ली यांचा जन्म इंग्लंडमधील लंडन या शहरात झाला. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील क्वीन्स महाविद्यालयातून (The Queen’s College, Oxford) भौतिकशास्त्रातील बी.ए. (ऑनर्स) ही पदवी प्रथम वर्गात प्राप्त केली (१९७६). तेथे शिकत असताना त्यांनी डागकाम खडया (soldering iron), M6800 प्रक्रियक (Processor), दूरचित्रवाणी संच अशी उपलब्ध साधने वापरून आपला पहिला संगणक बनविला. पदवी प्राप्त केल्यानंतर सुरुवातीला त्यांनी इंग्लंडमधील डॉर्सेट परगण्यातील पूले (Poole) शहरातील प्लेसी (Plessey) या दूरसंचार कंपनीत अभियंता म्हणून काम केले. १९७८ मध्ये ते त्याच परगण्यातील फर्नडाऊन (Ferndown) शहरातील डी.जी.नॅश या कंपनीत रुजू झाले. तेथे त्यांनी संगणक प्रिंटरसाठी टाइप-सेटिंग सॉफ्टवेअर (Software) तयार करण्यास मदत केली. त्यानंतर त्यांनी जिनीव्हा येथील यूरोपियन कण भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत (सेर्न; CERN) स्वतंत्र सल्लागार म्हणून काम केले. त्यामध्ये सॉफ्टवेअर अभियंता सल्लागाराची जबाबदारीही त्यांच्यावर काही काळ होती. येथे काम करत असताना त्यांनी संशोधकांमधील माहितीची देव-घेव आणि माहितीचा शोध संगणकामार्फत करणे या कामी प्रभावी सोय होण्यासाठी हायपरटेक्स्ट (Hypertext) या संकल्पनेवर आधारित एक प्रकल्प सुचविला होता. त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी बर्नर्स-ली यांनी एन्क्वायर (ENQUIRE) नावाची एक प्रायोगिक प्रणाली तयार केली.
बर्नर्स-ली यांनी १९८० नंतर सेर्न ही संस्था सोडली आणि ते बॉर्नमाउथ, डॉर्सेट येथील जॉन पूल इमेज कॉम्प्युटर सिस्टम्स लिमिटेड (John Poole’s Image Computer Systems, Ltd) या कंपनीत काम करू लागले. तेथे त्यांनी तीन वर्षे कंपनीची तांत्रिक बाजू सांभाळली. तेथील प्रकल्पांवर केलेल्या कामातून त्यांना संगणक-जोडणीचा (नेटवर्किंग; Networking) अनुभव मिळाला. नंतर परत ते १९८४ मध्ये अधिछात्र (फेलो; fellow) म्हणून सेर्न येथे परत गेले. १९८९ मध्ये सेर्न या संस्थेत यूरोपमधील सर्वांत मोठा आंतरजाल-अड्डा (इंटरनेट-नोड; Internet Node) होता. त्यामुळे बर्नर्स-ली यांना हायपरटेक्स्ट संकल्पनेला इंटरनेटशी जोडण्याची संधी दिसली. त्यांनी नेक्स्ट (NeXT) नावाच्या संगणकाचा विकास आणि वापर करून जगातील पहिला वेब सर्व्हर (Web Server) बनविला आणि त्यांच्या हायपरटेक्स्ट वर्तन-नियमावलीने (प्रोटोकॉल; Protocol) तो सर्व्हर आणि त्याला जोडलेल्या संगणकांमध्ये (Clients) माहितीची देव-घेव करण्याची अभिनव पद्धत साकारली. सेर्नमध्ये पुढे कार्यरत असताना त्यांनी जागतिक (ग्लोबल) हायपरटेक्स्ट प्रकल्प प्रस्तावित केला, ज्याला वर्ल्ड वाइड वेब म्हणजेच माहितीचे महाजाल म्हणून आता ओळखले जाते. हा प्रकल्प त्यांच्या पूर्वीच्या एन्क्वायर प्रणालीच्या कामावरच आधारित होता. या प्रकल्पाची मूळ संकल्पना लोकांना त्यांचे ज्ञान व माहिती एकत्रित करून महाजालाद्वारे जोडून संयुक्तपणे काम करता येणे शक्य व्हावे अशी होती.
बर्नर्स-ली यांनी संकेतस्थळाबाबत (वेबसाईट, Website) पुढील तीन मुख्य संकल्पना विकसित केल्या : १) संकेतस्थळावरील प्रत्येक पानासाठी एकमेव असा प्रमाणित पत्ता (युआरएल: URL) असणे, २) हायपरटेक्स्ट (एचटीटीपी; HTTP) प्रणालीने इंटरनेटवर उपलब्ध कुठल्याही संकेतस्थळावरील कोणत्याही पानावर थेट जाता येणे, आणि ३) हायपरटेक्स्ट मार्क अप लँग्वेज (एचटीएमएल; HTML) या संगणकीय भाषेची निर्मिती करणे. त्याद्वारे हायपरटेक्स्ट जोडण्या अंतर्भूत असलेले दस्ताऐवज सहजपणे तयार करता येणे.
बर्नर्स-ली यांनी माहितीच्या महाजालासंबंधीचे सुरुवातीचे प्रस्ताव मार्च १९८९ मध्ये लिहिले आणि १९९० मध्ये पुनर्लिखित केले. प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काम ऑक्टोबर १९९० मध्ये सुरू झाले आणि त्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये सेर्न संस्थेमध्ये माहितीचे महाजाल म्हणजे वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध झाले, त्यानंतर १९९१च्या उन्हाळ्यात ते सर्वांना इंटरनेटवर उपलब्ध झाले. इंटरनेट वापरकर्त्यांकडून मिळालेल्या प्रत्याभरणाच्या (फिडबॅक; Feedback) आधारे माहिती महाजालाच्या संरचनेमध्ये आणखी सुधारणा करण्याचे काम त्यांनी १९९१ – १९९३ या काळात चालूच ठेवले. त्याचा अधिकाधिक वापर होऊ लागला आणि त्याच्या उपयुक्ततेबाबत अनेकजणांकडून अनुकूल प्रतिसाद मिळू लागला. माहिती महाजाल ही निर्मिती हे केवळ तांत्रिक प्रगतीचे लक्षण नव्हते, तर त्यामुळे कोणालाही आपले संकेतस्थळ स्थापून त्याद्वारे पाहिजे ती माहिती इंटरनेट माध्यमातून जगभर पोहोचवण्याची संधी आणि स्वातंत्र्य मिळाले.
बर्नर्स-ली हे अनेक जगप्रसिद्ध संस्थांमध्ये विविध पदे भूषवित आहेत. ते वर्ल्ड वाइड वेब कन्सोर्टियम (The World Wide Web Consortium) या संस्थेचे संचालक आहेत. ही संस्था वेबच्या निरंतर विकासावर देखरेख करते. ते वर्ल्ड वाइड वेब फाउंडेशनचे संस्थापकही आहेत आणि अमेरिकेतील एमआयटीमधील संगणकविज्ञान आणि कृत्रिम बुध्दिमत्ता प्रयोगशाळेत (Computer Science and Artificial Intelligence Laboratory) वरिष्ठ संशोधक असून संस्थापक अध्यासनाचे प्रमुख आहेत. ते वेब सायन्स रिसर्च इनिशिएटिव्हचे (Web Science Research Initiative (WSRI)) संचालक आहेत आणि एमआयटी सेंटर फॉर कलेक्टिव इंटेलिजन्सच्या (MIT Center for Collective Intelligence.) सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. २०११ मध्ये, त्यांना फोर्ड फाउंडेशनच्या (Ford Foundation) विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणून नेमण्यात आले.
बर्नर्स-ली यांचा मार्च १९९९ मध्ये टाईम्स मासिकाच्या विसाव्या शतकातील सर्वांत महत्त्वाच्या १०० व्यक्तींच्या यादीत नावाचा समावेश केला गेला. त्यांना रॉयल सोसायटीचे एक सन्मानीय सदस्य (एफआरएस; FRS) म्हणून निवडण्यात आले (२००१). महाजालाच्या जागतिक विकासाकरिता सेवा देण्याबद्दल त्यांना ‘न्यू ईयर ऑनर्स’ (New Year Honours) मध्ये ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ (ओबीई; Order of the British Empire) ते नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (Knights Commander of the Order of the British Empire) अशी पदोन्नती देऊन ‘सर’ ही अत्युच्च पदवी देण्यात आली (२००४). त्यांना ऑर्डर ऑफ मेरिट म्हणून नियुक्त करण्यात आले (२००७). जगभरातील १५ हून अधिक नामांकित विद्यापीठांनी बर्नर्स-ली यांना मानद पदव्या बहाल करून सन्मानित केले आहे. संगणकविज्ञान या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मानले जाणारे एसीएम ए. एम. ट्युरिंग पारितोषिक (ACM Softwar System Award; १९९५) त्यांना प्रदान करण्यात आले.
बर्नर्स-ली यांनी विपुल प्रमाणात शोधलेख, अहवाल आणि पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. त्यामधील मार्क फिस्चेतीबरोबर (Mark Fischetti) त्यांनी लिहिलेले विव्हिंग द वेब : द ओरिजनल डिझाईन अँड अल्टीमेट डेस्टिनी ऑफ द वर्ल्ड वाइड वेब बाय इट्स इन्व्हेंटर (Weaving the Web : The Original Design and Ultimate Destiny of the World Wide Web by Its Inventor; २०००) पुस्तक बरेच गाजले.
संदर्भ :
समीक्षक – विवेक पाटकर
#एन्क्वायर प्रणाली #इंटरनेट #हायपरटेक्स्ट #नेक्स्ट #संगणक #वर्ल्डवाइडवेब #Internet # Hypertext # NeXT # Computer #WorldWideWeb