चेन, सर एर्न्स्ट बोरिस : (१९ जून १९०६ —१२ ऑगस्ट १९७९).

जर्मन-ब्रिटीश जीवरसायनशास्त्रज्ञ. त्यांनी सन १९२८ साली सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी शोधलेल्या पेनिसिलिनला शुद्ध स्वरूपात विलग करण्याचे तंत्र विकृतिशास्त्रज्ञ हॉवर्ड फ्लोरी यांसोबत शोधले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना १९४५ सालातील शरीरक्रियाशास्त्र अथवा वैद्यक या विषयातील नोबेल पारितोषिक सर अलेक्झांडर फ्लेमिंग (Alexander Fleming) आणि सर हॉवर्ड फ्लोरी (Howard Walter Florey) यांसोबत विभागून देण्यात आले.

चेन यांचा जन्म बर्लिन इथे झाला. त्यांच्या वडलांचा रासायनिक उत्पादन व्यवसाय होता. त्यांचे शिक्षण बर्लिनमधील लुईझन (Luisen) शाळेत झाले. शाळेत असतानाच त्यांना रसायनशास्त्राची आवड निर्माण झाली. ते वडलांच्या प्रयोगशाळेत आणि कारखान्यात जात असत. त्यामुळे त्यांची रसायनशास्त्रातली रूची अधिक वृद्धींगत झाली. बर्लिनमधील फ्रीड्रिख-व्हिल्हेल्म (Friedrich-Wilhelm) विद्यापीठातून ते रसायनशास्त्राचे पदवीधर झाले (१९३०). पदवीनंतर तीन वर्षं त्यांनी बर्लिनमधील धर्मादाय रुग्णालयामध्ये वितंचक (एंझाइम; Enzyme) या विषयावर संशोघन केले (१९३०-३३). ते ज्यू वंशाचे होते. त्यामुळे १९३३ च्या  सुमारास जर्मनीमधे राजवटीचा उदय झाल्यावर त्यांनी इंग्लंडमधे स्थलांतर केले. तिथे केंब्रिज विद्यापीठात दोन वर्ष त्यानी फॉस्फोलिपीड या विषयावर काम केले. ऑक्सफर्ड विद्यापीठाने आमंत्रित केल्यावर तिथे ते विकृतिशास्त्राचे अधिव्याख्याता म्हणून काम पाहू लागले (१९३५). १९३५-३९ या काळात त्यांनी लायसोझाइमचा जीवाणूंवरील परिणाम, सर्पविष, अर्बुद (ट्यूमर; Tumour) चयापचय अशा विविध विषयात काम केले. त्यांनी सर फ्लोरी यांच्या बरोबर सूक्ष्मजीवांनी निर्माण केलेल्या जीवाणू विरोधक घटकांवर संशोधन करण्यास सुरवात केली (१९३९). पुढील काळात त्यांनी औद्योगिक पातळीवर पेनिसिलीन शुद्धिकरण यशस्वी केले.

चेन यांनी पेनिसिलीन याला शुद्ध स्वरूपात विलग करण्याच्या तंत्रासोबतच चेता ऊतीमधील कर्बोदके आणि ॲमिनो आम्ले यांच्यातील संबंध, शरीरातील इन्शुलिनचे कार्य, किण्वन (फर्मेंटेशन; Fermentation) तंत्रज्ञान, लायसर्जिक आम्लाची निर्मिती, बुरशींनी तयार केलेले नवे मेटॅबोलाईट अशा अनेक क्षेत्रात संशोधन केले.

चेन यांना स्विडीश मेडिकल सोसायटीचे बर्झीलियस पदक (१९४८), पाश्चर इन्स्टिट्यूटचे पाश्चर पदक (१९४६), रॉयल सोसायटीचे अधिछात्र (१९४९) इत्यादी मान-सन्मान देण्यात आले आहे. त्यांना पॉल अर्लिक शताब्दी पारितोषिकाने गौरवण्यात आले (१९५४). त्यांना अनेक विद्यापीठांनी मानद पदव्या दिल्या. जगभरातल्या अनेक देशांनीही त्यांना पदके आणि पारितोषिके देऊन गौरवले.

चेन यांचे निधन आयर्लंड येथे झाला.

संदर्भ : 

कळीचे शब्द – #नोबेलपारितोषिक, #पेनिसिलीन, #अलेक्झांडरफ्लेमिंग #हॉवर्डफ्लोरी, #लायसोझाइम, #फ्रीड्रिख-व्हिल्हेल्म विद्यापीठ, #इन्शुलीन, #एंझाइम्स, फॉस्फोलिपिड, #ऑक्सफर्डविद्यापीठ #किण्वन, #पॉलअर्लिक

समीक्षक – रंजन गर्गे