कोसंबी, दामोदर धर्मानंद : (३१ जुलै १९०७ – २९ जून १९६६).

भारतीय गणितज्ज्ञ. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिकेत शालेय शिक्षण घेणाऱ्या आणि गणितातील पदवी मिळविणाऱ्या मोजक्या भारतीयांपैकी ते एक. पाली भाषा आणि बौद्ध धर्म यांचे तज्ज्ञ असलेल्या धर्मानंद कोसंबी यांचे ते पुत्र.

कोसंबी यांनी अमेरिकेतील केंब्रिज हाय ॲण्ड लॅटिन स्कूल या शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातून सन १९२९मध्ये गणितातील पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली. तेथे त्यांना फाय बीटा काप्पा सोसायटीचे सदस्यत्व हा बहुमानही प्राप्त झाला. त्यानंतर ते भारतात आले आणि १९३०पासून त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठ, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ आणि पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. यानंतर सन १९४५ मध्ये नव्यानेच सुरू झालेल्या मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत डॉ. होमी भाभांचे सहकारी म्हणून ते काम करू लागले. नंतर १९६४ मध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (Council of Scientific and Industrial Research) येथे त्यांची सन्माननीय वैज्ञानिक म्हणून नेमणूक झाली. अमेरिकेतील प्रिन्स्टन आणि शिकागो विद्यापीठे येथे सन १९४८-१९४९मध्ये त्यांनी दौरा केला. यावेळी सापेक्षतावादाच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या प्रदिश विश्लेषण (Tensor Analysis) आणि पथ भूमिती (Path Geometry) या शाखांमध्ये त्यांचे संशोधन असल्याने त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात आइन्स्टाइन यांच्याशीही प्रदीर्घ चर्चा केली. शिकागो विद्यापीठात भूमितीचे अभ्यागत प्राध्यापक या नात्याने प्रदिश विश्लेषणसंबंधीच्या अभ्यासक्रमात सन १९४९मध्ये त्यांनी ३६ व्याख्याने दिली. १९३० ते १९६६या काळात त्यांनी गणित आणि सांख्यिकी या विषयांवर सुमारे साठ शोधनिबंध लिहिले. सांख्यिकीचा उपयोग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी व्हावा असे त्यांचे मत होते. अलिगढ मुस्लीम विद्यापीठात काम करीत असताना विकलक भूमिती (Integral Geometry) आणि पथ अवकाश (Path Spaces) या शाखेसंबंधी त्यांचे आठ शोधनिबंध प्रसिद्ध झाले. प्रिसिजन ऑफ ॲन इलिप्टीक ऑर्बिट (Precessions of an Elliptic Orbit) हा त्यांचा अणुभौतिकीच्या संदर्भातील पहिला शोधनिबंध १९३०मध्ये इंडियन जर्नल ऑफ फिजिक्समध्ये प्रसिद्ध झाला.

कोसंबी यांना ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन, इटालियन या युरोपियन भाषाही अवगत असल्यामुळे इटालियन, फ्रेंच आणि जर्मन भाषांमधूनही त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले. नंतरच्या काळात त्यांचे शोधनिबंध प्रामुख्याने इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये आणि काही आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्येही प्रसिद्ध झाले. यापैकी काही उल्लेखनीय शोधनिबंध पुढीलप्रमाणे :–

१. जर्नल ऑफ द इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी

On the Zeros and Closure of Orthogonal Functions (१९४२)

Statistics in Function Space (१९४३)

२. क्वार्टरली जर्नल ऑफ मॅथेमॅटिक्स (ऑक्सफर्ड):

Systems of Differential Equations of the Second Order (१९३५)

Path Spaces in Higher Order (१९३६)

Path Geometry and Cosmogony (१९३६)

Systems of Partial Differential Equations of the Second Order (१९४८)

Series Expansions of Continuous Groups (१९५१)

Path Geometry and Continuous Groups (१९५२)

३. अमेरिकन मॅथेमॅटिकल मंथली:

The Geometric Method in Mathematical Statistics (१९४४)

४. जर्नल ऑफ द लंडन मॅथेमॅटिकल सोसायटी:

Path Equations Admitting the Lorentz Group (१९४०)

५. बुलेटीन ऑफ द अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी:

Parallelism in the Tensor Analysis of Partial Differential Equations

(१९४५)

The Differential Invariants of a two-index Tensor (१९४९).

कोसंबी यांना १९३४मध्ये मद्रास विद्यापीठाचे पहिले रामानुजन स्मृती पारितोषिक मिळाले. डॉ. होमी भाभा यांच्या वडलांच्या स्मरणार्थ दिल्या गेलेल्या भाभा पारितोषिकाचेही १९४७मध्ये ते मानकरी ठरले. शुद्ध गणित आणि सांख्यिकी याव्यतिरिक्त सांख्यिकी पद्धतींचा उपयोग करून त्यांनी नाणकशास्त्राचा विशेष अभ्यास केला. करंट सायन्स या जर्नलमध्ये १९४० साली ‘ए स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ द वेट्स ऑफ द ओल्ड इंडियन पंच-मार्क कॉइन्स ‘ (A Statistical Study of the Weights of the Old Indian Punch-marked Coins) हा शोधनिबंध त्यांनी प्रकाशित केला आणि पाठोपाठ संबंधित विषयावर आणखी काही शोधनिबंधही प्रसिद्ध केले. प्राचीन भारताचा इतिहास, संस्कृत साहित्य आणि पुरातत्वविद्या याविषयांवरही त्यांनी सखोल संशोधन केले.

कोसंबी यांचे पुणे येथे निधन झाले.

संदर्भ:

  •  देशपांडे, सु. र., “कोसंबी, दामोदर धर्मानंद”,मराठी विश्वकोश, खंड ४, १९७६, पृष्ठे ३८५-३८६.
  •  देशमुख, चिं.,दामोदर धर्मानंद कोसंबी जीवन व कार्य, ग्रंथाली, मुंबई, १९९३.
  •  पानसे, सु.,उत्तुंग आणि एकाकी संशोधक दामोदर कोसंबी, लोकवाङ्मय गृह, मुंबई, २००७.
  •  http://ckraju.net/papers/Kosambi-the-mathematician.pdf

कळीचे शब्द : #गणित, #सांख्यिकी ,#प्रदिशविश्लेषण #पथ भूमिती

समीक्षक – विवेक पाटकर