कवचधारी अपृष्ठवंशी प्राणी असलेल्या चिंगाटीचा समावेश संधिपाद संघातील कवचधारी वर्गातील दशपादगणात होतो.चिंगाटीला ‘कोळंबी’ असेही म्हणतात. याच गणात खेकडे, झिंगे व शेवंडे यांचाही समावेश होतो. चिंगाटीच्या सु. २,००० जाती असून त्या जगाच्या सर्व भागांतील खाऱ्या व गोड्या पाण्यात आढळतात. भारत, थायलंड, मलेशिया व इंडोनेशिया या देशांत चिंगाट्या मोठ्या प्रमाणावर पकडल्या जातात. त्यांंच्या काही जाती समुद्रकिनाऱ्यालगतच्या उथळ पाण्यात आणि लाटांचा फारसा मारा नसतो किंवा जोरदार प्रवाह नसतो अशा ठिकाणी राहतात. काही जाती समूहाने खोल पाण्यातही आढळतात. भारतात यांच्या ५-६ जाती आढळत असून पश्चिम किनाऱ्याला अ‍ॅसेटिस इंडिकस जातीच्या चिंगाट्या मुख्यत: आढळतात.

चिंगाटी‍ (ॲसेटिस इंडिकस)

चिंगाटी झिंग्यापेक्षा आकाराने लहान असून तिची लांबी १-५ सेंमी. असते. शरीर १९खंडांचे असून त्याचे शिरोवक्ष व उदर असे दोन भाग असतात. आकार स्वल्पविरामासारखा वळलेला असतो, कारण उदराचे कवच सांध्यांचे असते. रंग स्थानिक पर्यावरणानुसार वेगवेगळा असतो. शिरोवक्षावर दोन डोळे खेकड्याप्रमाणे सवृंत (देठ असलेले) असतात. शरीरावर पाय, स्पर्शिका आणि उपांगांच्या मिळून १९ जोड्या असतात. शिरोवक्षावर असलेल्या स्पर्शिकांच्या दोन जोड्या पाण्याच्या चवीनुसार अन्नाचे ठिकाण शोधतात; उपांगाची एक जोडी जबड्याप्रमाणे काम करते; उपांगांच्या पाच जोड्या अन्न पकडतात; चालण्यासाठी पायांच्या पाच जोड्या असतात. उदरावर पोटपायाच्या पाच जोड्या असतात, त्यांचा उपयोग पोहण्यासाठी आणि प्रजननासाठी होतो. उदरावर उपांगाची आणखी एक जोडी असते, तिचे रूपांतर शेपटीत झालेले असते. भक्षकापासून दूर जाण्यासाठी चिंगाट्या उलट्या दिशेने पोहतात. भक्षकाच्या तावडीतून सुटण्यासाठी, पाल ज्याप्रमाणे तिची शेपूट तोडून पळते त्याप्रमाणे चिंगाट्या त्यांची उपांगे तोडून (स्वविच्छेदन) पळतात. प्राणी, प्लवक व गाळातील अन्नकण हे त्यांचे मुख्य अन्न असते. इतर अनेक जलचर प्राण्यांचे चिंगाट्या खाद्य आहेत. प्रदूषित क्षेत्रातील चिंगाट्या अन्य जलचरांपेक्षा जीवविषाचे अधिक प्रमाण सहन करू शकतात. त्यामुळे जे प्राणी चिंगाट्यांवर जगतात त्यांच्यात जीवविष प्रमाणाबाहेर वाढू शकते.

चिंगाटीची मादी साधारण २ सेंमी. आकाराची झाल्यावर एका वेळेला ६-१० हजार अंडी घालते. फलित अंड्यातून डिंभ बाहेर पडतो. ४-५ डिंभावस्थांतून गेल्यावर प्रौढ चिंगाटी तयार होते. अंडी घातल्यानंतर मादी मरते. परिणामी त्यांची संख्या कमी होत असल्यामुळे काही नरांचे मादीत रूपांतर होते. वंशसातत्य टिकवून ठेवण्यासाठी असा लिंगबदल घडून येतो. वाढीच्या अवस्थेत त्यांच्या कवचाचे निर्मोचन घडून येते. चिंगाटींचा आयु:काल १ ते ६.५ वर्षे असतो.

चिंगाट्यांमध्ये कॅल्शियम, आयोडिन आणि प्रथिने असली तरी ऊष्मांक कमी असतात. १०० ग्रॅ. चिंगाट्यांच्या सेवनातून सु. १५० मिग्रॅ. कोलेस्टेरॉल मिळते. त्यांच्यापासून मिळणाऱ्या कोलेस्टेरॉलामुळे ‘वाईट कोलेस्टेरॉल’ आणि ‘चांगले कोलेस्टेरॉल’ यांचे गुणोत्तर सुधारते आणि ट्रायग्लिसराइड यांचेही प्रमाण कमी होते. मात्र त्यांच्या सेवनाने काही जणांना अधिहर्षता होऊ शकते.

चिंगाट्या ताज्या, सुकविलेल्या, गोठविलेल्या, कवच काढून, उकडून इ. पद्धतीने वापरतात अथवा साठवण करून ठेवतात. त्या हवाबंद डब्यातही साठवितात. त्यांच्या सुकविलेल्या शिरोवक्षाचा व कवचांचा चुरा करून तो कोंबड्यांसाठी खाद्य आणि नारळाच्या झाडासाठी खत म्हणून वापरतात. काही वेळा चिंगाट्या प्रचंड प्रमाणात पकडल्या जातात. त्यावेळी कोणतीही प्रक्रिया न करता त्या सुकवून वापरतात. कवच काढून वाळविलेल्या चिंगाट्यांना सोडे म्हणतात.