भारतात प्राचीन काळी विकसित झालेले आयुष्याबद्दलचे ज्ञान व त्याच्या उपयोगाने आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. प्राथमिक स्वरूपाचा आयुर्वेद ग्रंथित स्वरूपात अथर्ववेदात प्रथम दिसतो. मानवी शरीर, सृष्टी व त्यांच्यातील क्रिया-प्रतिक्रिया यांसंबंधी आणि आरोग्यपूर्ण जीवनासंबंधी मौलिक तत्त्वचिंतन हा त्याचा पाया आहे. चरकसंहिता, सुश्रुतसंहिता आणि काश्यपसंहिता या ग्रंथांमध्ये त्याला शास्त्रीय स्वरूप प्राप्त झाले. नंतर त्यात रसतंत्राची महत्त्वाची भर पडली.
आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या संपूर्ण आरोग्याची संकल्पना पुढीलप्रमाणे आहे :

जो शारीरिक व मानसिक रोगांपासून मुक्त आहे; जो शारीरिक सुखे भोगू शकतो, इच्छेप्रमाणे वागू शकतो, मनाने समाधानी आहे; ज्याचे शरीर व मन यांवर नियंत्रण आहे; जो सामर्थ्यशाली, बुद्धिमान, कलाकार इ. सर्वांगांनी विकसित व्यक्तिमत्त्वाने युक्त आहे; जो स्वत:चे, इतरांचे व सर्व प्राणिमात्रांचे हित करणारा आहे; जो चारही पुरुषार्थांचे योग्य पालन करणारा आहे; ज्याला समाजात स्थान व मान आहे, जो आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्‍न करीत आहे, तो संपूर्ण आरोग्यसंपन्न आहे.

या संकल्पनेनुसार, आरोग्यसंपन्न व्यक्तीचे आरोग्य राखणे व रोगी व्यक्तीच्या रोगांचे निर्मूलन करणे हे आयुर्वेदाचे ध्येय आहे. त्यानुसार रोगनाशनी आणि प्रकृतिस्थापनी या दोन चिकित्सा आरोग्य देणार्‍या, तिसरी रासायनिक चिकित्सा आरोग्य व सामर्थ्य देणारी, चौथी नैष्ठिकी चिकित्सा संपूर्ण दु:खनाश करणारी (संपूर्ण सुखदायक ) अशा एकूण चार चिकित्सा आयुर्वेदात सांगितल्या आहेत. संपूर्ण सुखावस्था म्हणजेच मोक्ष. म्हणून मोक्षप्राप्‍ती हेच आयुर्वेदाचे अंतिम ध्येय आहे.

शरीर थकणार नाही इतके श्रम माणसाने नियमित केले पाहिजेत. या शारीरिक श्रमाने शरीराची जेवढी झीज होते तेवढी झीज भरून काढण्याएवढे कमीतकमी अन्न माणसाला आवश्यक असते. या शारीरिक श्रमांनाच ‘व्यायाम’ असे म्हटले आहे. शास्त्रोक्त पद्धतीने वाढता व्यायाम घेतल्याने शरीर निर्दोष होते. शरीरात अनेक अग्नी असतात. शरीरातील प्रत्येक घटक या अग्नींनी पचविला आणि शुद्ध केला जातो, असे आयुर्वेदात मानले आहे. व्यायामाने अग्नी प्रदीप्‍त होतात आणि धातू (शरीरघटक) शुद्ध आणि उच्च दर्जांचे होतात. याप्रमाणे अग्नींच्या साहाय्याने आहाराचे उच्च प्रकारच्या धातूंत रूपांतर होते.

माणसांमध्ये वात, पित्त व कफ अशा तीन ‘प्रकृती’ असतात. तीनही प्रकृती सम प्रमाणात असल्यास तो माणूस सम प्रकृतीचा व उत्तम आरोग्यपूर्ण असतो. मात्र एखाद्या प्रकृतीचे प्राबल्य दिसत असल्यास त्या माणसात त्या प्रकृतीचा दोष आहे, असे समजले जाते. या दोष प्रकृतीप्रमाणे असणार्‍या शरीराच्या गुणधर्मांच्या विरुद्ध असलेल्या गुणधर्मांचा आहार व औषधे ही देश व कालानुरूप घ्यावीत आणि आचरण करावे म्हणजे उत्तम आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त होईल, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

आयुर्वेदाप्रमाणे माणसाचे सर्वसाधारण आयुष्यमान १०० वर्षे असायला हवे. धातूंच्या उत्तम दर्जामुळे (सारत्व) दीर्घायुष्य, मध्यम दर्जामुळे मध्यायुष्य व हीन दर्जामुळे (असारत्व) अल्पायुष्य मिळते. तसेच सम ‘प्रकृतीमुळे’(तिन्ही प्रकृतींचे संतुलन) दीर्घायुष्य, कफ प्रकृत्तीमुळे चांगले आयुष्य, पित्त प्रकृत्तीमुळे मध्यम आयुष्य व वात प्रकृतीमुळे अल्पायुष्य मिळते. इतर अनेक शारीरिक घटकांचे अस्तित्व, मोजमापे, वाढ व इतर लक्षणांवरून माणसाच्या आयुर्मानाचे निदान करता येते. त्याचबरोबर अकारण विकृती, इंद्रियविकृती, मनोविकृती, बुद्धिविकृती, चेष्टाविकृती अशा विकृती व त्यांची लक्षणे आणि त्यांवरून माणसाचे आरोग्य व आयुर्मान कसे जाणावे हे आयुर्वेदात सांगितले आहे.

व्यक्तीच्या आरोग्याची किंवा रोगाची चिकित्सा करताना आरोग्य किंवा रोग यांची कारणे (हेतू), लक्षणे लिंग आणि रोगनाशाची (आरोग्यस्थापनेची) साधने (औषधे किंवा उपाय) हे आयुर्वेदाचे तीन मुख्य विषय आहेत. शरीराची निर्मिती, अस्तित्व व नाश पंचमहाभूतांनी बनलेल्या सृष्टीत असल्याने हेतू विचारात शरीर व सृष्टी या दोन्हींचा अंतर्भाव होतो, असा व्यापक विचार आयुर्वेदात व्यक्त केला आहे.

कोणत्याही कारणांनी आरोग्य बिघडल्यास, बिघाडाला अनुसरून शरीर काही लक्षणे दाखविते. त्यांच्या आधारे बिघाडाचे स्वरूप व कारणेही समजतात आणि तेच औषधोपचारांचे स्वरूपही ठरविते. वास्तविक शरीर स्वत:च रोगातून बरे होणार असते. बिघाडाची लक्षणे तेच दाखविते. उपचारांची दिशाही तेच दाखविते आणि स्वत:वर उपचारही तेच करणार असते. शरीराने दाखविलेल्या दिशेने केलेल्या औषधांची व उपचारांची त्याला फक्त मदत होते.

आयुर्वेदात आठ प्रकारच्या चिकित्सा सांगितल्या असल्याने त्याला अष्टांग आयुर्वेद असे म्हणतात. या चिकित्सा अशा : (१) कायचिकित्सा म्हणजे सर्वसाधारण रोगचिकित्सा; (२) बालरोग व स्त्रीरोग चिकित्सा; (३) शल्यचिकित्सा म्हणजे उपचारांसाठी शस्त्रोपकरणांचा वापर; (४) शालाक्यचिकित्सा म्हणजे उपचारांसाठी शलाका किंवा सळ्यांचा उपयोग; (५) दशचिकित्सा म्हणजे चावणार्‍या किंवा दंश करणार्‍या प्राण्यांपासून होणार्‍या इजा व विषबाधांची चिकित्सा; (६) ग्रहचिकित्सा (ग्रह म्हणजे पकडणारा). वातावरणातील सूक्ष्मजीव, जंतू, प्राणी, दूषित वातावरण, हवा, पाणी इत्यादींमुळे होणार्‍या रोगांची चिकित्सा. वरील रोगांसंबंधीच्या चिकित्सांबरोबर पुढील दोन चिकित्सांचाही आयुर्वेदात समावेश होतो. (७) तारुण्य टिकविण्यासाठी आणि संतती बलवान व दीर्घायुषी होण्यासाठी जरेची चिकित्सा; (८) शुक्रधातू वाढवून बलवान होण्यासाठी वाजीकरण चिकित्सा.

आर्युवेदीय उपचारपद्धतीला आधुनिक भारतात शासनमान्यता मिळालेली असून विविध ठिकाणी या पद्धतीने उपचार करणारी रुग्णालये आणि मान्यताप्राप्त वैद्यकीय शिक्षणसंस्था स्थापन झाल्या आहेत. या संस्थांतून व्यावसायिक, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राज्यस्तरावर चालविले जातात.