कारली

कारले ही वनस्पती कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मॉमोर्डिका चॅरँशिया आहे. या वर्षायू वेलीची बरीच लागवड भारत, मलेशिया, चीन, श्रीलंका, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश इ. प्रदेशांत सर्वत्र करतात. भारतात समुद्रसपाटीपासून १,५०० मी. उंचीपर्यंत हिची लागवड केली जाते.

कारले ही द्विलिंगाश्रयी (एकाच वेलीवर नरफुले व मादीफुले येणारी) शाखायुक्त वनस्पती असून तिच्या खोडांवर खाचा असतात. कोवळे भाग अधिक केसाळ असून साध्या, पातळ आणि लांबट प्रतानांच्या आधाराने ही वेल वर चढते. पाने साधी, वलयाकृती, हस्ताकृती आणि ५-७ दलांत विभागलेली असतात. फुले एकलिंगी व पिवळी असून ५-१० सेंमी. लांब सवृंतावर येतात. कच्ची फळे हिरवी किंवा पांढरी व पक्के फळ गर्द नारिंगी, ५-१५ सेंमी. लांब, निलंबी, विटीच्या आकाराचे व चवीला कडू असून त्यांवर लहान मोठ्या पुटकुळ्या असतात. ती भाजीकरिता उपयुक्त असतात. फळात त्रिकोणी व गुलिकांसारख्या चकचकीत बिया असतात. कडवटपणा कमी करण्यास फोडी कढत पाण्यात अगर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवतात व नंतर काढून शिजवितात.

कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते. खोकला, पित्त, सांधेदुखी, त्वचारोग, कुष्ठरोग, बद्धकोष्ठता, मधुमेह इ. विकारांवर ते गुणकारी असते. त्यात , ब आणि  ही जीवनसत्त्वे असतात.