तामण (डहाळी)

तामण हा पानझडी वृक्ष लिथ्रेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव लॅगरस्ट्रोमिया स्पेसिओजा आहे. हा वृक्ष मूळचा दक्षिण आशियातील असून भारत, श्रीलंका, म्यानमार, चीन, मलेशिया या देशांत आढळतो. तामणाच्या फुलांच्या पाकळ्या चुरगळलेल्या व क्रेप कागदासारख्या दिसतात, म्हणून त्याला इंग्रजीत क्रेप फ्लॉवर असेही म्हणतात. भारतात हा वृक्ष शोभेकरिता सर्वत्र लावलेला दिसतो. रस्त्याच्या कडेला व बागेत हा सामान्यपणे आढळतो. महाराष्ट्र राज्याने याच्या फुलांना राज्यफुलांचा बहुमान दिलेला आहे.

तामण वृक्षाची फुले व पाने

तामण हा वृक्ष सु. २० मी. उंचीपर्यंत वाढतो. साल फिकट व गुळगुळीत असून तिच्या वेड्यावाकड्या ढलप्या निघतात. पाने आंब्याच्या पानासारखी, परंतु किंचित रुंद असतात आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यांत गळतात. पाने गळताना लाल होतात. या वृक्षाला एप्रिल-मे आणि जुलै-ऑगस्टच्या सुमारास अशी दोनदा फुले येतात. त्यामुळे पानांच्या हिरव्या पृष्ठभागावर ती उठून दिसतात. फुले जांभळ्या रंगाची असतात. त्यांच्या पाकळ्या नाजूक व मुळांशी निमुळत्या असून त्यांच्या कडा तरंगित असतात. जांभळ्या पाकळ्यांच्या मध्यभागी पिवळ्या रंगाचे पुं-केसर असतात आणि एकच लांब स्त्री-केसर असतो. फळे गोलाकार व चपटी असून त्यांत चपट्या व गोलाकार बिया असतात. उन्हाने तडकून त्यातील बिया दूरवर पसरतात. टरफल झाडाच्या फांद्यांवर तसेच चिकटून राहते.

तामणाचे लालसर लाकूड बळकट, चिवट, पाण्यात व बाहेर टिकाऊ असते. नावा, होड्या, घरबांधणी, मोटारी, पेट्या इत्यादींसाठी ते उपयुक्त असते. मूळ उत्तेजक व ज्वरनाशक; साल आणि पाने रेचक आहेत. जून पानांत व पक्व फळांत कोरोसालिक आम्ल असते. रक्तातील शर्करा ते कमी करीत असल्याने हे भाग मधुमेहावर गुणकारी असतात, असे दिसून आले आहे.