स्तनी वर्गातील नर वानर (प्रायमेट्स) गणाच्या होमिनिडी कुलातील एक कपी. मानव,ओरँगउटान व गोरिला यांचाही या कुलात समावेश होतो. पँन प्रजातीत चिंपँझीच्या दोन जाती आहेत. पँन ट्रोग्लोडायटीझ (सामान्य चिंपँझी) आणि पँन पँनिस्कस (बोनोबो). पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील वर्षावनांत सामान्य चिंपँझी आढळतात. तर कांगो देशाच्या वनात बोनोबो आढळतात.

चिंपँझीची उंची १-१.७ मी. असून नराचे वजन ५६-८० किग्रॅ., तर मादीचे वजन ४५-६८ किग्रॅ. असते. चेहरा सोडून सर्व शरीरावर दाट व काळे केस असतात. चेहरा काळसर तांबूस असून डोळे तपकिरी असतात. भुवयांचे कंगोरे मोठे असतात. ओठ पुढे आलेले असून भावदर्शक असतात. कान लहान असतात. त्यांना श्रोणि-किण (ढुंगणावरील घट्टे), कपोल-कोष्ठ (गालातील पिशव्या) आणि शेपूट नसते. बरगड्या २६ असतात. हात पायापेक्षा लांब असून बळकट असतात. काही अंतर ते माणसाप्रमाणे पायावर चालू शकतात; परंतु जास्त करून चतुष्पादाप्रमाणेच चालतात. चालताना हातांची बोटे आत वळवून ते बोटांचे सांधे जमिनीवर टेकवतात. चिंपँझीच्या पायांची बोटे लांब असतात. त्यामुळे ते पायांनी वस्तू पकडू शकतात. माणसाप्रमाणेच हाताला आंगठा असतो. आंगठा व इतर बोटे यांनी ते लहान वस्तू पकडू शकतात. चिंपँझीचा मेंदू मानवी मेंदूच्या तुलनेत आकाराने अर्धा असतो.

चिंपँझी (पँन ट्रोग्लोडायटीझ)

कुस्करलेल्या पानांचा स्पंजप्रमाणे उपयोग करून चिंपँझी पाणी पितात. ते मुख्यत: फळे व पाने खातात, काही वेळा कीटकही खातात. हातात छोटी काटकी घेऊन वारुळातून वाळवीसारखे कीटक काढून खातात. क्वचितप्रसंगी ते हरिण व माकड यांची शिकार करतात. दिवसाचा ५०—७५% काळ ते झाडांवर घालवितात. त्यांच्या कुटुंबात एक नर, अनेक माद्या व पिल्ले असतात. झोपण्यासाठी ते एकाच झाडाच्या किंवा वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या विणून त्यांच्यावर घरटे तयार करतात. विशेष म्हणजे ही कला त्यांच्या माद्यांकडून पिल्लांना शिकविली जाते. घरटे सु.५ मी. व्यासाचे, जमिनीपासून ४-५ मी.हून जास्त उंचीवर असून त्यात मऊ पानांचे व डहाळ्यांचे अस्तर असते. मादीमध्ये ऋतुचक्र स्त्रियांप्रमाणे २७-३० दिवसांचे असते. गर्भावस्था सु.९ महिन्यांची असून मादी एका वेळी एकाच पिल्लास जन्म देते. साधारणपणे दर ३-४ वर्षांतून एकदा वीण होते. चिंपँझीचा आयु:काल वनांत असताना ३०-४० वर्षे असतो. मात्र प्राणिसंग्रहालयात ठेवल्यास त्यांचा आयु:काल ५०-६० वर्षे एवढा असतो.

चिंपँझी माणसांप्रमाणे आवाज काढून, हातवारे करून किंवा चेहऱ्यांच्या खाणाखुणा करून एकमेकांशी संवाद साधतात. त्यांची भाषा २४ वेगवेगळ्या आवाजांची असून त्यातील प्रत्येक आवाजाला एक विशिष्ट अर्थ असतो. आवाज करण्यात त्यांना मोठा आनंद वाटतो. आवाज करून ते आपल्याला काय वाटते ते समूहातील इतरांना सांगतात. त्यांच्या भाषेची शब्दावली तयार झालेली आहे. त्यांना १-९ संख्या ओळखायला येऊ शकतात. चिंपँझी त्यांच्या समूहात एकमेकांचे हित पाहतात, मात्र वेगळ्या समूहातील चिंपँझीशी ते भिन्न वागतात; तथापि, वनात अनाथ पिल्लांना चिंपँझीने दत्तक घेतल्याचे आढळून आले आहे.

चिंपँझी हा बुद्धिमान, चिकित्सक, लवकर शिकणारा व खेळकर प्राणी आहे. जेन गुडॉल या महिला मानववंश वैज्ञानिकेने टांझानियातील गोंबे स्ट्रीम नॅशनल पार्क या उद्यानात राहून चिंपँझीच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा अभ्यास केला. एकमेकांना मिठी मारणे, मुके घेणे व पाठीवर थाप मारणे अशा क्रिया चिंपँझी माणसासारख्याच करतात. तसेच त्यांच्या कुटुंबात ते एकमेकांना आधार देतात, समजून घेतात आणि आयुष्यभर सोबत राहतात. चिंपँझीचे भौतिक गुणधर्म आणि सामाजिक जीवन यांबाबतीत माणसाशी साधर्म्य असल्याने त्यांचा उपयोग वैद्यक आणि मानसशास्त्रीय संशोधनासाठी वैज्ञानिक करीत आहेत. चिंपँझीच्या दोन्ही प्रजाती मानवाशी संबंधित असून सु.६० लाख वर्षांपूर्वी चिंपँझी व मानव यांचे पूर्वज एकच असावेत, असे वैज्ञानिकांचे मत आहे. १९७३ मध्ये झालेल्या संशोधनातून मानव व चिंपँझी यांच्या डीएनएच्या रेणूंमध्ये जवळपास ९६% समानता आढळली आहे.