साबुदाणा (मेट्रोझायलॉन सॅगो) : (१) वृक्ष, (२) फुलोरा, (३) फळे, (४) साबुदाणा.

(सॅगो). एक पिष्टमय खाद्यपदार्थ. साबुदाणा हा पदार्थ पाम वृक्षांच्या – ॲरेकेसी कुलातील – विशेषत: मेट्रोझायलॉन सॅगो या वृक्षापासून मिळवतात. या वृक्षाच्या खोडातील गाभ्यापासून साबुदाणा मिळवत असल्याने ‘सॅगो’ हे इंग्रजी नाव साबुदाण्याला पडले असावे. सायकस प्रकारच्या सायकस रेव्होल्यूटा खोडापासूनही साबुदाणा तयार करतात. परंतु या वनस्पतींमध्ये चेताविष असल्याने साबुदाणा मिळवण्याची प्रक्रिया काळजीपूर्वक करावी लागते. पाम वृक्षांपासून मिळणारा साबुदाणा तसेच बटाटा, टॅपिओका (मॅनिहॉट एस्क्युलेटा) यांपासून मिळणारा साबुदाणा सारखेच दिसतात आणि काही पदार्थांमध्ये अनेकदा आलटून-पालटून वापरतात. मेट्रोझायलॉन प्रजातीत एकूण सात जाती असून त्या पॅसिफिक महासागराच्या सामोआ, न्यू गिनी, सॉलोमन, मलुकू, फिजी या बेटांवर पाणथळ जागी वाढतात. मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपीन्स या देशांत या वनस्पतींची लागवड केली जाते.

मेट्रोझायलॉन सॅगो हा वृक्ष ९–२५ मी. उंच वाढतो. खोड शाखाहीन असून त्याचा घेर १.२५-१.५० मी. असतो. पाने खोडाच्या टोकाला येत असून ती संयुक्त, मोठी, पिसांसारखी असतात. एका वृक्षाला सु. २० पाने असून ती १० मी. लांब असतात. सु. १५ वर्षांच्या सुमारास झाडाची वाढ पूर्ण होऊन या झाडाला एकदाच स्थूलकणिश प्रकारचा मोठा फुलोरा येतो. फुलोरा ३–७.५ मी. उंच असतो. फळ आठळीयुक्त असून सु. ५ सेंमी. व्यासाचे असते. त्यावर हिरव्या रंगाचे खवले असून पिकल्यावर ते पिवळे होतात. मे. सॅगो या वृक्षाची वाढ पूर्ण झाल्यावर त्याच्या खोडातील स्टार्च बीजनिर्मितीसाठी वापरले जात असल्याने, फुलोरा येण्याआधी किंवा आल्यावर हा वृक्ष तोडतात. त्याच्या खोडाचे सु. १ मी. लांबीचे तुकडे करून ते उभे चिरतात व कठीण सालीपासून भेंड (मगजासारखा भाग) वेगळी करतात. ती भेंड दळतात व तिच्यापासून रवाळ पीठ करून ते पाणी घालून बारीक चाळणीवर फेसतात. त्यामुळे पिठातील पिष्टमय भाग चाळणीखाली जमा होतो, तर चोथा मागे राहतो. या क्रियेत वेगळा केलेला स्टार्चयुक्त भाग दोन-तीन वेळा पाण्याने धुतात व सुकवतात. याचा पुन्हा लगदा करून बुंदीच्या कळ्या कराव्यात तसे चाळणीतून कणी पाडतात व सपाट तव्यावर तेल लावून भाजून घेतात. यातून तयार झालेल्या कणांना ‘पर्ल सॅगो’ म्हणजेच साबुदाणा म्हणतात.

मेट्रोझायलॉन सॅगो या जातीपासून मिळालेल्या साबुदाण्यात मुख्यत: स्टार्च (कर्बोदके) असतात; प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे अत्यल्प प्रमाणात असतात. पापुआ न्यू गिनी व इंडोनेशियालगतच्या मलुकू बेटांवरील लोकांचे साबुदाणा मुख्य अन्न आहे. अनेक देशांत साबुदाण्याचे पीठ वेगवेगळ्या खाद्यपदार्थांत उदा., पुडिंग, बेकरी पदार्थ यांत मिसळतात. ब्रूनाई देशात ‘अंबुयात’ नावाचे पक्वान्न तयार करतात. यूरोप, अमेरिका येथे सूप व सॉस यांना दाटपणा येण्यासाठी त्यांत मिसळतात. भारतात उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खीर, खिचडी, वडे तयार करतात. तसेच लहान मुले व रुग्ण यांना आजारपणात पचायला हलका म्हणून साबुदाण्याची खीर देतात. सुती कापडास कडकपणा आणण्याकरिता कापडगिरण्यांत साबुदाण्यातील स्टार्च खळीप्रमाणे वापरतात. जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साबुदाणा तयार करतात. जसे, मलेशियामध्ये पाम वृक्षांपासून, अमेरिकेमध्ये सायकस वृक्षाच्या भेंडेपासून, जावामध्ये रताळ्यांपासून, तर भारतामध्ये ‘टॅपिओका’ वनस्पतींपासून साबुदाणा तयार करतात. इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांकडून साबुदाण्याचा सर्वांत अधिक पुरवठा केला जातो.