उष्ण व उपोष्ण प्रदेशांत आढळणारी बहुवर्षायू वनस्पती. ही भेंडीच्या माल्व्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिडा ॲक्यूटा आहे. तसेच ती सिडा कार्पिनिफोलिया या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. ही वनस्पती मूळची मध्य अमेरिकेतील असून ती नेपाळ आणि भारतातील उष्ण भागात वाढते. तिला जंगली मेथी व तुकटी असेही म्हणतात.
चिकणा ही वनस्पती तणासारखी व अनेकशाखी आहे. उंची १—१.५ मी. असून तिच्या शाखांवर तारकाकृती केस असतात. पाने साधी, एकाआड एक, दातेरी, लांबट व भाल्याप्रमाणे असून त्यांच्या बगलेत एक किंवा दोन पिवळी फुले येतात. फळ शुष्क, लहान, साधारण दबलेले व पुष्पकोशाने वेष्टित असते. बिया पिंगट काळसर व चकचकीत असतात.
चिकणा वनस्पतीचे मूळ कडू, त्रिदोषनाशक, स्तंभक, शामक, पाचक व मूत्रल असून ज्वरावर आणि शरीरदाहावर उपयुक्त असते. पाने गरम करून व तिळाचे तेल लावून ती गळवांवर लावतात. खोडापासून मिळणारा धागा तागापेक्षा बळकट असतो. या धाग्यापासून बारीक व बळकट दोरा आणि काढण्या बनवितात. खोडांपासून केरसुण्या, बुट्ट्या व चटया बनवितात. बकऱ्यांनी ही वनस्पती खाल्ली असता त्यांना लयकारिका संचय रोग होतो.