शिरीष (अल्बिझिया लेब्बेक) : (१) वृक्ष, (२) फुले, (३) शेंगा, (४) बिया.

(वुमन्स टंग ट्री / फ्लिया ट्री). एक पानझडी, जलद वाढणारा शिंबावंत वृक्ष. शिरीष हा वृक्ष फॅबेसी कुलाच्या अल्बिझिया प्रजातीतील आहे. बाभूळ, वाटाणा, सोयाबीन या वनस्पतीही फॅबेसी कुलातील आहेत. अल्बिझिया प्रजातीत सु. १५० जाती असून भारतात या वृक्षाच्या १८ जाती आढळतात. यांपैकी अल्बिझिया लेब्बेक ही जाती प्रातिनिधिक व सर्वपरिचित आहे. हा वृक्ष मूळचा भारत, मलेशिया, न्यू गिनी व ऑस्ट्रेलिया येथील असून त्याची लागवड जगाच्या उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत केली जाते. आफ्रिका खंडातील अनेक देशांतही तो लागवडीखाली आहे.

शिरीष वृक्षाची उंची १८–३० मी. असून खोडाचा घेर ५० सेंमी. ते १ मी. असतो. खोडाची साल राखाडी, खडबडीत असून तीवर आडव्या रेषेत वल्करंध्रे असतात. साल भेगाळलेली असल्यामुळे तिच्या लहान-लहान ढलप्या निघतात. फांद्या लांब, मोठ्या व पसरट असतात. कोवळ्या फांद्या गुळगुळीत असतात. पाने संयुक्त, एकाआड एक, दोनदा विभागलेली व पिसांसारखी असून दलांच्या २–४ जोड्या असतात. प्रत्येक दल ११–१२.५ सेंमी. लांब असून दलकांच्या २–११ जोड्या असतात. दलके अंडाकृती, लहान देठाची असतात. फुले गोलाकार स्तबक फुलोऱ्यात एप्रिल–जून महिन्यांत येतात; फुलोऱ्यावर देठ असलेली, लहान, द्विलिंगी, सुवासिक व हिरवट-पांढरी फुले असतात. पुंकेसर अनेक असून ते फुलांच्या पाकळ्यांपेक्षा लांब, बारीक व नाजूक, तसेच तळाशी जुळलेले असतात. शेंगा १३–२० सेंमी. लांब, चपट, दोन्ही टोकाला गोलसर, फिकट पिवळ्या, गुळगुळीत व चमकदार असतात आणि त्या तडकत नाहीत. वाळलेल्या शेंगा वाऱ्याने जोरात हलल्यावर जो कलकलाट ऐकू येतो, त्यावरून या वृक्षाला इंग्लिश भाषेत ‘वुमन्स टंग’ हे रूपकात्मक नाव दिले आहे. यावरूनच वेस्ट इंडिज व दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये या वृक्षाला ‘शक शक वृक्ष’ असे नाव पडले आहे. शेंगेत ४–१२ बिया असतात; बिया लंबगोल, चपट्या, फिकट व पिंगट असतात.

शिरीष वृक्षाचे लाकूड कठीण व टिकाऊ असते. त्यापासून सजावटी सामान, शेतीची अवजारे, खेळणी इत्यादी वस्तू तयार करतात. त्याची साल रंगविण्यास, कातडी कमविण्यास आणि मासेमारीची जाळी रंगविण्यास उपयुक्त असते. खोडातून डिंक मिळतो. शिरीषाची साल, पाने, फुले व बिया औषधी मानली जातात. पाने जनावरांना चारा म्हणून घालतात. चहाच्या व कॉफीच्या मळ्यांत सावलीकरिता या वृक्षाची लागवड करतात. पाने फॉस्फरसचा उत्तम स्रोत आहेत. नायट्रोजन स्थिरीकरणासाठी हा एक चांगला वृक्ष आहे.

भारतात शिरीष वृक्षाच्या अल्बिझिया ओडोरॅटिसिमा (काळा शिरीष) आणि अल्बिझिया प्रोसेरा (पांढरा शिरीष) या जातीही बऱ्याच प्रमाणात आढळतात. अल्बिझिया प्रजातीतील अनेक वनस्पतींची लक्षणे जवळपास सारखीच असतात. मात्र त्यांच्या फुलांच्या रंगात विविधता आढळून येते. रस्त्याच्या दुतर्फा तसेच बागांमध्ये शोभेसाठी, सावलीसाठी शिरीषाच्या निरनिराळ्या जातींची लागवड केलेली आढळून येते.