चिकोरी (सिकोरियम इंटीबस)

चिकोरी ही एक बहुवर्षायू वनस्पती ॲस्टरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिकोरियम इंटीबस आहे. याच वनस्पतीच्या मुळांची भुकटी सामान्यपणे कॉफीच्या भुकटीत स्वाद आणण्यासाठी मिसळली जाते. ही मूळची यूरोपातील असून ती कासनी या नावानेही ओळखली जाते. जगभरात अनेक ठिकाणी आढळते. भारतात गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, पंजाब व आंध्र प्रदेश अशा काही राज्यांत ही वनस्पती समुद्रसपाटीपासून १,८०० मी. उंचीपर्यंत लागवडीखाली आहे.

चिकोरीचे झुडूप सरळ सु. १ मी. उंच वाढते. फांद्या मजबूत व कठीण असून सर्व बाजूंनी पसरतात. वरची पाने मूलजाभासी, साधी, एकाआड एक, केसाळ, दीर्घ वर्तुळाकृती; खालची पाने खंडित असून टोकांना दंतुर असतात. सोटमूळ लांब व मांसल असते. फुले भडक निळी, फांद्यांच्या टोकाला गुच्छाने येतात. फळे मऊ, एकबीजी, अस्फुटनशील असून त्यांभोवती उभे रोमगुच्छ असतात.

चिकोरी वनस्पतीचे सर्व भाग उपयुक्त आहेत. तिच्या मुळांवर प्रक्रिया करून पीठ तयार करतात आणि कॉफीला स्वाद, रंग व कडवटपणा आणण्यासाठी कॉफीच्या भुकटीत मिसळतात. भुकटीला लॅक्टूसीन आणि लॅक्टूकोपिक्रीन या दोन मुख्य संयुगांमुळे कडवटपणा येतो. तिच्यात कॅफीन नसते. त्यामुळे चिकोरीमिश्रित कॉफीमध्ये निव्वळ कॉफीच्या तुलनेत कमी कॅफीन असते. चिकोरीची कच्ची पाने सॅलड करण्यासाठी उपयोगी पडतात. मूळ मूत्रल पौष्टिक आहे. गुरांना चारा म्हणून पाला खाऊ घालतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा