गोम हा प्राणी संधिपाद (आर्थ्रोपोडा) संघाच्या अयुतपाद (मिरिअ‍ॅपोडा) वर्गातील आहे. जगातील सगळ्या उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत हा आढळतो. बहुतेक गोमा भूचर असून दिवसा जमिनीच्या, दगडधोंड्यांच्या किंवा पालापाचोळ्यांच्या खाली, खडकाच्या भेगांत किंवा घरामध्ये काळोखी तळघर व स्नानगृह अशा ठिकाणी दमट कोपर्‍यात राहतात. रात्री त्या भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतात. काही जातीच्या गोमा ओहोटीच्या वेळी उघड्या पडणार्‍या सागरकिनारपट्टीवरील सागरी वनस्पती, दगड, रिकामे शंख आणि कृमींच्या नळ्या यांमध्ये आढळून येतात.

गोमेची लांबी २.५-१५ सेंमी. असते. शरीर चपटे आणि खंडांनी बनलेले असते. या खंडांची संख्या १५-१८० पर्यंत असू शकते. दक्षिण अमेरिकेत आढळणा-या स्कोलोपेंड्रा जायगेंटी ही गोम २० सेंमी. पर्यंत लांब असते. शरीराचे डोके आणि धड असे दोन स्पष्ट भाग असतात. डोक्यावर लांब स्पर्शेंद्रियाची एक जोडी (स्पृशा), चर्वणाकरिता दंतूर जंभांची (भक्ष्याचे तुकडे करण्याकरिता असणार्‍या संरचनांची) एक जोडी आणि मुखाकडे अन्न नेण्याकरिता जंभांच्या मागे असणार्‍या उपांगांच्या म्हणजे जंभिकांच्या दोन जोड्या असतात. धडाचा पहिला खंड आणि शेवटचे दोन खंड वगळून प्रत्येक खंडावर पायांची एक जोडी असते. प्रत्येक खंडावर श्वासरंध्रांची एक जोडी असते. काही गोमांना डोळे नसतात. याखेरीज काहींमध्ये संयुक्त डोळे तर काहींमध्ये डोळ्यांसारखे बिंदू (नेत्रके) असतात. धडाच्या पहिल्या खंडावर एक पोकळ अशी चिमट्याच्या आकाराची विषारी नखांची जोडी असते. पकडलेल्या भक्ष्याच्या अंगात गोम तीक्ष्ण नखे खुपसून विषग्रंथीतील विष सोडते. लहान कीटक व कृमी हे गोमांचे भक्ष्य होय. मादीमध्ये एक जननग्रंथी तर नरामध्ये १ ते २४ जननग्रंथी (वृषणे) असतात. जननरंध्रे शेवटच्या खंडाच्या अलीकडील खंडावर उघडतात. गोमा मातीत अंडी घालतात. काही जातींच्या गोमा अंडी वाळून सुकून जाऊ नयेत म्हणून अंड्यांच्या पुंजक्यांभोवती शरीराचे वेटोळे करतात.

गोमेच्या दंशामुळे ताप, चक्कर व डोकेदुखी उद्भवते. मोठ्या गोमेच्या दंशामुळे लहान बालकांचा मृत्यू ओढविण्याचा धोका असतो. घरात आढळणारी व पायांच्या १५ जोड्या असणारी गोम विषारी नाही. उलट घरातील झुरळे, डास, कसर व ढेकूण यांसारख्या उपद्रवी कीटकांना खाऊन गोम माणसासाठी उपकारकच ठरते.