गोमाशी

संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील एक प्राणी. गोमाशीचा समावेश डिप्टेरा गणाच्या टॅबॅनिडी कुलात होतो. या माशीचे शास्त्रीय नाव टॅबॅनस लिनेओलस असे आहे. या माश्या मुख्यत: उष्ण व उपोष्ण प्रदेशांत आढळतात. प्रौढ गोमाश्या उडणार्‍या असून पाण्याच्या जवळपास उडताना आढळतात.

माशीचे शरीर सर्वसाधारण कीटकांप्रमाणेच डोके, वृक्ष आणि उदर या तीन भागांनी बनलेले असते. डोके मोठे व अर्धवर्तुळाकार असून त्यावर शृंगिकांची एक जोडी, दोन मोठे संयुक्त डोळे, तीन साधे डोळे आणि मुखांगे असतात. मुखांगे भोके पाडणारी व शोषक प्रकारची असतात. वक्ष तीन अस्पष्ट खंडांनी बनलेले असून त्यावर पंख आणि पाय असतात. पंखांची पहिली जोडी मोठी, रुंद व पारदर्शक असते. दुसरी जोडी अत्यंत छोटी आणि काडीसारखी असते. पहिल्या जोडीचा उपयोग उडण्यासाठी आणि दुसर्‍या जोडीचा उपयोग ज्ञानेंद्रिये आणि संतोलक म्हणून होतो. माश्या उडताना या पंखांमुळे गुणगुणणारा आवाज होतो. पायांच्या तीन जोड्या असतात. उदर हे नरामध्ये आठ खंडांनी आणि माद्यांमध्ये नऊ खंडांनी बनलेले असते. वक्ष आणि उदर लवदार असतात. जीवनचक्रात अंडे, अळी, कोश आणि प्रौढावस्था असे चार टप्पे असतात.

गोमाश्यांमुळे गुराढोरांमध्ये काळपुळी या संसर्गजन्य रोगाचा प्रसार होतो. नर गोमाश्या फुलातील मकरंद किंवा वनस्पतीतील रस शोषतात; परंतु माद्या रक्तशोषक असतात. त्या माश्या गायी, बैल व घोडे यांच्या कातडीला भोके पाडतात. भोके पाडण्यासाठी मुखांगांमध्ये सोंडेसारखा भाग असतो. भोके पडल्यामुळे रक्तस्राव होतो. रक्त शोषून घेऊन मादी गोमाश्या टच्च फुगतात. गायीबैलांभोवती आढळणारी माशी गोमाशी या नावाने, तर घोड्यांभोवती आढळणारी घोडामाशी या नावाने ओळखली जाते. या माश्या माणसाचेही रक्त शोषतात.