सगळ्या मृगांमध्ये चितळ सुंदर व आकर्षक दिसतो. पूर्ण वाढ झालेल्या नराची खांद्याजवळ उंची सु.९० सेंमी. आणि वजन सु.८५ किग्रॅ. असते. त्याचा रंग तांबूस विटकरी असून त्यावर पांढरे ठिपके असतात. पोटाकडील भाग पांढरा असतो. पाठीवर डोक्यापासून शेपटापर्यंत गेलेला एक काळा पट्टा असतो. चितळाच्या पाडसाचा रंग पिवळसर असतो. नराला दोन डौलदार शिंगे असून त्यांना तीन टोकदार शाखा असतात. पहिली शाखा कपाळापाशी आणि शिंगाच्या बाकीच्या भागाशी साधारणपणे काटकोन करणारी असते. बाकीच्या दोन शाखा वर टोकाला असतात. मादीला शिंगे नसतात. मादीचा रंग नरासारखाच असून ती आकाराने नराहून लहान असते.
चितळ समाजप्रिय प्राणी आहे आणि ते कळपाने राहतात. एकेका कळपात १०—३० चितळ असून त्यात दोन-तीन नर असतात. पुष्कळदा ३०—५० किंवा त्याहूनही अधिक चितळांचे कळप आढळतात आणि त्यात निरनिराळ्या वयाचे नर, माद्या आणि पिल्ले असतात. अनेकदा ते वनातील बऱ्याच प्राण्यांसोबत वावरतात. ते दिनचर आहेत. सकाळी व सायंकाळी ते चरतात आणि दुपारच्या वेळी विश्रांती घेतात. गवत हे त्यांचे मुख्य अन्न असले तरी झाडांची गळून पडलेली पाने, फुले आणि फळेही ते खातात. लंगूर आणि चितळ यांची विशेष मैत्री दिसते. चितळांची तीक्ष्ण घ्राणेंद्रिये आणि झाडावर बसलेल्या लंगुरांची दूरवर पोहोचू शकणारी नजर यांच्या साहाय्याने ते एकमेकांना हिंस्र प्राण्यांपासून ओरडून सावध करतात.
नराची मृगशिंगे दरवर्षी गळून पडतात. शिंगे गळून पडण्याचा कालखंड स्थानानुसार बदलतो. मध्य प्रदेश व दक्षिण भारतातील चितळांची शिंगे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात गळतात. गळून पडलेली शिंगे पौष्टिक अन्न म्हणून चितळ खातात. शिंगे गळून गेलेले नर कळपापासून वेगळे राहतात. नवीन शिंगे आल्यावर ते परत कळपात सामील होतात.
चितळांचा प्रजननकाळ वर्षातून अमूक असा निश्चित नाही. उन्हाळ्यात तसेच हिवाळ्यात त्यांचे प्रजनन होत असते. उन्हाळ्यात त्यांचा समागम अधिककरून होत असावा. या काळात नर चितळ मादीला साद घालतात. समागमाच्या काळात माद्यांवरून नरांमध्ये झुंजी होतात. शिंगांचा शस्त्राप्रमाणे वापर केला जातो. कळपाच्या स्वामित्वासाठी नर शिंगाने परस्परांवर हल्ला करतात तेव्हा वनात शिंगे आपटल्याचा आवाज येत राहतो. चितळाची मादी एकावेळी एकाच पाडसाला जन्म देते. दर सहा महिन्यांनी मादी नव्या पाडसास जन्म देऊ शकते. नवी आणि आधीच्या हंगामातील पाडसे एकाच वेळी आईचे दूध पितात. पाडस तीन वर्षांनी प्रजननक्षम होते. चितळाचा आयु:काल २०—३० वर्षांचा असतो.