स्तनी वर्गाच्या नरवानर (प्रायमेट्स) गणाच्या पाँजिडी कुलातील एक कपी. या कुलात ओरँगउटान आणि चिंपँझी यांचाही समावेश होतो. गोरिला आणि मानव या दोघांमध्ये साम्य असल्यामुळे त्याला ‘मानवसदृश कपी’ असे म्हणतात. सर्व कपींमध्ये गोरिला आकाराने मोठा आहे. नर गोरिलाची उंची १.२५-१.७५ मी. व वजन १४०-२७५ किग्रॅ. असते. एका जातीच्या गोरिलाचे शास्त्रीय नाव गोरिला गोरिला असे असून ते पश्चिम आफ्रिकेच्या काँगो नदीच्या खोर्‍यात आढळतात. दुसर्‍या जातीचे शास्त्रीय नाव गोरिला बेरिंगेई असून ते पूर्व झाईरे आणि पश्चिम युगांडातील पर्वतात आढळतात.

गोरिला वृक्षवासी आणि जमिनीवरही राहणारा आहे. त्यांच्या अंगावर दाट काळे केस असतात. जसजसे वय वाढत जाते तसतसे नराच्या पाठीवरचे केस रुपेरी करडे होतात. चेहरा, कान, हाताचा पंजा आणि पाऊल यांवर केस नसतात. मुस्कट आखूड असून नाकपुड्या मोठ्या तर डोळे बारीक आणि कान लहान असतात. भुवईवर कंगोरा असतो. शेपूट नसते. बरगड्या २६ असतात. गोरिला शाकाहारी असून फळे, पाने इ. खातो. नर गोरिलाचे वजन जास्त असून शरीर भरदार असते. म्हणून तो सहसा झाडावर चढत नाही. मात्र प्रसंगी तो झाडावर सहज चढू शकतो. गोरिला समूहाने राहतो. असे समूह ५-३० जणांचे असतात. नर-माद्यांचे प्रमाण साधारणपणे २:९ असे असते. समुहातील प्रत्येकजण एकमेकांची काळजी घेतो. एकमेकांमध्ये हावभावाद्वारे किंवा काही विशिष्ट आवाजाद्वारे अगर खुणांच्या रूपाने संबंध राखले जातात. एका समूहात एक सत्ताधारी नर, काही दुय्यम दर्जाचे नर, बर्‍याच माद्या व पिले असतात. मादी व पिले झाडावर खोपट तयार करून त्यात झोपातात. नर झाडाखाली खोपटात झोपतात. सामान्यपणे नर गोरिला म्हातारा झाला की, त्याला गटातून हाकलून लावतात. नंतर तो एकाकी आयुष्य जगतो.

गोरिलाचे हात पायांपेक्षा लांब असतात. बोटे लहान असतात. म्हणून फांदीला लोंबकळून एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर जाण्यासाठी त्याला हातांचा उपयोग करता येत नाही. पायांचा उपयोग जमिनीवर चालण्यासाठी होतो. गोरिला बेरिंगेई याचे पाय जवळजवळ माणसाच्या पायांसारखेच असतात. गोरिलाची मादी नरापेक्षा लहान असते. सु.९ महिन्यांच्या गर्भावस्थेनंतर मादीला एकच पिलू होते. वनातील गोरिला सु.५० वर्षे जगतो.

गोरिला हा हिंस्र व रक्ताला चटावलेला एक अक्राळविक्राळ प्राणी आहे, अशा गैरसमजुती लोकांच्या मनात आहेत. परंतु तो मनमिळाऊ व शाकाहारी प्राणी आहे. दुपारचा विश्रांतीचा वेळ सोडला, तर तो दिवसाचा बराचसा वेळ अन्नाच्या शोधात भटकत असतो. जेव्हा या प्राण्यांचे वेगवेगळे गट एकत्र येतात तेव्हा क्वचित प्रसंगी त्यांच्यात झटापट होते. मात्र वेगवेगळ्या गटातील माद्या आणि त्यांची पिलावळ बर्‍याचदा एकमेकांच्या गटात जाऊन वेळ घालवितात. जेव्हा दोन गटांच्या नरांमध्ये तणाव निर्माण होतो त्यावेळी एकमेकांवर हिंसक व आक्रमक हल्ला न करता प्रौढ नर गटागटातील ताणतणाव दूर करतात. अशा वेळी हे प्राणी विशेषत: प्रौढ नर स्वत:ची छाती बडवून घेतात.

वेगवेगळ्या मानवी कृतींद्वारे निसर्गातील गोरिलांची संख्या कमीकमी होत आहे. आफ्रिकेत गोरिलांची असलेली काही अभयारण्ये आणि प्राणिसंग्रहालये तसेच जगाच्या इतर काही भागांत त्यांना मुद्दाम बंदिस्त नैसर्गिक पर्यावरणात ठेवून संरक्षण देण्याचे प्रयत्‍न चालू आहेत.