बियाणे पेढी म्हणजे, जनुकीय विविधता जतन करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. बियाणे पेढीत विविध पिके आणि दुर्मीळ  वनस्पती  जातींची बियाणे भविष्यात वापरण्यासाठी  साठविली जातात. पूर्वी प्राणी आणि हवामानापासून बिया सुरक्षित ठेवण्यासाठी बियाणे पेढ्या तयार केल्या जात असत. आज विविध कारणांसाठी बियाणे संचयित करतात. पीक विविधता, नैसर्गिक आपत्ती, रोग, हवामान बदल आणि संशोधन ही सर्व आवश्यक कारणे आहेत.

जेथे पिकांची संख्या  चिंताजनक झालेली आहे, अशा ठिकाणी योग्य बियाणे प्रदान  करणे, आनुवांशिक संसाधनांची संशोधन आणि उपयोजित वापरासाठी जपणूक करणे, संशोधनासाठी बियाणे व त्यासंबंधी माहिती प्रदान करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे यांसाठी बियाणे पेढ्या उपयोगी ठरतात.

बियाणांच्या अनुवांशिक गुणधर्माला इजा न करता त्यांना अनेक वर्षे संग्रहित केले जाऊ शकते. परंतु डीएनएचे (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लाचे ) नुकसान टाळण्यासाठी काही काळानंतर त्यांची पेरणी करावी लागते.  बियाणे उणे ४0 से. तापमानाखाली संग्रहित केली जातात.

वनस्पतींचे संवर्धन  नैसर्गिक अवस्थेमध्ये  इतर पद्धतीनेही केले जाऊ शकते. उदाहरणार्थ क्षेत्रीय जनुक पेढ्या, शास्त्रीय उद्यान, वनस्पतिसंग्रह, परागकण पेढ्या आणि डीएनए पेढ्या स्थापन करतात. परंतु त्यांच्या तुलनेत, बियाणे पेढींचे अनेक फायदे आहेत. उदा; अनेक वर्षे संभाव्य साठवण, लहान जागेची आवश्यकता आणि कमी खर्चात,  लहान जागेत बियाणे अनेक वर्षे साठविता येतात.

या व्यतिरिक्त जी माहिती – कौशल्ये बियाणे पेढ्या प्रदान करतात,  त्याचा वनस्पती संवर्धनाचे उपक्रम विस्तारित करण्यासाठी उपयोग होतो.उदाहरणार्थ, वन्य वनस्पतींची संख्या, किंवा पुरेशी माहिती नसलेल्या नवीन जातींची  लागवड करण्यासाठी जरूरी असलेली माहिती ती उपलब्ध करून देतात.

१) भारतीय कृषिसंशोधन संस्था  (ICAR), नवी दिल्ली;  २) इक्रीसात ( International Crop Research Institute for Semi Arid Tropics :  ICRISAT ),  हैदराबाद;  ३) नवदान्य ( Navdanya) डेहराडून, उत्तराखंड, उत्तर प्रदेश व अन्य १८  राज्ये;  ४) अन्नधान्य बियाणे आणि जमीन संरक्षक (Annadana Seed and Soil Savers) कर्नाटक;   ५) हरित प्रतिष्ठान ( Green Foundation), बंगळुरू ; ६) डेक्कन प्रगती सोसायटी  (Deccan Development Society) तेलंगणा ,सहज समृद्ध  ( Sahaja Samrudha), कर्नाटक  व अन्य अनेक  राज्ये येथे बियाणे पेढ्या आहेत. यांशिवाय अनेक विद्यापीठांतही लहान-मोठ्या बियाणे पेढ्या आहेत.

समीक्षक : डॉ. बाळ फोंडके