पुष्पविन्यास म्हणजे फुलांची अक्षावरील मांडणी. काही वनस्पतींमध्ये फुले एकेकटी येतात; उदा., गुलाब, जास्वंद. अनेक वनस्पतींमध्ये फुले एकत्र किंवा समूहाने येतात; फुलांच्या अशा समूहाला ‘पुष्पविन्यास, पुष्पबंध किंवा फुलोरा’ म्हणतात. परागणासारख्या प्रक्रियेत फुलांवर उडणारे कीटक आणि फुलांवरून वाहणारा वारा एका फुलातील परागकण दुसऱ्‍या फुलात वाहून नेत असतात. म्हणून फुले एकेकटी आणि दूर असण्याऐवजी ती जवळजवळ असणे, हे परागणासाठी आणि बीजनिर्मितीसाठी उपयोगी असते. अनेक प्रगत वनस्पतींमध्ये एकेकट्या फुलांऐवजी पुष्पविन्यास आढळून येतात; उदा., सूर्यफूल, बाभूळ, शिरीष, घाणेरी.

प्रत्येक पुष्पविन्यासात एखाद्या लांब किंवा आखूड दांड्यावर म्हणजे मुख्य अक्षावर फुले येतात. या अक्षावर फाटे फुटून दोन किंवा तीन अक्ष असलेले पुष्पविन्यासही आढळतात. त्याच्या मुख्य अक्षावर लहान व हिरवी पानांसारखी उपांगे असतात, त्यांना ‘सहपत्रे’ म्हणतात. त्याचा मुख्य अक्ष खोडाला जेथे जुळलेला असतो त्या पेरापाशी सामान्यपणे सहपत्रे असतात. परंतु काही वेळा पुष्पविन्यासामध्येही सहपत्रे असतात. सहपत्रांच्या बगलेतून फुले येतात. प्रत्येक फुलाजवळ सहपत्र असल्यास त्यांना ‘सहपत्रके’ म्हणतात. सहपत्रके रंगीत असल्यास पुष्पविन्यासाचे आकर्षण वाढते; उदा., बुगनविलिया. काही पुष्पविन्यासातील सहपत्रे आकाराने मोठी असतात. त्यामुळे सर्व फुलांचे संरक्षण होते; उदा., अळू, माड (नारळ), केळ, केतकी. भाजीसाठी वापरला जाणारा फुलवर (फुलकोबी) हेही पुष्पविन्यासाचे उदाहरण आहे. अंजीर, तुती, फणस व अननस ही खाद्यफळे संपूर्ण पुष्पविन्यासापासून बनलेली असतात.

पुष्पविन्यासांचे वेगवेगळे प्रकार आहेत. पुष्पविन्यासाला शाखा व उपशाखा असणे किंवा नसणे, असल्यास त्यांची मांडणी आणि फुले उमलण्याचा क्रम यांनुसार पुष्पविन्यासाचे प्रकार केले जातात.

असीमाक्ष पुष्पविन्यास : (रेसीमोज).  या पुष्पविन्यासात मुख्य अक्षाच्या टोकाला फूल येत नाही. अक्षाच्या बाजूस असलेल्या सहपत्रांच्या बगलेतून फुले येत असल्यामुळे अक्षाची वाढ होतच राहते. अशा फुलोऱ्यात खोडाच्या वरच्या टोकाला नवीन व कोवळी फुले, तर खोडाच्या खालच्या टोकाला जून फुले असतात. म्हणजेच फुले उमलण्याचा क्रम खालून वर असतो. अशा फुलोऱ्‍याकडे वरून पाहिल्यास कोवळी फुले (किंवा न उमललेली फुले) मध्यभागी, तर उमललेली फुले त्यांच्या बाहेरील अंगास दिसतात. म्हणून याला ‘अभिकेंद्री किंवा अभिअग्र पुष्पविन्यास’ म्हणतात. या पुष्पविन्यासाचे खालीलप्रमाणे उपप्रकार आहेत.

मंजरी : (रेसीम). या पुष्पविन्यासाचा मुख्य अक्ष लांब असतो आणि त्यावर अनेक फुले आलेली असतात. फुलांच्या देठांची लांबी कमी-अधिक परंतु बहुधा सारखी असते. उदा., बाहवा, मुळा, संकेश्‍वर.

असीमाक्ष पुष्पविन्यास व त्याचे प्रकार

कणिश : (स्पाइक). या पुष्पविन्यासाचा मुख्य अक्ष लांब असतो आणि वरच्या टोकाला नवीन व कोवळी फुले, तर खालच्या टोकाला जून व उमललेली फुले असतात. परंतु फुलांना देठ नसतात. त्यामुळे फुले मुख्य अक्षाला चिकटून असतात. असा पुष्पविन्यास एखाद्या लांब कणसासारखा दिसतो, म्हणून त्याला ‘कणिश’ म्हणतात. उदा., आघाडा, निशिगंध, अडुळसा, माठ.

कणिशक : (स्पाइकलेट). असा पुष्पविन्यास गवत कुलातील वनस्पतींमध्ये दिसून येतो. गवतांचे पुष्पविन्यास भिन्न असतात. कणिशके म्हणजे एक किंवा अधिक पुष्पके (लहान फुले) असलेली कणिशे असतात. कणिशके ही देठाची किंवा बिनदेठाची असून मुख्य अक्षावर एखादे कणिश, मंजरी किंवा स्तबक यांप्रमाणे असतात. प्रत्येक कणिशकाच्या तळाशी दोन सहपत्रे म्हणजे वंध्यस्तुषे असतात. त्यांच्या किंचित वर तिसरे सहपत्र म्हणजे पुष्पतुष असते आणि पुष्पतुषाच्या समोर एक सहपत्रक म्हणजे अंतस्तुष असते. कणिशकातील प्रत्येक फुलाचे संरक्षण पुष्पतुष आणि अंत:स्तुष यांद्वारे होते. या सहपत्रांना सामान्यपणे ‘तुस’ म्हणतात. उदा., मका, गहू.

निलंब कणिश : (कॅटकीन). हा पुष्पविन्यास कणिश प्रकारचा असून तो लोंबता असतो. त्यामुळे त्याला ‘निलंब कणिश’ म्हणतात. या पुष्पविन्यासात एकलिंगी  फुले असतात. उदा., तुती, रासबेरी.

छदकणिश : (स्पॅडिक्स). हा पुष्पविन्यास कणिशासारखा असतो आणि त्याचा अक्ष जाडजूड व मांसल असतो. त्यावर एक किंवा अधिक, भडक रंगाची सहपत्रे असतात. या सहपत्रांना छदे म्हणत असल्याने या फुलोऱ्याला छदकणिश म्हणतात. उदा., माड (नारळ), पोफळ, केळ, अळू.

समशिख : (कोरिम्ब). या पुष्पविन्यासात मुख्य अक्ष आखूड असतो. यामध्ये खालच्या फुलांचे देठ लांब, तर टोकाच्या फुलांचे आखूड होत गेलेले असतात. त्यामुळे सर्व फुले साधारणपणे एकाच पातळीत वाढतात. उदा., घाणेरी, मोहरी.

उच्छत्र : (अंबेल). हा पुष्पविन्यास छत्रीसारखा किंवा झुबक्यासारखा दिसतो. त्याचा मुख्य अक्ष खुजा असून त्याच्या टोकाजवळ अनेक फुले दाटीने येतात. फुलांचे देठ जवळपास सारखेच असल्यामुळे फुले एका बिंदूपासून उमलल्यासारखी वाटतात. सहपत्रे नेहमी मंडलात असल्यामुळे त्यांचे परिचक्र बनलेले असते आणि प्रत्येक फूल सहपत्राच्या कक्षेतून उमललेले असते. उच्छत्र पुष्पविन्यास सामान्यपणे शाखायुक्त असतो (संयुक्त उच्छत्र) आणि शाखांवर फुले येतात; उदा., बडिशेप, कोथिंबीर, गाजर. काही वेळा मात्र उच्छत्र पुष्पविन्यास शाखाहीन असतो आणि फुले मुख्य अक्षावर आलेली असतात. उदा., ब्राह्मी.

स्तबक : (कॅपिट्यूलम). हा पुष्पविन्यास एकाच फुलासारखा दिसतो. त्याचा टोकाकडचा भाग चपटा, फुगीर किंवा क्वचित लांबट असतो; त्याला ‘पुष्पाधार’ म्हणतात. त्यावर अनेक बिनदेठाची पुष्पके परिघाकडे येतात. मध्यभागी कोवळी फुले व तेथून कडेला जून फुले आढळतात; उदा., सूर्यफूल, शेवंती, डेलिया. या फुलांमध्ये स्तबकाच्या कडेला पाकळ्यांसारखी दिसणारी किरणपुष्पके आणि मध्यभागी स्तबकाचा मोठा भाग व्यापलेली बिंबपुष्पके असतात. बिंबपुष्पके ही किरणपुष्पकांपेक्षा वेगळ्या रंगाची व आकाराची असतात. किरणपुष्पकांच्या बाहेरच्या भागावर पानांसारख्या दिसणाऱ्‍या सहपत्रांचे एक किंवा अनेक वेढे असतात; त्यांना ‘परिचक्र’ म्हणतात. कधी किरणपुष्पके वंध्य आणि बिंबपुष्पके प्रजननक्षम, तर कधी दोन्हीही प्रजननक्षम असतात. या प्रकारात अनेक सूक्ष्म फुले एकत्र असल्यामुळे कीटकांच्या एकाच भेटीत अनेकांचे परागण साधले जाते. म्हणून हा पुष्पविन्यास अधिक वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रगत मानला जातो.

ससीमाक्ष पुष्पविन्यास व त्याचे प्रकार

ससीमाक्ष पुष्पविन्यास : (सायमोज). या पुष्पविन्यासाच्या प्रकारात मुख्य अक्षाच्या टोकाशी फूल येते आणि त्यामुळे अक्षाची वाढ थांबते. तसेच मुख्य अक्षाच्या टोकाला फूल आल्यानंतर त्याच्या बाजूला सहपत्रांच्या बगलेत लहान फांद्या येऊन फुले येतात आणि त्यांचीही वाढ थांबते. यात मुख्य अक्षावरील फुले आधी उमलतात आणि नंतर बाजूच्या फांद्यावरील फुले उमलतात. म्हणजेच फुले उमलण्याचा क्रम टोकाकडून तळाकडे असा असतो. अशा फुलोऱ्‍याकडे वरून पाहिले असता जून फुले मध्यभागी, तर नवीन फुले कडेला दिसतात. म्हणून त्याला ‘अपकेंद्री पुष्पविन्यास’ म्हणतात. त्याचे उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

एकशाख ससीमाक्ष : मुख्य अक्षाच्या टोकाला फूल आल्यानंतर त्याच्या एकाच बाजूच्या सहपत्राच्या बगलेत फांदी फुटते. या फांदीला फूल आल्यावर तिच्याही त्याच बाजूला किंवा विरुद्ध बाजूला एक फांदी येते व तिच्यावर फूल येते. असा प्रकार पुन:पुन्हा होऊन वक्र पुष्पविन्यास तयार होतो. त्याचे दोन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत: (१) पहिल्या प्रकारात नवीन फांदी मूळ अक्षाच्या एकाच बाजूला पण पुन:पुन्हा त्याच दिशेने येते. असा पुष्पविन्यास सोंडेसारखा दिसतो. त्यास ‘एकतोविकासी पुष्पविन्यास’ म्हणतात. उदा., गेळा, हॅमेलिया. (२) दुसऱ्या प्रकारात नवीन फांदी मूळ अक्षाच्या एका बाजूस परंतु दर वेळी विरुद्ध दिशेत येते. त्यामुळे त्याची मांडणी नागमोडी दिसते. त्याला ‘उभयतोविकासी पुष्पविन्यास’ म्हणतात. उदा., ड्रॉसेरा, हेलिओट्रोपियम.

द्विशाख ससीमाक्ष : मुख्य अक्षावर एकच फूल आल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूंच्या सहपत्राच्या बगलेत एकेक फूल येते; त्याला ‘साधा ससीमाक्ष’ म्हणतात. उदा., मोगरा. काही वेळा बाजूच्या फुलांऐवजी एकेक अक्ष व त्यावर पुन्हा एकेक फूल किंवा अक्ष अशी मांडणी आल्यास त्याला ‘द्विशाख ससीमाक्ष’ म्हणतात. उदा., चमेली, सायली.

बहुशाख ससीमाक्ष : मुख्य अक्षाच्या टोकाला फूल आल्यानंतर त्याच्या बाजूवरील सहपत्रांच्या बगलेतून त्याच पेऱ्‍यावर अनेक दोन व तीन अक्ष येऊन त्यांना फुले येतात. बहुधा हा पुष्पविन्यास उच्छत्रासारखाच दिसतो. उदा., लाल कण्हेर, हॅमेलिया.

संमिश्र पुष्पविन्यास : काही वनस्पतींमध्ये असीमाक्ष किंवा ससीमाक्ष पुष्पविन्यासांचे मिश्रण दिसते. एकूण पुष्पविन्यास असीमाक्ष किंवा ससीमाक्ष परंतु त्याच्या अक्षावरचे फुलोरे ससीमाक्ष किंवा असीमाक्ष असू शकतात. उदा., ॲस्टर, तुळस, सब्जा इ. अशा फुलांना देठ नसतात. पाइन, फर व देवदार या वनस्पतींना खवलेयुक्त व भोवऱ्‍याच्या आकाराचे बीजोत्पादक इंद्रिय असते; त्याला ‘शंकू’ म्हणतात. या शंकूला काहीजण फूल मानतात, तर काही पुष्पविन्यास मानतात.

पुष्पविन्यासाचे खास प्रकार

खास प्रकार : वड, पिंपळ व उंबर या वनस्पतींमध्ये पुष्पाधार लहान चंबूसारखा किंवा गोटीसारखा असून त्याच्या आतील बाजूस असलेल्या पोकळीत सूक्ष्म एकलिंगी फुले येतात. या प्रकाराला ‘कुंभासनी पुष्पविन्यास’ म्हणतात. यूफोर्बिएसी कुलातील चषकरूपी पुष्पविन्यासात मकरंद स्रवणाऱ्या ग्रंथी असतात. फुलांतील पाच सहपत्रकांचे रूपांतर परिचक्रात झालेले असून त्यात मध्यभागी एक मादी-फूल असते आणि त्याभोवती अनेक नर-फुले असतात. अशा फुलांमध्ये मादी-फूल पहिल्यांदा उमलते आणि नंतर नर-फुले उमलतात. तुळस व सब्जा या वनस्पतींमध्ये खोडाच्या प्रत्येक पेराच्या दोन्ही बाजूंना ससीमाक्ष पुष्पविन्यासात फुले उमलतात आणि पेरापाशी मंडल तयार करतात. हा पुष्पविन्यास खास प्रकारचा असून त्याला ‘कुटचक्र’ पुष्पविन्यास म्हणतात.

वर्गीकरणविज्ञानात पुष्पविन्यासाचे महत्त्व ओळखले गेले आहे. उदा., पोएसी (गवतकुल) कुलातील सर्व वनस्पतींचे पुष्पविन्यास एकाच प्रकारचे असतात. त्याचप्रमाणे अंबेलीफेरी (चामर कुल), कंपॉझिटी (सूर्यफूल कुल), क्रॅसुलेसी (घायमारी कुल) ही कुले आणि स्मायलॅक्स, मॅलस, यूफोर्बिया इ. प्रजाती त्यांच्या खास प्रकारच्या पुष्पविन्यासाने ओळखल्या जातात.

प्रतिक्रिया व्यक्त करा