सपुष्प वनस्पतींच्या वाढीमध्ये पुष्प (फूल) व फळ आणि बीजधारणा हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. वनस्पतींचे लैंगिक प्रजनन फुलांद्वारे होते. निसर्गतः पुष्पविन्यासाची (Inflrorescence) आणि पुष्पाची रचना यात वैविध्य आहे. तसेच फुलांची वैशिष्ट्ये जसे की, रंग, आकार, परिमिती यांतही विविधता आहे. वनस्पतींच्या प्रजननशील वाढीसाठी काही विशिष्ट घटक कारणीभूत असतात. दिवस-रात्र यांचे चक्र व त्यांचा कालावधी आणि फ्लोरिजेन यासारखे संप्रेरक यांचा लैंगिक प्रजननाशी खूप जवळचा संबंध आहे. कायिक (Vegetative) वाढीच्या ठराविक टप्प्यानंतर कायिक कळीमध्ये रेणवीय बदल होतात आणि पुष्पविन्यास विकसित होतो. अशाच प्रकारे कायिक कळीचे रूपांतर फुलाच्या कळीमध्ये होते.

सर्वसाधारण फुलामध्ये एकूण चार दले असतात. सर्वांत बाहेरील बाजूस निदलपुंज (Calyx), त्याच्या आत दलपुंज Corolla), त्याच्या आत पुमंग (Androecium) आणि मध्यभागी जायांग (Gynoecium)असते. निदलपुंजामध्ये निदले (Sepals) आणि दलपुंजामध्ये दले (Petals) असतात. पुमंग पुंकेसराचे (Stamens) आणि जायांग स्त्रीकेसराने (Carpels) बनलेले असते. फुलाचे सौंदर्य त्याच्या सर्व दलांच्या रंग, आकार, सममिती आणि रचना यांमुळे दिसून येते. काही पुष्पांमध्ये मकरंदकोश आणि सुवासिक द्रव्ये असतात.

पुष्पाचे आद्यांग (Primordium) विकसित होण्यासाठी फुलाच्या कळीची विभाजी ऊती चार भागांमध्ये विभागली जाते. परिघीय भागापासून आत मध्यभागापर्यंत प्रत्येक भाग फुलाच्या एकेका दलाला विकसित करतो. या वाढीसाठी ऊतींमध्ये होणारे रेणवीय बदल विशिष्ट जनुकीय वर्तणुकीमुळे होतात. जनुकीय शास्त्र आणि रेणवीय जीवशास्त्र यांमधील संशोधनाद्वारे पुष्प विकासाचे कोडे बरेचसे उलगडले गेले आहे.

पुष्पविकासाची ABC स्थिर जनुकांची प्रतिकृती आज सर्वमान्य झाली आहे. पुष्प विकासात A, B आणि C या स्थिर जनुकांची अभिव्यक्ती खूप महत्त्वाची आहे. या जनुक वर्गांची अभिव्यक्ती अधिव्यापी असून ती दोन दलांच्या विकासाचे नियमन करते.

पुष्पविकासाची ABC स्थिर जनुकांची प्रतिकृती :(अ) वर्ग  A – निदलपुंज आणि दलपुंज;(आ) वर्ग  B – दलपुंज आणि पुमंग;(इ) वर्ग  C – पुमंग आणि जायांग.

जायांगाच्या विकासासाठी फक्त वर्ग C जनुकांची अभिव्यक्ती आणि निदलपुंजाच्या विकासासाठी वर्ग A जनुकांची अभिव्यक्ती आवश्यक आहे. तर दलपुंजाचा विकास वर्ग A  आणि B या दोहोंद्वारे होतो. पुमंगाच्या विकासात वर्ग B आणि C यांची करामत असते. जनुकांचे उत्परिवर्तन घडवून शास्त्रज्ञांनी हे पुष्प विकासाचे कोडे उलगडले आहे.

संदर्भ :

  • Instant Notes – Developmental Biology – R.N. Twyman, Bios Scientific Publishers Limited 2001.
  • Developmental Biology – Scott F. Gilbert, 7th edition, e book.
  • http://www.plantcell.org/content/1/1/37.full.pdf+html.
  • lalowerbs.biology.ucsd.edu/yankofsky/flower/flower_organ_identity.htm

समीक्षक : बाळ फोंडके