चांगल्या प्रतीचे अन्न पुरेशा प्रमाणात मिळणे हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. म्हणूच अन्नउत्पादन, अन्नसुरक्षा व अन्नवाहतूक या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. याबाबतीत अब्जांश तंत्रज्ञान खूपच उपयोगी आहे. अन्नउद्योग हा आता जगभर मोठा व्यवसाय झाला आहे.

अनेक प्रकारचे अब्जांशकण जंतुनाशक असतात. त्यांच्या या गुणधर्मामुळे अन्नप्रक्रिया, अन्नसाठवण, अन्नपाकिटे तयार करणे व अन्नवाहतूक या बाबतीत त्यांचा उपयोग केला जातो. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे अन्नाचे पोषण मूल्य कमी होणार नाही याची दक्षता घेवून अब्जांश तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अन्नपदार्थांचा रंग, पोत व चव यामध्ये विविध देशांतील  ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार आवश्यक ते बदल करता येतात. यासाठी टिटॅनियम, सिलिकॉन इत्यादी पदार्थांच्या ऑक्साइडचे अब्जांश कण वापरले जातात. आपणास माहित आहे की धान्याच्या पिठाची साठवण जास्त दिवस झाल्यास त्यात बारीक किडे होतात. किडीचा हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अब्जांश कणांचा वापर उपयुक्त ठरतो. याच कारणास्तव गव्हाच्या पिठामध्ये चांदीचे अब्जांश कण मिसळतात.

‘मागणीनुसार अन्न’ (on-demand food) ही संकल्पना आता सर्वत्र रूढ होऊ लागली आहे. यामध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार अन्न तयार केले जाते. अन्नाची चव व रंग यामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार बदल केले जातात. यासाठी स्वादद्रव्ये, रंगद्रव्ये व जीवनसत्त्वे यांनी भरलेल्या अब्जांश कुपी अन्नपदार्थांमध्ये मिसळतात. त्यांना सक्रीय केल्यावर अन्नाला गरजेनुसार स्वाद, रंग प्राप्त होतो. टिटॅनियम आँक्साइडचे अब्जांश कण मिठाई, चीज, सॉस इत्यादी अन्नपदार्थांचा रंग पांढरा व तेजस्वी करण्यासाठी वापरतात. शीत पेये, आईस्क्रीम व चॉकलेट यामधील चरबी, कर्बोदके व कॅलरी कमी करण्यासाठीदेखील अब्जांश कणांचा उपयोग केला जातो. अशा पदार्थांना जगभर मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने अनेक नामवंत कंपन्या त्यांच्या उत्पादनामध्ये आघाडीवर आहेत. अब्जांश कुपीमध्ये भरलेली जीवनसत्त्वे आणि फॅटी असिड्स बाजारात विकली जात आहेत. त्यांचा उपयोग पेये, मांस, चीज व इतर अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी व ते सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. बेकरीजन्य पदार्थ, मांस उत्पादने, मिठाई इत्यादी पदार्थांवर प्रक्रिया करण्यासाठी व त्यांचे संरक्षण यासाठी अब्जांश कुपी, अब्जांश गोल या प्रकारच्या अब्जांश कणांचा उपयोग होतो हे शेफर ए. व शेफर एस. यांनी सप्रयोग दाखवून दिले.
अज्जांश तंत्रज्ञानाचे अन्न उद्योगामध्ये त्यांच्या विविध उपयोगांमुळे मोठे योगदान आहे.

पहा : अब्जांश अन्नवेष्टन उद्योग, अब्जांश बीजविज्ञान आणि पीक संरक्षण, अब्जांश संवेदके.

संदर्भ :

  • Oberdorster, Environ. Health Perspect. G. 113: 823–839(2005).
  • Dunn,J. http://www.foodmanufacture.co.uk/news/fullstory.php/aid/472/Aminirevolution.html. (2004).
  • Ashwood P., Thompson R. and Powell J. (2007). Exp. Biol. Med. 232(1): 107-117.
  • Renton A.http://observer.guardian.co.uk/foodmonthly/futureoffood/story/0,,1971266,00.html. (2006).
  • Fleischwirtschaft. http://www.aquanova.de/media/public/publikationen2006/Fleischwirtschaft_ProfWeber_NovaSOL_060502.pdf (2006).
  • Shefer A. and Shefer S. U.S. patent application 2003c;20030152629 AI.

                  समीक्षक : वसंत वाघ