जायफळ हा सदापर्णी वृक्ष १०-१२ मी. उंच वाढतो. पाने साधी, एकाआड एक, काळसर हिरवी, रुंद, भाल्याच्या आकाराची व गुळगुळीत असून ७-१४ सेंमी. लांब, ४ सेंमी. रुंद असतात. फुले पानांच्या बगलेत येतात. ती लहान, फिकट पिवळट व घंटेच्या आकाराची असून सुगंधी असतात. नर-फुले व मादी-फुले वेगवेगळ्या झाडांवर येतात. काही नर वृक्षावर अनेक वर्षांनंतर मादीफुले येतात. जायफळाचे झाड सहा-सात वर्षांचे होईपर्यंत ते नर का मादी आहे, ते कळत नाही. मृदुफळे प्रथम पिवळी, ५ सेंमी. व्यासाची, लंबगोलाकार, मांसल व सुवासिक असून ती नंतर तांबूस होतात. ती एकेकटी किंवा ४-५ च्या झुबक्यांत वर्षभर येतात. फळात एकच बी असते. बी लंबगोल असून बाह्यकवच गर्द पिंगट व शेंदरी जाळीदार आवरणाने आच्छादलेले असते; या आवरणाला जायपत्री म्हणतात. बाजारात आलेल्या ‘जायफळ’ बियांवरील कवच काढून पाठविलेल्या असतात.
जायफळाला उग्र वास व तिखट चव असते. ते उत्तेजक, स्तंभक व वायुनाशी असून निद्रानाश, अतिसार, उलटी, उचकी, पोटफुगी, बद्धकोष्ठता व खोकला यांवर गुणकारी आहे. जायफळातून मिळणारे तेल रंगहीन किंवा फिकट पिवळे असते. त्यात कॅफिन हा घटक अधिक प्रमाणात असतो. या तेलाचा वापर सुगंधी प्रसाधने, दंतमंजन, औषधे, अन्नपदार्थ, तेल व साबण यांसाठी करतात. तेलात मिरिस्टिसीन हा विषारी घटक असतो. त्याच्या सेवनाने यकृतावर परिणाम होतो. पाने, फुले व साल उपयोगी असून त्यांच्यापासून बाष्पनशील तेल काढले जाते. जायपत्री तिखट, कडवट, रुचकर व उष्ण असून मसाल्यात व औषधात तिचा वापर करतात.