मॅहॉगनी हा पानझडी वृक्ष मेलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव स्वाएटेनिया मॅहॉगनी आहे. तो मूळचा मध्य अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथील आहे. स्वाएटेनिया प्रजातीतील स्वाएटेनिया मॅक्रोफिला आणि स्वाएटेनिया ‍ह्यूमिलिस या जातींच्या लाकडांनाही मॅहॉगनी म्हटले जात असून त्या जाती भारतात आढळतात. मॅहॉगनी पहिल्यांदा १७९५मध्ये जमेकामधून कोलकाता येथील शास्त्रीय उद्यानात लावण्यात आला. त्याचा प्रसार न झाल्यामुळे १८६५नंतर वेस्ट इंडीजमधून त्याच्या बिया आणून त्या भारताच्या वेगवेगळ्या भागांत उद्यानांमध्ये लावण्यात आल्या. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी बागांमध्ये, रस्त्यांच्या कडेला तसेच शोभेसाठी तो लावलेला दिसून येतो.

मॅहॉगनी (स्वाएटेनिया मॅहॉगनी) : (१) वृक्ष, (२) स्तबक फुलोऱ्यातील फुले, (३) पाने व फळ असलेली फांदी (४) सुकलेल्या बिया

मॅहॉगनी वृक्ष ३०–३५ मी. उंच वाढतो. कोवळ्या भागांची साल मऊ आणि राखाडी असते, तर जुनी झाल्यावर ती काळी पडून तिच्यावर भेगा पडतात. पाने संयुक्त, मोठी, १२–२५ सेंमी. लांब आणि पिसांसारखी असतात. पानांच्या मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंना पर्णिकांची संख्या समान असते. अशा पानांना समपिश्चकी पाने म्हणतात. पर्णिकांच्या ४–८ जोड्या असतात. प्रत्येक पर्णिका ५–६ सेंमी. लांब आणि २–३ सेंमी. रुंद असते. पाने साधारणपणे फेब्रुवारीत गळतात, तर नवीन पालवी मार्च-एप्रिल महिन्यांत येते; त्यानंतर फुले येतात. ती पानांच्या बगलेत स्तबक फुलोऱ्यात येतात. फुले लहान, नियमित, हिरवट पिवळी आणि पंचअवयवी (पंचभागी) असतात. फुलांमध्ये निदले आणि दले प्रत्येकी पाच असून सुटी असतात; पुंकेसर दहा व जुळलेले असतात; अंडाशय ऊर्ध्वस्थ असून त्याभोवती तळाशी एक शेंदरी रंगाचे बिंब असते. फळ बोंड प्रकारचे, मोठे, कठीण, पिंगट आणि तळाला फुगलेले, तर टोकाला निमुळते असते. बिया अनेक, पंखधारी आणि सपाट असून त्यांचा प्रसार वाऱ्याने होतो. ऑक्टोबर–डिसेंबर महिन्यांत फळे पिकतात. पूर्ण वाढ होऊन तडकलेल्या फळातील चांगल्या सुकलेल्या बियांपासून लावलेले वृक्ष चांगले वाढतात. साधारणपणे ३०–४० वर्षांनी फळे येऊ लागतात.

मॅहॉगनीचे लाकूड व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे आहे. ते लालसर तपकिरी, कठीण, जड, मजबूत व टिकाऊ असते. सोळाव्या शतकापासून स्पॅनिश लोकांनी जहाजबांधणीसाठी ते वापरले. कोरीव काम केलेल्या शोभेच्या वस्तू, वाद्ये, विमानबांधणी, पेन्सिली, कपाटे, प्लायवुड इत्यादींसाठी लाकूड वापरतात. महाराष्ट्राला या लाकडाचा पुरवठा तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, केरळ इत्यादी राज्यांतून होतो. मॅहॉगनीच्या सालीत १५% टॅनीन असल्याने तिचा उपयोग ज्वरनाशक व स्तंभक म्हणून केला जातो. जमेकामध्ये त्याची साल कातडी कमाविण्यासाठी वापरतात. आययूसीएन संस्थेने स्वाएटेनिया मॅहॉगनी या जातीचा समावेश विलुप्त होणाऱ्या वनस्पतींच्या यादीत केलेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा