जाई : या वनस्पतीचे शास्त्रीय नाव जॅस्मिनम ग्रँडिफ्लोरम असून तिला चमेली असेही म्हणतात. वेल तिच्या लांब फांद्यांच्या आधारे जवळच्या आधारावर चढविता येते. पाने संयुक्त, समोरासमोर आणि विषमदली पिसांसारखी असून पर्णिका ५-११ असतात. फांद्यांच्या टोकाला किंवा पानांच्या बगलेतून जुलै ते सप्टेंबरमध्ये फुलोरे येतात. फुले पांढरी, नाजूक व सुवासिक असून पाकळ्यांची खालची बाजू जांभळी असते. फुलांमध्ये पाच पाकळ्या असून त्या खाली जुळून त्यांची नलिका तयार झालेली असते. पाकळ्या वर सपाट, सुट्या व दीर्घवर्तुळाकार असतात. फुलांना विशिष्ट गंध असतो. फळे काळी व एकबीजी असतात. त्वचा विकारावर मुळे, खोड, पाने व फुले उपयोगी आहेत. भारतात राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी सुगंधी द्रव्यांच्या उत्पादनासाठी जाईची लागवड करतात. गजरे व हार तयार करण्यासाठी या फुलांचा वापर होतो. या फुलांपासून जॅस्मिन काँक्रिट आणि जॅस्मिन ओलिओरिझीन ही सुगंधी व बाष्पनशील तेले तयार करतात. त्यांपासून महागडी अत्तरे तयार केली जातात.
पांढरी जाई : या वनस्पतीचे शास्त्रीय नाव जॅस्मिनम ऑफिसिनेल आहे. ही मूळची इराण, अफगाणिस्तान, भारत आणि चीनमधील आहे. ती वेगाने वाढते. तिची काही लक्षणे जाईप्रमाणे आहेत. जाई हा पांढऱ्या जाईचा मूळ प्रकार असून त्याचे अनेक उपप्रकार लागवडीखाली आहेत. पाने संयुक्त व समोरासमोर असून पिसांसारखी असतात. पर्णिका ५-७ असून टोकाची पर्णिका मोठी व भालाकृती असते. फुले पांढरी, मोठी व सुवासिक असून बाहेरच्या बाजूला गुलाबी छटा असते. फळे अनिश्चित असून पिकल्यावर ती काळी पडतात. पांढरी जाई हे पाकिस्तानचे राष्ट्रीय फूल आहे.
जुई : या वनस्पतीचे शास्त्रीय नाव जॅस्मिनम ऑरिक्युलेटम आहे. ही झुडपासारखी वेल भारतात अनेक ठिकाणी आढळते. तिची पाने साधी, समोरासमोर व अनेकदा त्रिदली असून त्यातील कडेची पाने कानांच्या पाळीसारखी असतात. फुले पांढरी व लहान असून ती विरळ गुच्छाने येतात. फुलांमध्ये ५-८ पाकळ्या असून पुष्पमुकुट समईसारखा (अपछत्राकार) असतो. मृदुफळ गोलसर व काळे असते. त्यात दोन ते चार बिया असतात.
मोगरा : याचे शास्त्रीय नाव जॅस्मिनम सॅम्बॅक आहे. ही वनस्पती मूळची दक्षिण आशियातील आहे. हे झुडूप १-२ मी. उंच वाढते. पाने साधी, समोरासमोर, मोठी, अंडाकृती व चकचकीत असतात. फुले मोठी, पांढरी, सुवासिक, एक-एकटी किंवा तीन फुलांच्या वल्लरीवर फांदयांच्या टोकांना येतात. निदलपुंजाची दले बारीक व फुलाच्या बाजूस वळलेली असतात. फळे अनिश्चित असून पिकल्यावर ती काळी पडतात. या सुवासिक फुलांतील बाष्पनशील तेलाचा उपयोग अत्तर, साबण, उदबत्ती इत्यादींमध्ये करण्यात येतो. मोगरा हे हवाई, इंडोनेशिया आणि फिलिपीन्स या देशांचे राष्ट्रीय फूल आहे.
कुंद : या आरोही (वर चढणाऱ्या) झुडपाचे शास्त्रीय नाव जॅस्मिनम प्युबिसेन्स असून भारत व चीन या देशांत त्याचा प्रसार झाला आहे. भारतात कोकण, दख्खन कोकण आणि कर्नाटकात ते आढळते. झुडपाच्या कोवळ्या भागांवर तसेच पानांवर मखमली लव असते. पाने साधी, काहीशी जाड, आखूड देठाची व समोरासमोर असून ती अंडाकार असतात. फुले लहान, बिनदेठाची, पांढरी आणि फांदयांच्या टोकांवर दाट वल्लरीत येतात. फुले जरी वर्षभर येत असली तरी डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत बहर अधिक असतो. फुलांत ६-९ पाकळ्या असून छदे मोठी व हिरवी असतात. भारतात कुंदांच्या फुलांपासून वेण्या व हार तयार करतात.
मदनबाण : या झुडपाचे शास्त्रीय नाव जॅस्मिनम ओडोरॅटिसिमस आहे. हे झुडूप सरळ व उंच वाढत असून त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो. फांदया दंडगोलाकार आणि सहज न वाकणाऱ्या असतात. पाने संयुक्त, हिरवी, एकाआड एक आणि पिसासारखी विभागलेली असतात. पर्णदले तीन किंवा पाच, हिरवी, चकचकीत व अंडाकृती असतात. फुले पिवळी व सुगंधी असून शेंडयाकडे येतात आणि त्यांमध्ये पाच पाकळ्या असतात. भारतात मदनबाणाची लागवड सुवासिक फुलांसाठी व शोभेसाठी करतात.
कुसर : या झुडपाचे शास्त्रीय नाव जॅस्मिनम मलबॅरिकम आहे. हे मूळचे दक्षिण भारतातील असून भारतात त्याचा सर्वत्र प्रसार झालेला आहे. ते ३-५ मी. उंच वाढते. पाने साधी, पातळ, रुंद व अंडाकृती असून पानांची टोके टोकदार असतात. फुले पांढरी व सुवासिक असतात. फुलांमध्ये ६-१० पाकळ्या असून त्या टोकदार असतात. अनेकदा हे झुडूप बागेत आणि मंदिराच्या आवारात शोभेसाठी लावलेले दिसून येते.
सायली : या झुडपासारख्या वेलीचे शास्त्रीय नाव जॅस्मिनम कॅलोफायलम आहे. हे मूळचे दक्षिण भारतातील असून त्याचा प्रसार केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांत झालेला आहे. तमिळनाडू राज्यातील अन्नमलई व तिन्नेवेल्ली टेकडयांच्या भागात ही वेल मोठया प्रमाणावर दिसते. पाने समोरासमोर व त्रिदली असतात. दले अंडाकार, चिवट व चकचकीत असतात. फुले पांढरी, व्दिलिंगी, नियमित व सु. २.५ सेंमी. व्यासाची असून पुष्पमुकुट समईसारखा असतो. फुलांमध्ये १० पाकळ्या असून वर्षभर फुले येतात. मृदुफळे लहान व जांभळी असतात.
हेमपुष्पी : या लहान आकाराच्या झुडपाचे शास्त्रीय नाव जॅस्मिनम ह्युमिली असून ते हिमालयात आढळून येते. ते सु. १ मी. उभे वाढते. फांदया हिरव्या व कोनांमध्ये विभागलेल्या असतात. पाने पिसांसारखी असून पर्णिका ३-७ आणि अंडगोलाकार ते भाल्यासारख्या असतात. टोकाकडील पर्णिका किंचित मोठी असते. फुले पिवळी व नलिकाकार असून फांदयांच्या टोकाला विरळ गुच्छाने येतात. फुलांमध्ये ५ रुंद पाकळ्या असतात. मृदुफळ काळे व ८ मिमी. व्यासाचे असून त्यात जांभळा रस असतो.