रुद्राक्ष हा एलिओकार्पेसी कुलातील वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव एलिओकार्पस गॅनिट्रस आहे. त्याला रुधिरावृक्ष असेही म्हणतात. एलिओकार्पस प्रजातीत सु. ३५० जाती असून भारतामध्ये ३०–४५ जाती आढळतात. त्यांपैकी रुद्राक्ष ही एक जाती आहे. म्यानमार, थायलंड, मलेशिया, नेपाळ आणि भारत या देशांमध्ये रुद्राक्ष वृक्ष आढळतात. भारतामध्ये पश्‍चिम बंगाल, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत तो वाढलेला दिसून येतो. काही उद्यानांमध्ये तसेच कोकणातील वनांत रुद्राक्ष लावण्यात आले आहेत.

रुद्राक्ष (एलिओकार्पस गॅनिट्रस) : (१) पाने व फुलोरे असलेली फांदी, (२) फुले, (३) फळे, (४) रुद्राक्षांचे विविध प्रकार

रुद्राक्ष वृक्ष सु. १८ मी. उंच वाढतो. त्याची साल गडद करडी असून तीवर बारीक छिद्रे व चिरा असतात. पाने साधी, एकाआड एक, दंतुर कडा असलेली, मध्यम आकाराची आणि भाल्यासारखी असतात.  पानांना लहान व लवकर गळणारी उपांगे असतात. फांद्यांच्या टोकांना पानांची गर्दी असते. नोव्हेंबर महिन्यात पानांच्या बगलेत लोंबते फुलोरे येतात. या फुलोऱ्यात लहान, पांढरी शुभ्र व मंद वासाची फुले असतात. फुलांमध्ये निदल आणि दले पाच असतात. त्यातील पुंकेसर सु. ४० असून ती गटागटाने पाकळ्यांसमोर असतात. अंडाशय लवदार, ऊर्ध्वस्थ, काहीसे अंडाकृती आणि पाच कप्प्यांचे असते. एप्रिल-जुलै या काळात त्याला आठळीयुक्त, कठीण व गोल फळे येतात. फळे गुळगुळीत, जांभळट रंगाची व करवंदाएवढी असतात. या फळातील गर आंबट, पांढुरका व चिकट असतो. फळावर जाड पुटकुळ्या व पाच खाचा असतात; तसेच त्यात पाच कप्पे आणि पाच बिया असतात. या फळांना रुद्राक्ष म्हणतात.

रुद्राक्षाच्या फळातील गर मेंदूचे विकार व अपस्माराचे झटके या विकारांवर उपयोगी आहे. उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी रुद्राक्ष फळांचा उपयोग होतो, असा उल्लेख आयुर्वेदात आहे. रुद्राक्ष वृक्षाचे लाकूड हलके, मजबूत व चिवट असते. त्याचा उपयोग फळ्या, खोकी व कपाटे बनविण्यासाठी केला जातो. फळातील आठळ्या स्वच्छ करून त्यांना झिलई देऊन माळा तयार करतात. या माळांना रुद्राक्षाच्या माळा म्हणतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा