(आयबिस अँड स्पूनबिल). शराटी आणि चमचा या पक्ष्यांचा समावेश पेलॅकनीफॉर्मिस गणाच्या थ्रेस्किऑर्निथिडी कुलात केला जातो. थ्रेस्किऑर्निथिडी कुलात थ्रेस्कोऑर्निथिनी आणि प्लॅटालिनी ही दोन उपकुले आहेत. थ्रेस्कोऑर्निथिनी उपकुलातील पक्ष्यांना ‘शराटी’ म्हणतात. त्यांच्या १३ प्रजाती आणि २८ जाती आहेत. प्लॅटालिनी उपकुलातील पक्ष्यांना ‘चमचा’ म्हणतात. त्यांची एकच प्रजाती आणि सहा जाती आहेत. शराटी आणि चमचा यांच्यात बरेच साम्य असले, तरी काही भेद असतात; शराटी पक्ष्याची चोच लांब व वळलेली असते, तर चमचा पक्ष्याची चोच लांब व चमच्याच्या आकाराची असते. या नोंदीत दोन्ही पक्ष्यांविषयी माहिती दिलेली आहे.

शराटी

शराटीला ‘अवाक’ असेही म्हणतात. त्यांच्या जाती जगात निरनिराळ्या जागी आढळतात. भारतात त्यांच्या पांढरा शराटी आणि काळा शराटी या जाती आढळतात. हे पक्षी आशिया खंडातील बहुतकरून देशांत दलदलीचे प्रदेश, सरोवरे, तलाव, भातशेती, पाण्याचे कालवे, सांडपाण्याचे प्रवाह इ. ठिकाणी आढळतात. शराटी पक्ष्यांचा सरासरी आयु:काल १६ ते २७ वर्षे इतका असतो.

पांढरा शराटी (थ्रेस्किपऑर्निस मेलॅनोसेफॅला)

पांढरा शराटी : याचे शास्त्रीय नाव थ्रेस्किऑर्निस मेलॅनोसेफॅला  असे आहे. या पक्ष्याची लांबी ६५ ते ७६ सेंमी. असते. त्याच्या डोक्याचा व मानेचा भाग काळा असून या भागावर पिसे नसतात. चोच लांब, काळी आणि खाली वळलेली असते. पाय काळे असतात. तो पाणपक्षी असला, तरी मानवी वस्तीलगत अन्न शोधताना दिसतो. नर-मादी दिसायला सारखेच असतात. लहान शराट्यांच्या मानेवरची पिसे राखाडी, तर पंख व पाठ या भागातील पिसांवर करडे ठिपके असतात. विणीच्या हंगामात प्रौढ पक्ष्याच्या शेपटीतील काही पिसे राखाडी दिसून ती काळी होतात. पंखांखालची पिसे लालभडक होतात. काही पक्ष्यांच्या डोक्याच्या रंगात निळसर छटा दिसतात आणि क्वचितप्रसंगी मानेमागे गुलाबी किंवा भडक लाल पट्टे दिसतात.

ते बहुधा शांत असतात. आवाज काढण्याची यंत्रणा त्यांच्यात नसते. विणीच्या हंगामात ते नकली ‘रे…रे’ असा आवाज काढतात. हा आवाज फारसा मोठा नसतो. लांबवरून या पक्ष्यांच्या घोळक्याचा आवाज माणसांच्या गोंगाटाप्रमाणे येतो.

पांढरा शराटी शिंपले, शंख, खेकडे, कीटक, बेडूक आणि मासे खातो. उन्हाळ्यात ते दलदलीच्या जागी, पडीक शेतांमध्ये दिसतात, तर पावसाळ्यात ते लागवडीखालच्या शेतांमध्ये वावरतात. मान पुढे उंचावून, पाय मागे खेचून हे पक्षी एकदम आणि जोराने उडतात. पंखांची नियमित हालचाल करीत व मधूनच तरंगत हे पक्षी आपले उड्डाण साधतात. आपले इतर भाईबंद, पाणकावळे आणि चमचा अशा पक्ष्यांबरोबर ते जलाशयाच्या किंवा गावालगतच्या झाडांवर पावसाळ्यात घरटी बांधतात. एखाद्या मचाणासारखे त्यांचे घरटे असते. मादी एका वेळेला २ ते ४ अंडी घालते. अंड्यांचा रंग निळसर किंवा हिरवट पांढरा असतो आणि काही वेळा त्यावर पिवळट तपकिरी रंगाचे नाजूक ठिपके असतात.

काळा शराटी (स्यूडीबिस पॅपिलोसा)

काळा शराटी : याचे शास्त्रीय नाव स्यूडीबिस पॅपिलोसा असे आहे. हा पक्षी आकाराने मोठा व काळ्या रंगाचा असतो. खांद्यावर मोठा पांढरा चट्टा असतो. पाय विटकरी तांबड्या रंगाचे असतात. डोके पिसेहीन, काळ्या रंगाचे असून त्यावर साधारणपणे त्रिकोनी आकाराचा किरमिजी रंगाचा मोठा चामखिळवजा तुरा असतो. डोळ्यांच्या बाहुल्या शेंदरी लाल असतात. त्याचा अधिवास पाण्याच्या आजूबाजूला नसून जलाशयापासून दूर असतो. शेतांच्या पलिकडे असलेल्या सपाट माळरानावर हे पक्षी तीनचारच्या संख्येने आढळतात. धान्याचे दाणे आणि कीडे हे त्यांचे मुख्य अन्न असले, तरी सरडे, लहान साप आणि पैसा असे प्राणीही ते खातात. दिवसभर ते आवडीच्या प्रदेशात फिरतात व रात्री वस्तीला झाडांवर येतात. संथपणे पंख हलवीत, तरंगत हे पक्षी इंग्लिश ‘व्ही (V)’ या आकारात उडत राहतात. हे पक्षी आवाज करीत नाहीत पण काढलाच तर उडताना नाकातून बाहेर पडणारा दोनतीन स्वरांचा चित्कार ऐकू येतो. आपली घरटी ते एखाद्या झाडाच्या शेंड्याला किंवा पाम वृक्षांवर बांधतात; एकाच झाडावर दोनतीन शराटींची घरटी आढळतात. काटक्यांपासून वाटीच्या किंवा कपाच्या आकाराचे घरटे बांधून त्याला आतून गवत आणि पिसे लावतात. मादी एका वेळेला २ ते ४ अंडी घालते. अंडी फिकट निळसर रंगाची असतात. नरमादी दोघेही अंडी उबवतात. ३३ दिवसांनी पिले बाहेर येतात.

चमचा

चमचा या पक्ष्याला दर्वीमुख असेही म्हणतात. तो जगात सर्वत्र आढळत असून त्याच्या सहा जाती आहेत. भारतात प्लॅटालिया ल्यूकोरोडिया नावाची जाती आढळते. भारतातील रखरखीत तसेच डोंगराळ प्रदेश सोडून दलदलीचे प्रदेश, नद्यांचे आणि तलावांचे काठ, खाडीलगतचे चिखलाचे प्रदेश इ. जागी तो आढळतो.

चमचा (प्लॅटालिया ल्यूकोरोडिया)

चमचा पक्षी बदकापेक्षा मोठा असून शरीराची लांबी ६० ते ८० सेंमी. असते. शरीराचा रंग शुभ्र पांढरा असतो. मान आणि पाय लांब असून चोच आणि पाय काळ्या रंगाचे असतात. चोच लांब, चपटी आणि टोकाशी चमच्यासारखी पसरट असते. डोळे लाल असतात आणि अशा प्रकारे स्थित असतात की ज्यामुळे त्यांना एकाच वेळी दोन्ही डोळ्यांनी दिसू शकते. पंखांची टोके काळसर असतात. चोचीच्या तळाशी नाकपुड्या असतात, ज्यामुळे चोच पाण्यात पूर्ण बुडालेली असताना देखील त्यांना श्वसन करता येते. नर आणि मादी सारखेच दिसतात; प्रजननकाळात नराला डोक्यावरून मागे गेलेला लांब तुरा येतो, गळ्याखालचा भाग पिवळा होतो आणि चोचीचे टोक पिवळे होते.

पाणवनस्पती, बेडूक, कीटक, लहान मासे, खेकडे, गोगलगाय, लहान कवचधारी प्राणी हे या पक्ष्यांचे खाद्य आहे. ते सकाळी आणि संध्याकाळी भक्ष्य शोधताना दिसत असले, तरी दिवसभर अधूनमधून खात राहतात. उथळ पाण्यात हिंडून ते आपले भक्ष्य पकडतात. आपल्या लांब चोचीने ते पाणी ढवळून काढतात. चोच अर्धवट उघडून चिखलात खुपसून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे सारखी फिरवीत पुढे जातात आणि चोचीत आलेले भक्ष्य ते पटकन चोच मिटून गिळतात. उडताना हे पक्षी पुढच्या बाजूला मान लांब व ताठ करतात आणि पाय मागे लोंबत ठेवून पंख फडफडवत जातात; तसेच समान अंतर राखून विशिष्ट रचनेत उडतात.

हे पक्षी शांत असतात आणि थव्याने राहतात. प्रजननकाळात व उडताना ते मंद सुरात रेकण्यासारखा आवाज काढतात. धोक्याची जाणीव झाल्यावर ते दबलेल्या शिंकेसारखा एक सूचक आवाज काढून एकमेकांना सावध करतात. यांच्या वसाहतींजवळ बगळे, शराटी, इतर पाणपक्षी, रोहित पक्षी यांच्या वसाहती असतात. त्यांचा प्रजननकाळ जुलै ते नोव्हेंबर असून ते पाण्याजवळील उंच झाडावर घरटे बांधतात. घरट्यासाठी नर झाडांच्या काटक्या गोळा करतो आणि मादी घरटे बांधते. घरटे मोठे असून त्याचा आकार पसरट व उथळ वाटीसारखा असतो. मादी तीन ते पाच अंडी घालते; अंडी शुभ्र पांढरी असून त्यावर तपकिरी ठिपके असतात. नरमादी दोघेही अंडी उबवितात. एका वेळी एकाच अंड्यातून पिलू बाहेर येते; नुकतीच जन्मलेली पिले आंधळी असतात, काही तासांनंतर त्यांचे डोळे उघडतात. नरमादी दोघेही पिलांना अन्न भरविण्याचे काम करतात. दोघेही आपल्या चोचीने अन्न स्वतः चावून, अर्धवट पचवून पिलांच्या चोचीत भरवतात. लहान पिलांची चोच आखूड आणि सरळ असते. पिलू प्रौढ झाल्यावर त्याच्या चोचीला चमच्यासारखा आकार येतो. या पक्ष्याची पिले अनेकदा पूर्ण वाढ होण्याआधी उपासमारीने मरण पावतात. या पक्ष्यांचा सरासरी आयु:काल २५ ते ३० वर्षे इतका असतो.

प्लॅटालिया प्रजातीतील सहा जातींपैकी पाच जाती पूर्व-गोलार्धात, तर पश्चिम-गोलार्धात एकच जाती आढळते. (१) प्लॅ. ल्यूकोरोडिया : ही जाती आशिया, ईशान्य आफ्रिका तसेच यूरोपात आढळते. (२) प्लॅ. मायनर : या जातीचे तोंड काळ्या रंगाचे असते. ही जाती तैवान, कोरिया, चीन, जपान येथे आढळते. (३) प्लॅ. अल्बा : या जातीत मुख गुलाबी रंगाचे असते; चोच फिकट असते. ही जाती आफ्रिका, मादागास्कर येथे आढळते. (४) प्लॅ. रेजिया : ही जाती ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे आढळते. (५) प्लॅ. फ्लॅविपस : या जातीत चोच व पाय पिवळे असतात. ती ऑस्ट्रेलियात आढळते. (६) प्लॅ. अजाजा : या जातीचे प्रौढ पक्षी गुलाबी रंगांचे असून ती दक्षिण अमेरिकेत आढळते.