हा मांसाहारी (Carnivora) गणातील आफ्रिकेत आढळणारा सस्तन प्राणी आहे. तो हायानिडी (Hyaenidae) कुलातील प्रोटिलीनी (Protelinae) उपकुलात अस्तित्वात असलेला एकमेव प्राणी आहे. त्याचे शास्त्रीय नाव प्रोटिलिस क्रिस्टेटस (Proteles cristatus) असून याच्या दोन उपजाती आहेत. त्याचा आढळ आफ्रिकेतील रुक्ष मैदानी (मोकळ्या गवताळ व झुडपाळ) प्रदेशांत आहे. प्रोटिलिस क्रिस्टेटस क्रिस्टेटस (Proteles cristatus cristatus) या प्रजातीचा आढळ दक्षिण आफ्रिकेत, तर प्रोटिलिस क्रिस्टेटस सेप्टेट्रिओनॅलिस (Proteles cristatus septentrionalis) याचा पूर्व आफ्रिकेत आहे. रंग, शरीरावरील पट्टे आणि अंगावरील लांब केस अशा लक्षणांबाबत पट्टेरी तरसाशी त्याचे साम्य आहे. त्यास आफ्रिकन आणि डच भाषेमध्ये अर्थ वुल्फ (Earth Wolf) असे नाव असून  मान्हार जैकल (Maanhar Jackal) आणि प्रोटिलिड (Protelid) या नावांनीही संबोधले जाते.

आर्डवुल्फ (प्रोटिलिस क्रिस्टेटस)
आक्रमक  स्थितीतील आर्डवुल्फ

नर व मादी दिसायला सारखेच असतात. आर्डवुल्फची शेपटीविरहित लांबी ५५–८० सेंमी., तर खांद्यापासूनची उंची सु. ४० सेंमी. असते. शेपटी झुपकेदार व २०–३० सेंमी. लांब, टोकास काळी असून शेपटीखाली दोन गुदग्रंथी असतात. तो स्वसंरक्षणासाठी तसेच प्रदेश निश्चित करण्यासाठी गुदग्रंथीस्रावाचा उपयोग करतो. त्याचे वजन ८–१२ किग्रॅ.पर्यंत असते. त्याच्या अंगावरील फर फिकट पिवळसर किंवा पिवळ्या रंगाची असून काळ्या केसांचे उभे पट्टे  शरीराच्या दोन्ही बाजूंस व पायांवर असतात. पायाचा गुडघ्याखालील भाग त्याच्या वरील भागापेक्षा काळपट असतो. मानेभोवती काळ्या केसांची आयाळ असून ती डोक्यापासून शेपटीपर्यंत पसरलेली असते. खांद्यावरील केस सु. २० सेंमी.पर्यंत लांब असतात. मुस्कट निमुळते व काळे, तर जीभ लांब, पसरट व चिकट असून टाळ्यामधील खाचेत ती व्यवस्थित ठेवली जाते. जिभेवर मोठे अंकुरक असतात. डोळे लहान व काळे, तर कान ९-१० सेंमी. लांब व अतिशय तीक्ष्ण असतात. पुढील पाय मागील पायांपेक्षा लांब असतात. पुढील पायांस तरसाला चार, तर आर्डवुल्फला पाच नख्या असतात. तो अधिक वेगाने पळू शकत नाही. स्वसंरक्षणासाठी तो मुख्यत: सुळे व गुदग्रंथीस्राव यांचा वापर करतो.

वैशिष्ट्यपूर्ण जीभेसहित आर्डवुल्फ

आर्डवुल्फला तरसाप्रमाणे मोठ्या प्राण्यांची शिकार करता येत नाही. कीटक, कीटकांच्या अळ्या व वाळवी हे त्याचे मुख्य अन्न आहे. एका रात्रीत तो सु. ३,००,००० वाळवी खातो. परंतु, जेव्हा खाण्यासाठी वाळवी उपलब्ध नसते तेव्हा लहान सस्तन प्राणी व पक्षी, मृत प्राण्यांचे मांस यांवर तो उपजीविका करतो. तरसाच्या जबड्यापेक्षा त्याचा जबडा आकाराने लहान व दात आखूड असतात. सुळे अणकुचीदार असतात, परंतु प्रौढ अवस्थेमध्ये ते लवकर झिजतात. अन्न सेवन करण्याच्या पद्धतीमुळे दात कमकुवत व दाढा अविकसित स्वरूपात असतात. याचे दंतसूत्र ३/३, १/१, ३/२-१, १/१-२ = २८–३२ असते. त्याचा अधिवास १–४ किमी.पर्यंत असून अन्नाच्या उपलब्धतेवर तो अवलंबून असतो.

आर्डवुल्फ बिळांमध्ये राहतो. तो नख्यांच्या साहाय्याने बिळे खोदतो. परंतु, शक्यतो तो सायाळआर्डव्हॉर्क यांच्या तयार बिळांचाच उपयोग करतो. तो शांत व लाजाळू प्राणी असून धोका जाणवल्यास गुरगुरतो किंवा विचित्र आवाज काढतो. तसेच आक्रमक स्थितीमध्ये त्याच्या मानेपासून शेपटीपर्यंतचे केस उभे राहतात. तो निशाचर प्राणी असल्यामुळे दिवसा बिळात विश्रांती घेतो, तर रात्री अन्नाच्या शोधात एकटा  भटकतो.

बिळातून डोकावणारी आर्डवुल्फची पिले

नर-मादी केवळ विणीच्या हंगामात (जून-जुलैमध्ये) एकत्र येतात. नर-मादीची जोडी आयुष्यभर एकत्र राहते. गर्भावधिकाल ९०–११० दिवसांचा असून मादीला पावसाळ्यात २–५ पिले होतात. नर व मादी दोघे मिळून पिलांची काळजी घेतात. भक्षकांपासून पिलांचे संरक्षण करण्याचे काम नर करतो. ३-४ महिन्यांपर्यंत पिले आईवर अबलंबून असतात. त्यानंतर ती स्वतंत्रपणे जीवन जगू लागतात. पिलू २ वर्षांचे झाले की प्रजननक्षम होते.

अन्नासाठी वाळवीवर अवलंबून असल्यामुळे आर्डवुल्फ हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. अप्रत्यक्षपणे तो मानवास उपयुक्त आहे. परंतु, मानवाकडून केसाळ कातड्यासाठी त्याची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. त्यामुळे मानव हा त्याचा मुख्य शत्रू असून कुत्राकोल्हा हे त्याचे नैसर्गिक शत्रू आहेत. आर्डवुल्फचे नैसर्गिक अधिवासातील आयुर्मान सु. ८ वर्षे, तर प्राणिसंग्रहालयातील आयुर्मान सु. १५ वर्षे आहे.

संदर्भ :

समीक्षक – कांचन एरंडे

प्रतिक्रिया व्यक्त करा