मत्स्यवर्गातील पर्सिफॉर्मीस (Perciformes) गणातील पर्कोऑयडिया (Percoidei) उपगणात सकला माशाचा समावेश होतो. त्याचे शास्त्रीय नाव रॅचीसेंट्रोन कॅनॅडम् (Rachycentron canadum) असे आहे. रॅचीसेंट्रिडी (Rachycentridae) कुलामधील ही एकमेव प्रजाती आहे. जगभरात ‘कोबिया’ (Cobia) नावाने तो प्रसिद्ध आहे. त्याला इंग्रजीत ब्लॅक किंग फिश (Black King Fish), ब्लॅक सामन (Black Saman) व ब्लॅक बोनिटो (Black Bonito), तर गुजरातीमध्ये “मोडोसा” (मोडूसा) अशीही नावे आहेत. भारतीय किनारपट्टीवर तुरळक आढळणारा हा मोठ्या आकाराचा मासा सन १९८० पासून किनाऱ्यापासून दूर खोल समुद्रात मासेमारी करण्यामुळे सापडू लागला.
सकला मासा साधारणत: उष्ण कटिबंधीय क्षेत्रातील अटलांटिक, पॅसिफिक ते हिंदी महासागर तसेच ऑस्ट्रेलियात देखील आढळतो. विविधतापसही (eurythermal; कोणतेही तापमान सहन करण्यास सक्षम) असल्याने समशीतोष्ण भागांत उत्तर अमेरिकेतील पश्चिमी समुद्र किनाऱ्यावर तो सापडतो. याचा जीवनक्रम व स्थलांतराविषयी अद्याप सखोल माहिती उपलब्ध नाही. परंतु हा दक्षिण अमेरिकेतील मेक्सिकोच्या समुद्रकिनाऱ्याहून उत्तरेकडे स्थलांतर केल्याच्या नोंदी आहेत.
सकला मासा सु. १.८ मी. लांब असून वजन सु. ७० किग्रॅ. असते. त्याचे शरीर निमुळते लांबट असते. डोके काहीसे रुंद व चपटे; डोळे लहान; खालचा जबडा वरच्यापेक्षा किंचित पुढे आलेला; दोन्ही जबड्यात छोट्या दातांच्या रांगा असून जीभ व टाळूवर अगदी लहान दात असतात. डोक्यामागे पाठीवर स्वतंत्र ७–९ काट्यांचा पहिला पृष्ठपर असून त्यामागे जोडलेला दुसरा पृष्ठपर असतो. खालच्या बाजूस तसाच गुदपर असतो. पुच्छपर दुभागलेला असला तरी तोकडा असतो. त्वचा गुळगुळीत असून त्यावर बारीक खवले असतात. रंग तपकिरी, काळपट व खालच्या बाजूस राखाडी असतो. शरीरावर दोन पांढुरके-तपकिरी रंगाचे लांब पट्टे असतात.
नर २ वर्षे, तर मादी ३ वर्षांची झाल्यावर ते लैंगिकदृष्ट्या परिपक्व होतात. त्यावेळी नराची लांबी सु. ५० सेंमी. व वजन सु. १ किग्रॅ., तर मादीची लांबी सु. ७० सेंमी. व वजन सु. ३ किग्रॅ. असते. सकला मासा जास्तीत जास्त २ मी. लांबीपर्यंत वाढतो.
सकला मासा एरवी एकट्याने राहणे पसंत करतो. परंतु, प्रजनन काळात नर व माद्या झुंडीने एकत्र येतात. प्रजोत्पादन काळामध्ये नर व मादी माश्याच्या रंगामध्ये फरक दिसून येतो. नराकडून शुक्राणू व मादीकडून अंडाणू पाण्यात सोडले जातात. त्यांचे पाण्यामध्ये फलन होते. मादी सु. ३,७५,०००–२० लाख अंडी टप्याटप्याने घालते. अंडी गोल व सु. १.२४ मिमी. व्यासाची असतात. फलनानंतर २४–३६ तासांनी फलित अंड्यातून पिले बाहेर पडतात. पिलांची वाढ जलद होते. ऑस्ट्रेलियात हिवाळी हंगामात, तर मेक्सिको किनाऱ्यालगत अटलांटिक सागरात उन्हाळी हंगामात माद्यांनी अंडी दिल्याची नोंद आहे.
सकला माशाचे बहुतांश वास्तव्य सागरी पृष्ठभागावर असले तरी तलस्थ मासे, खेकडे, मृदुकाय प्राणी व माकूळ यांना खाण्यास तो समुद्रतळाशी जातो. तो खादाड मासा असून त्याच्या मोठ्या आकारामुळे त्याचे फारसे भक्षक नाहीत. भक्ष्यांचा शोध घेत तो प्रवाळद्वीप व कांदळवनात देखील सापडल्याची नोंद आहे. काही शार्क व पोपटमासा (माही-माही) हे छोट्या सकला माशांना खातात. सकला माशांचे आयुर्मान १०–१५ वर्षे असते.
सकला मासा तापमान व क्षारांशी सहनशील असल्याने २°–३२° से. तापमानात व ५–३२ क्षारतेत (म्हणजे भाग प्रती हजार सागरी क्षारता मोजण्यासाठी भाग प्रती हजार हे परिमाण वापरले जाते) तो राहू शकतो. म्हणूनच तो मत्स्यसंवर्धनास उपयुक्त ठरला आहे. तैवान, चीन, व्हीएतनाम व आग्नेय आशियाई देशांत समुद्रातील तरंगत्या पिंजऱ्यात याचे मोठ्या प्रमाणावर संवर्धन केले जाते. भारतात देखील गेले दशकभर खुल्या समुद्रातील पिंजऱ्यांमध्ये त्याच्या संवर्धनाचे यशस्वी प्रयत्न केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेने कारवार येथे केले आहेत. तेथील माहितीनुसार सकला मासा लवकर माणसाळतो. खाद्य म्हणून तरळी माशाचा उपयोग केल्यास त्याची वाढ जलद होऊन दीड-दोन वर्षांतच तो विक्रीयोग्य वजनाचा होतो. कृत्रिम संप्रेरके देऊन याचे प्रजोत्पादन देखील करता येते.
सकला माशात प्रथिने १९ ग्रॅ., चरबी ६ कॅलरी, ऊष्मांक ८७ कॅलरी, कोलेस्टेरॉल ४० मिग्रॅ., सोडियम १३५ ग्रॅ. व मॅग्नेशियम, पोटॅशियम, सेलेनियम, निॲसिन हे घटक देखील असतात. हा मासा ओमेगा-३ चा उत्तम स्रोत असून यात रिबोफ्लॅवीन आणि जीवनसत्त्व बी-६ भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हा मासा खाण्यास पौष्टिक आहे. या माशाचे सहजपणे सुटे तुकडे करता येतात. जगभरात ताज्या, गोठवून व धुरावलेल्या (smoked) स्वरूपात तो विकला जातो. कमी वेळात जलद होणारी वाढ, त्यातील पौष्टिक घटक व उच्च व्यावसायिक किंमत यांमुळे सकला माशाला मत्स्यव्यवसायात महत्त्वाचे स्थान आहे.
संदर्भ :
- Shaffer, R. V. and E. L. Nakamura, Synopsis of biological data on the cobia Rachycentroncanadum (Pisces: Rachycentridae). NOAA Tech. Rep. NMFS 82, FAO Fisheries Synopsis 153, Dec. 1989.
- Philipose, K. K., Loka, J., Sharma, S.R., Divu, D., Rao, K.S., Sadhu, N., Dube, P., Gopakumar, G. and Rao, G. S., Farming of cobia, Rachycentroncanadum (Linnaeus 1766) in open sea floating cages in India. Indian Journal of Fisheries, 60 (4), pp.35-40, 2013.
समीक्षक – नंदिनी देशमुख