शालीभद्रसूरी : (इ. स. ११८५ मध्‍ये हयात). हे वज्रसेनसूरीचे पट्टशिष्‍य, गुजरातमधील राज्‍यगच्‍छचे जैन साधू. रासकवी. भरतेश्वर बाहुबली संग्राम या कथानकाचा विस्‍तार त्‍यांच्‍या भरतेश्‍वर-बाहुबली रास या कृतीत पहावयास मिळतो. १४ ठवणी भागात विभक्‍त असलेली २०३ कडींची ही वीररसप्रधान कृती असून त्‍यातील युद्धवर्णने ओजस्वी शैलीने लक्षवेधक ठरली आहेत. या काव्‍यातील पाटधर, फागुण, सांभलउ वगैरेसारख्‍या शब्‍दप्रयोगामधून अपभ्रंशातून जुन्‍या गुजरातीकडे वळणा-या भाषेचा निर्देश होत असल्‍याने भाषिक दृष्‍टीनेही हे काव्‍य महत्‍त्‍वाचे ठरते. गुजराती साहित्‍यातील प्राचीन रचनांपैकी एक महत्‍त्‍वाची रचना म्‍हणून तिचा विचार करण्‍यात येतो. तसेच सामान्‍य माणसे व श्रावक यांनी जीवनात अशा रीतीने व्‍यवहार केला पाहिजे याची शिकवण देणा-या बुद्धिरास, शालिभद्र-रास, हितशिक्षा-प्रबुद्धरास या रचनाही त्‍यांच्‍या नावावर आहेत.

संदर्भ :

  • रावळ,अनंतराय,गुजराती साहित्य (मध्यकाळ),१९७६.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा