टोपीवाला, चंद्रकांत : (०७-०८-१९३६).सुप्रसिद्ध गुजराती समीक्षक आणि कवी.आधुनिक कवितेचे अभ्यासक आणि समीक्षक म्हणून ते गुजराती साहित्यात सर्वश्रुत आहेत. कविता, अनुवाद, समीक्षा, संपादक या क्षेत्रात त्यांचे लक्षणीय कार्य आहे. जन्म वडोदरा येथे.वडिलांचे नाव अमृतलाल व आईचे नाव लिलावती. त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून गुजराती भाषेत पदवी आणि गुजरातमधून संस्कृत आणि गुजरातीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली (१९६०). गुजरात विद्यापीठातून त्यांनी विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) पदवी मिळविली. उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक होता. पदवी स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना गौरविण्यात आले होते.

तद्नंतर गुजरात राज्यातील पोरबंदर येथील माधवणी कला व वाणिज्य महाविद्यालयात आणि दाहोद येथील नवजीवन कला व वाणिज्य महाविद्यालयात गुजराती भाषा आणि साहित्य या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले आहे. त्यांचे विद्याशाखीय आणि व्यावसायिक कार्य भरीव असून राष्ट्रीय पुस्तक न्यास (१९७७), गुजराती सल्लागार समिती (१९८०) आणि गुजराती साहित्य परिषद (१९८४) या विविध संस्थांवर त्यांनी सल्लागार आणि सदस्य म्हणून कार्य केले आहे. भाषाविमर्श या नियतकालिकाचे आणि गुजराती साहित्यकोश या बृहद्ग्रंथाचे संपादन त्यांनी केले आहे.

चंद्रकांत टोपीवाला यांची साहित्य संपदा : मेहरमन (१९६३), कांत तारी राणी (१९७१), पक्षीतीर्थ (१९८८), ब्लॅक फॉरेस्ट (१९८९),आवागमन (१९९९) हे कवितासंग्रह ; अपरिचित अ अपरिचित ब (१९७५), हद्पारना हंस आने ऑल्बेट्रॉस (१९७५), प्रतिभाशानु कवय (१९७५), संसर्जनात्मक काव्यविज्ञान (१९८५), विवेचननो विभाजित पट (१९९०), ग्रंथघटन (१९९०), अनुआधुनिकतावाद (१९९६), दलपत्रम (१९९९), बहुसंवाद (२००१),रचनावली (२००१) आणि सहवर्ती-परवर्ती (२००५), साक्षीभाष्य हे समीक्षाग्रंथ आणि आधुनिक साहित्यसंज्ञाकोश ,विशिष्ट साहित्यसंज्ञाकोश आणि गुजराती साहित्यकोश ही संपादने – इत्यादी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे.भारतीय पातळीवरील अत्यंत महत्त्वाचे साहित्य त्यांनी इंग्रजीतून गुजरातीमध्ये अनुवादित केले आहे.

टोपीवाला यांच्या कवितेत कविता लेखनातील पारंपारिक मार्गाचे दर्शन घडते.कविता हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. त्यांची कविता काव्यभाषेच्या आधुनिकीकरणाच्या मुक्त स्तरावर पोहोचलेली आहे. त्यांची प्रतिभा, चिन्हे, मिथक आणि नवीन लयबद्ध नवनिर्मिती गुजराती कविता समृद्ध करण्यात योगदान देते. प्रेम, ज्ञान आणि तत्वज्ञान या त्रयींच्या प्रभावातून त्यांच्या कवितेने आकार घेतलेला आहे. संस्कृतच्या व्यासंगामुळे आणि काव्यशास्त्राच्या अंगभूत अभ्यासामुळे त्यांची कविता तत्वजड भासते.

चंद्रकांत टोपीवाला यांची गुजराती साहित्य जगतात खरी ओळख आहे ती समीक्षक म्हणून. जागतिक साहित्य, भारतीय साहित्य आणि गुजराती साहित्य या तिन्ही स्तरांचा सांगोपांग अभ्यास त्यांनी त्यांच्या समीक्षेतून मांडला आहे. जगातील विविध साहित्य प्रवाहाबद्दल ते नेहमीच उत्सुक व सक्रिय असतात. जे साहित्य, जो ग्रंथ कोणतेच जीवनमुल्य आणि तत्वमूल्य व्यक्त करत नाही त्या ग्रंथासंदर्भात त्यांनी कधीच प्रतिक्रिया दिलेली नाही. एक धाडसी, निर्णयक्षम समीक्षकाचे गुण त्यांच्या अंगी पाहावयास मिळतात. साहित्य ही मुळात भाषेची कला आणि बहुआयामी, बहुस्तरीय आणि विविधध्वनिक संरचना आहे अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे प्रत्येकाने साहित्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे असा आग्रह त्यांच्या समीक्षेतून व्यक्त होतो. समाजातील प्रत्येक घडामोड, सामाजिक जीवन, आर्थिक स्थिती आणि घडणाऱ्या घटनांचा वेध घेणे हा साहित्याचा स्वभाव असावा असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांची समीक्षा प्रामाणिकपणा आणि सैद्धांतिक मांडणी यांचे समर्थन करते.त्यांच्या अपरिचित अ अपरिचित ब या समीक्षाग्रंथात आधुनिक कविता,कवितेसंदर्भातील भाषाभिमुख दृष्टीकोन आणि कवितेची काव्याशास्त्रीय विवेचना या संदर्भात मते मांडलेली आहेत. ऑक्टोव्हीया पाझ,पाब्लो नेरुदा यांसारख्या विश्वविख्यात कवींच्या कवितेवरही त्यांनी या ग्रंथातून भाष्य केले आहे.संसर्जनात्मक काव्यविज्ञान या ग्रंथातून रुपवाद,संरचनावाद,अमेरिकन समीक्षाप्रवाह,सर्जनशील व्याकरण या घटकांचा आधार घेवून आधुनिक गुजराती कवितेची समीक्षा केली आहे.

चंद्रकांत टोपीवाला यांना साहित्य क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल रमनलाल गांधी पुरस्कार (२००१), प्रेमानंद सुवर्ण पदक (२००४)  तसेच साक्षीभाष्य या समीक्षाग्रंथास साहित्य अकादमी पुरस्कार (२०१२) इत्यादी पुरस्कारांनी  सन्मानित करण्यात आले आहे.

संदर्भ :