गोवा आणि कोकणातील ग्रामदैवताचे प्रतीक. सुमारे दोन मीटर लांबीच्या गोलाकार लाकडी खांबाच्या एका टोकाला रंगीत लुगडे गोलाकार गुंडाळतात आणि त्याच्या निऱ्या टोकावर  दोरीने बांधतात, त्या टोकावर धातूपासून बनविलेला देवीचा अथवा दैवताचा मुखवटा बसवितात.मुखवट्याऐवजी कधी हाताची पंजाकृती किंवा छोटा कळसदेखील बसवितात. त्याची फुलमाळांनी सजावट करतात. बहुतेक लाकडी खांब रंगवून त्यावर पारंपरिक स्वरूपाची चित्रे तसेच पानाफुलांची आणि ठिबक्यांची नक्षी केलेली असते. काही गावांतून रंगीत लुगडयाऐवजी सफेद धोतराचा उपयोग करतात. या सजविलेल्या खांबाला तरंग म्हणतात. ते उचलून घेऊन तळहातावर खांबाचे दुसरे टोक ठेवून गोलाकार फिरवून तरंग नाचवितात. त्या वेळी तरंग उघडलेल्या छत्रीसारखे दिसते. गोवा आणि कोकणातील अनेक गावांतून अशी तरंगे नवरात्र आणि विशेषकरून दसऱ्याच्या दिवशी नाचवितात. गावात किमान दोन व जास्तीत जास्त पाच तरंगे असतात. त्यात एखादी ‘सत्री’ असते. तरंगाच्या वरच्या भागात २५-३० सेंटीमीटर अंतरावर एक किंवा तीन सफेद रंगाच्या छत्र्यांसारखी  गोलाकार ‘पलंगे’ जोडलेली असतात. त्यावरून अशा तरंगाला ‘सत्री’ किंवा ‘खांब’ म्हणतात.

तरंगे नाचाविणाऱ्याना  गडी म्हणतात. ते भंडारी, भगत, गुरव, परीट, नापित, सुतार इत्यादी वर्गांतील असतात. तरंग नाचविताना त्यांना ढोल, ताशा, सनई, सूर्त, शिंग, जघांट अशी वाद्ये वाजवून साथ-संगत करतात. त्यावेळी नाचाविणाऱ्या गड्याच्या अंगात येते. अशा गड्याना ‘भार’ अथवा ‘मोड’ असे म्हणतात. ही तरंगे सातेरी, भूमिका, माऊली, पावणाई, रवळनाथ, भूतनाथ, बेताळ, भैरव, मूळवीर इत्यादी दैवतांच्या नावाने नाचवितात आणि शेवटी भाविकांना कौल देतात. भूतबाधा झालेल्यांचा तरंगदर्शनाने परिहार होतो, अशी श्रद्धा आहे. दसऱ्याच्या  दिवशी या तरंगांची मिरवणूक निघते. ही मिरवणूक वाजत-गाजत कळंबवृक्षाखाली येते. तेथे तरंगांची व कळंबवृक्षाची पूजा केली जाते. त्यानंतर जवळच्या आपट्याची पाने सोने म्हणून लुटतात. संपूर्ण कोकणात आणि गोव्यातील काणकोण, केपे, आमोणे आणि पेडणे भागात तरंगे प्रसिद्ध आहेत. काणकोणातील नवरात्रात तरंगे नाचविण्याच्या कार्यक्रमाला गोंदोळ (गोंधळ) म्हणतात.

संदर्भ :

  • खेडेकर, विनायक विष्णू, लोकसरिता गोमंतकीय जनजीवनाचा समग्र अभ्यास, कला अकादेमी, गोवा.

प्रतिक्रिया व्यक्त करा