लॅटिन भाषेतील संक्षिप्त प्रार्थनागीत. त्याला कोकणी भाषेत लातीन असे म्हणतात. पोर्तुगीज राजवटीत पाश्चात्त्य संगीताच्या प्रसारासाठी पॅरीश स्कूलमधून संगीताचे शिक्षण देण्यात येई. चर्चमधील सामूहिक प्रार्थनागीते पाश्चात्त्य संगीतशैलीने गाण्यास सुलभ व्हावे हा त्यामागील हेतू होता. खास रचलेल्या कोंकणी भाषेतील गीतांबरोबरच मूळ लॅटिन भाषेतील लिटनी गाण्याचाही सराव केला जात असे. त्याचा फायदा घेऊन ख्रिश्चन लोकांकडून रस्त्याच्या कडेने अथवा गावात उघड्याावर उभारलेल्या क्रॉससमोर मूळ लॅटिन लिटनी आणि कोकणी प्रार्थनागीते गाण्याचा छोटेखाली समारंभ एखाद्या संध्यासमयी आयोजित केला जातो. पुरूषगायक व्हायोलीनच्या साथीने ही गीते गातात. नवसपूर्ती हा त्यामागील हेतू असतो. त्यासाठी क्रॉसची रंगरंगोटी करून रंगीत पताका आणि पानाफुलांनी सजवितात. हिरव्या वेलीचे वेटोळे घालून तेथे मेणबत्त्या लावतात. प्रार्थना संपल्यावर सर्वांना उकडलेले हरभरे वाटतात. पुरूषमंडळीना काजूपासून गाळलेली दारू देतात. अलीकडे या आयोजनात स्त्रिया पुढाकार घेऊन सर्व पूर्वतयारी पार पाडतात. ख्रिश्चन वसती असलेल्या बहुतेक गावातून लादाइन्य होताना दिसते.

संदर्भ :

  • Pereira, Jose, Martins, Micael, Costa, Antonio, Song of Goa Crown of Mandos, Broadway Publication, Panji,2001.

प्रतिक्रिया व्यक्त करा