समयसुंदर : (कालखंड १६ व्या शतकाचा उत्तरार्ध) गुजरात मधील खरतरगच्छ या संप्रदायातील जैन साधू. जिनचंद्रशिष्य सकलचंद्रांचे शिष्य. मारवाडातील साचोरचे प्राग्वाट वाणी. वडिलांचे नाव रूपसिंह, आईचे नाव लीलादेवी. इ. स. १५८२ मध्ये जिनचंद्रसूरी अकबर बादशहाला भेटावयास लाहोर येथे गेले असता, त्यांच्याबरोबर गेलेल्या साधूगणात समयसुंदरही होते व त्यावेळेस त्यांच्या अष्टलक्षी या संस्कृत कृतीने अकबर बादशहा प्रसन्न झाला होता. संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंश यांचे गाढे अभ्यासक असणा-या समयसुंदरांनी गुजरात, मारवाड, सिंधच्या व्यापक प्रवासादरम्यान गुजराती, मारवाडी, सिंधी, हिंदी आणि पंजाबी या भाषांवर प्रभुत्व मिळवले होते. गुजरातीत त्यांनी अनेक रासकृतींची रचना केली असून त्यात जैनधर्म परंपरेतील अनेक प्रचलित कथांवर आधारित रासकृतींचे प्रमाण सर्वात अधिक आहे. सांबप्रद्युम्न-रास/प्रबंध/चोपाई यात जैन आगमातील सांब व प्रद्युम्न या कृष्णाच्या दोन पुत्रांमधील स्नेह आणि साहस पराक्रमाची कथा मांडण्यात आली आहे. याशिवाय चार-प्रयेक-बुद्ध-रास/चोपाई, नलदवदंती-रास-कथा/चोपाई, मृगावतीचरित्र-चोपाई/रास/आख्यान,सीताराम-चोपाई, द्रौपदी-रास/चोपाई, वल्कलचीरी-रास/चोपाई, थावच्चा सुतरिषी-चोपाई, गौतमपृच्छा-चोपाई, शांतिनाथ-चरित्र या त्यांच्या अनेक रचना महत्त्वाच्या आहेत. यातील सीताराम-चोपाईत जैन परंपरेत प्रचलित असलेल्या रामकथेचे अनुसरण असल्याने अनेक प्रसंगांच्या निरूपणात ते वाल्मिकी रामायणापेक्षा वेगळे दिसते; तर द्रौपदी-रास/चोपाईत ज्ञातासूत्रच्या आधारे सांगितलेली जैन परंपरेनुसारची महाभारताहून वेगळी असणारी कथा निरूपित होते. नलदवदंती-रास सारख्या रचनेत विविध प्रादेशिक भाषांतील शब्दांचा संस्कार, स्वकाळातील प्रचलित लोकोक्ती, म्हणी, वाक््प्रचार यांचा वापर करणारी भाषा दिसून येते. गौतमपृच्छा या प्राकृत ग्रंथावर आधारित गौतम-पृच्छा चोपाईत शिष्याने विचारलेल्या ४८ प्रश्नांची महावीरांनी केलेली उकल याचे आलेखन आले आहे. सिंहलसुत प्रियमेलक रास, चंपक श्रेष्ठी-चोपाई, धनदत्त श्रेष्ठीनी कथा यासारख्या त्यांच्या निर्मिती लोककथांवर आधारित असून वस्तुपाल-तेजपाल-रास, पुंजरत्नऋषी-रास या ऐतिहासिक विषयावर आधारित रासरचना हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. समयसुंदरांनी छत्रीसी या प्रकारातही विपुल लेखन केले असून सत्यासियादुष्काळ वर्णन – छत्रीसी यात इ.सं. १६८७ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाचे आलेले चित्रण ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यांच्या विविध रागात रचलेल्या जवळजवळ साडेपाचशे इतक्या स्फुट पदरचना त्यातील गेयतेमुळे जैन समाजात अतिशय लोकप्रिय आहेत व त्यातील अनेक रचना राजस्थानीतही आहेत. याचबरोबर षडावश्यक सूत्र – बालावबोध, यती-आराधना-भाषा, या त्यांच्या गद्यकृतीही लक्षणीय आहेत.
संदर्भ :
- देसाई,मोहनलाल,दलीचंद,जैन गुर्जर कविओ,१९२६.
- शाह,चि.,रमणलाल,समयसुंदर ,१९७९.